Wednesday 4 May 2016

हीच काय पोलिसांची खरी मर्दुमकी






एक राजा प्रचंड लोकप्रिय आणि प्रजेचे हित पाहणारा असतो. दररोज दुपारी काही काळ  झोपण्याची त्याला सवय असते. त्या काळात त्याला कुणीही जागे करून  नये, म्हणून त्याने एका सैनिकाची नियुक्ती केलेली असते. राजासाठी सर्वात महत्वाचे काम करत असल्याने त्या सैनिकाच्या अंगात गर्व भिनू लागतो. कुणाचाही अपमान कर, कुणालाही त्रास दे. कुणालाही धमकाव. एखाद्याच्या अंगावर चालून जा. गोरगरिबांकडून पैसे लुट, असे उद्योग तो करू लागतो. याबद्दल काही दरबारी मंडळी राजाकडे तक्रारीही करून पाहतात. पण आपल्याला सर्वात प्रिय असलेल्या झोपेच्या सुखासाठी मदत करणाऱ्या सैनिकाविषयी राजा काहीही ऐकून घेण्यास तयार होत नाही. म्हणून दरबारी नाद सोडून देतात. एक दिवस राजा झोपला असताना एक माशी गुणगुणत वारंवार त्याच्या नाकावर बसू लागते. ते पाहून सैनिक तलवार काढून वार करतो. माशी जाते उडून आणि राजाचे नाकच कापले जाते. संतापलेला राजा सैनिकावर कठोर कारवाईचे आदेश देतो. पण दरबारी म्हणतात, महाराज, सैनिकावर कारवाई होईल. परंतु, तुमचे नाक कापले गेले त्याचे काय? तुमच्या लाडक्या सैनिकाने मर्दुमकी गाजवण्याच्या नावाखाली तुमची आयुष्यभराची बदनामी करून टाकली. ती कशी भरून निघेल?

औरंगाबादचे लोकप्रिय पोलिस आयुक्त अमितेशकुमार (प्रभारी आयुक्त कुलवंतकुमार) यांनाही औरंगाबादकर असाच प्रश्न विचारत आहेत. फक्त इथे आयुक्तांना नाक वाचवण्याची संधी आहे. आणि आपण खऱ्या अर्थाने निष्पाप सामान्यांच्या बाजूचेच आहोत, हेही दाखवून देण्याएवढा वेळ उपलब्ध आहे. हे सारे सांगायचे कारण म्हणजे पोलिस म्हणजे कायदा नव्हे. याचे भान बऱ्याचवेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांना असते. पण हवालदार मंडळींपर्यंत हे भान, कायद्याचे ज्ञान अजून पोहोचलेलेच नाही. त्यामुळे ते बेभान होऊन धुमाकूळ घालत असल्याची अनेक उदाहरणे पाहण्यास मिळतात. त्यातील काहीच प्रकार सार्वजनिक होतात. २८  एप्रिल रोजीची घटना त्यापैकी एक. रात्री साडेदहाच्या सुमारास सिडको एन-५ भागात आसाराम चव्हाण, पंडित चव्हाण या दोन हवालदारांनी अंडा आम्लेटच्या गाडीजवळ उभ्या असलेल्या नीलेश शिवणकर या देऊळगावराजा येथील तरुणाला त्यांनी काहीही कारण नसताना गुरासारखे झोडपून काढले. मला का मारताय, अशी विचारणा केल्यावर आणखीनच जोरदार हल्ला चढवला. कायद्याचे बऱ्यापैकी ज्ञान आणि अमितेशकुमार यांचा नावलौलिक माहिती असल्याने निलेशने मला मारले तर मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करेन, असा इशाराही देऊन पाहिला. मग ते चव्हाणद्वय अधिकच संतापले. त्यांना त्याला चिश्तिया कॉलनीच्या पोलिस चौकीत नेऊन तेथे पुन्हा मर्दुमकीचा दुसरा प्रयोग केला. कमरेचा पट्टा आणि लाथाबुक्क्यांनी नीलेशची पाठ सोलून काढण्यात आली. असे करत असताना `सांग, आम्ही तुझ्या आईचे बाप आहोत की नाही? आम्ही तुझ्या बहिणीचे नवरे आहोत की नाही?` असे विचारण्याचा पराक्रमही या हवालदारांनी केला. मारहाण करून करून थकल्यावर निलेशला पोलिस चौकीबाहेर हाकलून देण्यात आले. वर `खबरदार या घटनेबद्दल कुणाला सांगितले तर` अशी धमकीही दिली. जाब विचारल्याचा आणि अमितेशकुमार यांच्याकडे धाव घेण्याचा इशारा दिल्याचा एवढा परिणाम या शेतकरी कुटुंबातील तरुणाला भोगावा लागला. तरीही त्याचा अमितेशकुमार यांच्यावरील विश्वास कायम होता. म्हणून तो त्यांना भेटला. त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त संदीप आटोळे यांना लक्ष घालण्यास सांगितले. आटोळेंनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे फर्मान काढले. सिडको ठाण्यातील पोलिसांना या प्रकाराची पूर्ण माहिती असल्याने त्यांनी पूर्वतयारी केली होती. अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्यांनी नीलेशची बोळवण केली. खरेतर एखादे प्रकरण थेट पोलिस आयुक्तांपर्यंत गेले आणि त्यांनी कार्यवाहीचे आदेश दिल्यावर त्यात कायदेशीर बाबींचे पालन  अपेक्षित होते. मात्र, निलेशची वैद्यकीय तपासणी झाली नाही. मारहाण करणाऱ्यांवर कारवाईऐेवजी निलेशने योग्य त्या कोर्टात दाद मागावी, अशी समज त्याला लेखी स्वरूपात देण्यात आली. हे तर फारच धक्कादायक आहे. सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल असून चौकशी सुरू असल्याचे उत्तर दिले आहे.

गेल्या सात-आठ महिन्यात अमितेशकुमार यांनी काही चांगले निर्णय घेतले. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कठोर पाठपुरावा केला. काही प्रकरणात ते स्वतःच्या निर्णयावर ठामही राहिले. स्वतःशी संबंधित नसलेली काही कामेही ते स्वतःवर ओढवून घेत आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहेच. मात्र, दुसरीकडे त्यांच्या संरक्षणाचा अन्‌ आक्रमकपणाचा गैरफायदा घेतला जात आहे. विशेषतः काही हवालदार आणि त्यावरील मंडळी हात धुऊन घेत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष दिलेच पाहिजे, हे निलेशच्या मारहाण प्रकरणावरून त्यांना सांगणे अत्यावश्यक आहे. कारण लोकांचा दररोजचा संबंध हवालदार, उपनिरीक्षक, पोलिस निरीक्षकांशीच येतो. सर्वसामान्य माणसे त्रास सहन होईनासा झाला तरच पोलिस ठाण्याची पायरी चढतात. अशावेळी त्यांना मनापासून मदत करण्याऐवजी गुंड, लुटारूंना संरक्षण देण्यासाठीच पोलिस आटापिटा करत असतात. प्रत्येक तक्रारीतून कमाई हा तर त्यांनी स्वयंघोषित हक्क जाहीर केला आहे. तपास करायचा असेल तरी पैसा आणि नसेल तरी पैसा असा दुहेरी उद्योग सुरू आहे. त्यात निष्पापांना गुरासारखी मारहाण, खोट्या तक्रारीत अडकवणे, चौकशीचा ससेमिरा लावणे अशी मर्दुमकीची कामे वेळ काढून केली जात आहेत. राज्यातील सरकार बदलले असले तरी पोलिस, महसूल, मनपा अशी लोकांची रोज थेट कामे पडणारी खाती बदललेली नाहीत. लोकांची बेसुमार लूट आणि छळ सुरूच आहे. तो थांबवण्याची संधी अमितेशकुमार यांच्याकडे निश्चितच आहे. ती त्यांनी घेऊन नीलेशवर गुन्हेगारासारखा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा काही पोलिस कर्मचारी कधी पोलिस आयुक्तांच्या नाकावर कधी माशी बसेल याची वाट पाहत हातामध्ये तलवार घेऊन बसलेलीच आहेतच.





No comments:

Post a Comment