Thursday 15 June 2017

तरीही शेषप्रश्न : स्त्री मुक्ती चळवळीतील जिवंत अनुभवांची कहाणी


महिलांना सन्मानाची वागणूक, बरोबरीचा दर्जा द्या. तिच्याकडे केवळ शारीरिक सुखाचे साधन या नजरेने पाहणे बंद करा. तिच्यातील लैंगिक भावना समजून घ्या, अशा काही मुद्यांवर १९७० नंतर महाराष्ट्रात महिला मुक्तीची चळवळ उभी राहिली. त्या चळवळीच्या आक्रमक  पवित्र्याने आणि मुद्देसूद लढ्याने त्याकाळी पुरुषी जग ढवळून निघाले होते. आज महिलांना जी थोडीफार सन्मानाची वागणूक मिळते किंवा मिळण्याची वरकरणी का होईना भाषा केली जाते. काही कायदे होतात. त्यांच्या अंमलबजावणीसाठी काही पुरुषांकडून आवाज उठवला जातो. त्याचे श्रेय त्या महिलांनी चाळीस वर्षांपूर्वी उभारलेल्या चळवळीला, आंदोलनालाच आहे. पुरुषांचे जग एक-दोन टक्के का होईना हलले आहे. नव्या पिढीत त्याची अल्पशी का होईना मूळे दिसू लागली आहेत. पण हे सगळे कसे घडत गेले आणि आता महिलांसमोरील सगळे प्रश्न समाजाला समजले आहेत का? त्याविषयीचे भान तरी आले आहे का? काळाच्या प्रवाहाने नवीन आव्हाने तर उभी केली नाहीत ना? केली असतील तर त्यांची उत्तरे काय आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या, स्त्री मुक्ती च‌ळवळीतील लढवय्या छाया दातार यांनी ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित तरीही शेषप्रश्न या शोधनिबंधवजा कादंबरीत केला आहे. मांडणी आणि तपशील अतिशय मुद्देसूद, अभ्यासपूर्ण असणे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. अतिशय साध्या, सोप्या, सरळ शब्दांत दातार यांनी चाळीस वर्षातील स्त्री मुक्ती चळवळीचा प्रवाह वाहता केला आहे. चळवळीसमोरील नवी आव्हाने आणि जुन्या आव्हानांचे बदललेले रूप, अगदी स्वत:च्या जातीय मर्यादा सांगताना त्या कोणतीही भीडभाड बाळगत नाहीत. महिला मुक्ती चळवळीतही प्रादेशिकता वाद, जातीभेद सुरू झाला आहे, हे त्या काहीशा खिन्नपणे, पराभूत मानसिकतेतून मांडतात. त्या टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे स्त्री अभ्यास केंद्रामधील प्रोफेसरपदावरून २०१० मध्ये निवृत्त झाल्या. मधल्या काळात चळवळीत केलेल्या कामाच्या आठवणींचा आत्मकथनात्मक धांडोळा घ्यावा, या विचाराने त्यांना झपाटले होते. हे झपाटलेपण पूर्ण ताकदीने कादंबरीच्या पानापानात दिसते. पुरुषत्वाचे आजचे स्वरूप सत्ताभिलाषी असेच आहे आणि ही अभिलाषा सतत विविध सांस्कृतिक चिन्हे, धार्मिक विधी, व्रते, वैकल्ये, चालीरिती या सर्वांतून दृग्गोचर होत  असते. पुरुषांच्या चालण्या, बोलण्यातून, भाषेतून, शिव्यांच्या वापरातून, लैंगिक विनोदातून तो अभिनिवेश त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भिनल्याचे लक्षात येत असते. महिलांना संस्कृतीच्या चौकटीत कोंडून ठेवण्याची जबाबदारी पुरुषांवर असल्याची जबरदस्त भावना असल्यामुळेच जाती-जातीतील भांडणांमध्ये बलात्काराचे अस्त्र बिनदिक्कतपणे वापरले जाते, असे त्या सांगतात. सोबत महिलांचे लैंगिक प्रश्न, रतीसुखाविषयी महिलांच्या कल्पना आणि अनुभवही खुलेपणाने मांडतात. त्यात कोठेही पातळी सुटत नाही. मुद्दा अश्लिलतेकडेही झुकत नाही. उलट एका बंदिस्त जगातील दुःख संवेदनशीलतेने मांडले जात असल्याचे ठसत जाते. आयुष्यभर डाव्या विशिष्ट विचारसरणीवर ठाम राहून आपलीच विचारसरणी श्रेष्ठ असे मानत असल्याने दातार यांचे लेखन ठरवून उजव्या विचारसरणीला आरोपीच्या, अत्याचाऱ्यांच्या पिंजऱ्यात उभे करते. मोदीकाळ सुरू होण्यापूर्वी थांबायचे, हे पूर्वीच ठरले होते. असे त्या मनोगतातच मांडतात. त्यावरून त्यांचे पुस्तक एका विशिष्ट दृष्टीकोनातून स्त्री मुक्ती चळवळीविषयी सांगणार असल्याचे लक्षात येते. आणि पुढे सुधा, निर्मला, चारू, ललिता या मैत्रिणींच्या कथनातून ते स्पष्ट, सखोल आणि टोकदार होत जाते. समलिंगी संवेदना, विवाह संस्था : नवा दृष्टीकोन, मुझफ्फरनगर ते मुंबई, सेक्स वर्कर्स, लैंगिक हल्ला स्त्रीवादाच्या नजरेतून, रती प्रेरणा ही प्रकरणे सुन्न करतात. पुन्हा पुन्हा विचार करण्यास भाग पाडतात. `शेषप्रश्न : टेकओव्हर` हे अखेरचे प्रकरण तर अफलातून आहे. महिलांचे प्रश्न केवळ महिलांसाठी नव्हे तर पुरुषांसाठीही तेवढेच महत्वाचे आहेत. कारण समाज केवळ पुरुषांचा किंवा स्त्रियांचा नाही. दोघांचा आहे. म्हणून या प्रश्नांचा गुंता समजून घेत तो सोडवण्यासाठी जाती-पातींच्या पलिकडे जात पुरुषांचा मनापासून पुढाकार आवश्यक असल्याचे दातार मांडतात. तेव्हा त्यांच्यातील सकारात्मक उर्जा किती उच्चस्तराची आहे, हे लक्षात येते.


जगात कोण आक्रमक. महिला की पुरुष. तर पुरुष. समाजावर कोणाची सत्ता. महिलेची की पुरुषाची. तर पुरुषाची. अत्याचार कोण करतो. महिला की पुरुष. तर पुरुषच. असे म्हणणारा, मानणारा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग महिलांमधील हिंसकतेच्या, महिलांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या कहाण्या सांगतो. महिला एका विशिष्ट परिस्थितीत सर्वसत्ताधीश होऊन पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा अधिक आक्रमक होते, अशीही उदाहरणे दिली जातात. त्यामुळे महिला विरुद्ध पुरुष असा पुरातन काळापासून चालत आलेला झगडा आजही कायम आहे. त्यावर नेमके उत्तर सापडले नाही. सापडणारही नाही. कारण निसर्गाची आणि समाजाची रचनाच तशी झालेली आहे. दोघांनी काही काळ एकत्र, सहजीवनात राहावे. आणि त्यातून मिळालेल्या आनंदातून निर्माण होणारी उर्जा इतरांच्या भल्यासाठी वापरावी, असा साधा, सोपा, स्पष्ट संदेश निसर्गाने दिला आहे. पण पुरुषी धर्ममार्तडांनी त्यावर धर्माची, परंपरेची चौकट लादून महिलेला बंदिस्त करून टाकले. तिचा कोंडमारा सर्वच धर्म, जाती, पंथ हिरीरीने करत आहेत. काही ठिकाणी धर्म, जाती, पंथ करत नसले तर कौटुंबिक पातळीवर किंवा सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयांत महिलांना पुरुषी अहंकार, द्वेषाचा, लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. त्याचा महिलावर्गाने वेळोवेळी प्रतिकारही केला. स्त्री मुक्ती चळवळीतून जोरकस प्रयत्नही झाले आहेत. त्यातून अनेकींना अस्तित्व, जगण्याचा आधार मिळाला आहे. अर्थात चळवळीचे केंद्र पुणे, मुंबईसारखी शहरेच होती. त्यातही वरच्या वर्गातील, ब्राह्मणी संस्कारातील विशेषतः डाव्या चळवळीशी बांधिलकी असणाऱ्या, हिंदू धर्मातील बुरसटलेल्या परंपरा नष्ट झाल्याच पाहिजेत, असे मानणाऱ्या महिला आघाडीवर होत्या. अनेक प्रकारचे हल्ले होऊन, चारही बाजूंनी खालच्या स्तरावरील टीकेचा वणवा पेटला असताना त्या खंबीर राहिल्या. त्यामुळे या महिला ज्या सामाजिक स्तरातून येत होत्या. त्या स्तरातील काही कुटुंबात महिलांसाठी सुई टोकावर मावेल एवढे का होईना समानतेचे, न्यायाचे वातावरण निर्माण झाले. आणि इतर स्तरांमध्येही ते किंचित झिरपले. हळूहळू त्याचा प्रवास इतर समाज घटकांकडेही होताना दिसत आहे. चाळीस वर्षापूर्वी स्त्री मुक्ती चळवळीत काम करणाऱ्या महिलांची आजची स्थिती काय आहे. प्रत्येक क्षेत्र पोखरणारा जातीय द्वेष या चळवळीत शिरला आहे की नाही? स्त्री मुक्तीची चळवळ म्हणजे ब्राह्मणी बायकांचा उद्योग असा ठपका मारला जातो की नाही, असे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत. त्याचीही उत्तरे ‘तरीही शेषप्रश्न’मध्ये मिळतात. त्यामुळे ही कादंबरी म्हणजे महिलांच्या जगातील सामाजिक स्थित्यंतराची कहाणी सांगणारा बराचसा टोकदार दस्तावेज तर आहेच. शिवाय ती स्त्री मुक्ती चळवळीतील विविधांगी चर्चा आणि महिलांचे बरेचसे जग पुरुषांना समजून घेता येईल अशी जिवंत अनुभवांची कहाणीही असल्याचे अधोरेखित होते.

----------------


 

No comments:

Post a Comment