Wednesday 21 June 2017

घाटी रुग्णालय : प्रतिमा अन् औषधोपचार



घाटी रुग्णालय म्हणजे केवळ मराठवाडाच नव्हे, तर विदर्भातील बुलडाणा जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातील हजारो रुग्णांना दररोज दिलासा देणारे आहे. या रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा नियमित कार्यभार प्रथमच डॉ. कानन येळीकर यांच्या रूपाने महिलेकडे आला आहे. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी सूत्रे स्वीकारली. तेव्हा घाटीचा कारभार काही प्रमाणात का होईना, सुधारू शकतो, अशा आशावाद वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त झाला होता. कारण डॉ. येळीकर औरंगाबादनिवासी आहेत. त्यांनी अनेक वर्षे याच रुग्णालयात काम केले आहे. घाटीतील सर्व समस्यांची त्यांना पूर्ण कल्पना आहे. केवळ कल्पनाच नव्हे, तर या समस्या कशा सोडवता येतील, याचाही त्यांनी अभ्यास केला आहे. इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे येथेही जातीवाद, धर्मवाद रुजला, फोफावला आहे. त्यामुळे समस्या निर्माण करणारी मंडळी नेमकी कोण आहेत, त्यांच्यावर कोणते उपचार करावे लागतील, याचीही माहिती त्यांना आहे, असे म्हटले जाते.  आणि गेल्या काही दिवसांत त्यांनी हाती घेतलेले उपक्रम, काही निर्णय पाहिले तर डॉ. येळीकर यांच्याकडून व्यक्त होणाऱ्या काही अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील, असे चित्र निर्माण झाले आहे. गोरगरीब रुग्णांवर मोफत, अत्यल्प दरात उपचार व्हावेत, यासाठी सरकारने घाटी रुग्णालय निर्माण केले. त्याचा प्रारंभीच्या काळात खरेच रुग्णांना खूप फायदा झाला. अजूनही होत आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात घाटीची प्रतिमा खूपच मलिन झाली आहे. त्यामागे कारणे अनेक आहेत. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे रुग्ण संख्या खूप आणि त्या तुलनेत डॉक्टरांचे मनुष्यबळ कमी आहे. महत्त्वाच्या विभागांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. उपकरणांचीही कमतरता आहेच. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जे डॉक्टर उपलब्ध आहेत त्यांच्यापैकी काही जणांमध्येच सेवाभावाची पूर्ण भावना आहे. आपल्याला काय करायचे, दुसरा कोणी तरी बघून घेईल, आपण फक्त पगाराचे धनी, अशी वृत्ती मधल्या काळात वाढीस लागली. त्याचा परिणाम तृतीय, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर झाला नसता तरच आश्चर्य वाटले असते. त्यामुळे वरपासून खालपर्यंत अनास्थेची साखळी निर्माण झाली. आधीच मनुष्यबळाचा तुटवडा, उपकरणांची कमतरता. त्यात अशी अनास्था. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टरांमधील संबंध कमालीचे ताणले गेले. डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या. इतर कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्येही वाद होऊ लागले. त्यातच रुग्णालयाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप होऊ लागला होता. काही डॉक्टर मंडळी पुढाऱ्यांकडून दबावाचे राजकारण करू लागली. परिणामी अतिशय मनापासून आणि तळमळीने काम करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढली. जणूकाही संपूर्ण घाटी रुग्णालयच आयसीयूमध्ये आहे की काय, असे वाटू लागले. या साऱ्यातून मार्ग काढण्याची आणि रुग्णांना, त्यांच्या नातेवाइकांना हे आपले रुग्णालय आहे, असे वाटू लागेल, इतपत कामगिरी करण्याची जबाबदारी डॉ. येळीकर यांच्यावर आली आहे. प्रसंगी कठोर आणि प्रसंगी मातेच्या ममतेने त्यांना वाटचाल करावी लागणार आहे. त्या दिशेने त्यांची पावले पडत असल्याचे दोन-तीन प्रसंगांत दिसून आले. त्यातील पहिला म्हणजे मध्यवर्ती पॅथॉलॉजी लॅबच्या नूतनीकरणासाठी लॅब स्थलांतराच्या प्रयत्नात अस्थिरोग विभागाचे कर्मचारी प्रकाश कछुवे यांनी केलेली दांडगाई त्यांनी स्वत: मोडून काढली. समाजाच्या सर्वच क्षेत्रांप्रमाणे आरोग्य क्षेत्रातही काही दांडगी मंडळी घुसली आहेत. छोट्या पदावर असूनही वरिष्ठांना हैराण करण्याची त्यांची मनोवृत्ती आहे. कछुवे त्याच मनोवृत्तीचे असल्याचे लक्षात येताच डॉ. येळीकर यांनी स्वत: हस्तक्षेप केला. कछुवेंकडून लॅबच्या किल्ल्या हस्तगत केल्या. विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवणारे कछुवे येळीकरांनी फर्मावताच सरळ झाले. 
यासोबतच त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणारे ३६ लाखांचे अत्याधुनिक फेको इमल्सिफिकेशन मशीन कार्यान्वित केले. त्यामुळे खासगी रुग्णालयांत या शस्त्रक्रियेसाठी येणारा ३० ते ४० हजार रुपयांचा खर्च वाचणार आहे. घाटीत आलेली अत्याधुनिक उपकरणे केवळ तांत्रिक अडचणींमुळे किंवा वरिष्ठांच्या निर्णयाअभावी धूळ खात पडून राहतात. डॉ. येळीकरांनी फेको मशीन तत्काळ रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून द्या, असे सांगितले आहे. तिसरा प्रसंग म्हणजे त्यांनी हर्सूल कारागृहातील कैद्यांवर टेलिमेडिसीनद्वारे उपचारास गती दिली आहे. गेल्या १८ दिवसांत ३६ कैद्यांवर उपचारही झाली. यामुळे घाटी रुग्णालयावर येणारा ताण काही प्रमाणात का होईना, कमी होणार आहे. यापुढील काळात त्या असेच महत्त्वपूर्ण निर्णय घेतील, शासनाच्या निधीचा काटेकोरपणे वापर करतील, नव्या उपचारपद्धती आणतील, सर्वांकडे शिस्तपालनाचा आग्रह धरतील,तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढवण्याकडे लक्ष देतील, इतर कर्मचारी वर्गही वाढवतील, डॉक्टरांमध्ये रुग्णांविषयी आस्थेची, आपुलकीची आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये डॉक्टर, परिचारिका, इतर कर्मचाऱ्यांबद्दल आदराची भावना निर्माण करतील, अशी अपेक्षा आहे. घाटी खऱ्या अर्थाने सर्व थरांतील लोकांसाठी उपयुक्त व्हावे म्हणून केवळे औषधाचे डोस देऊन चालणार नाही, तर गरज असेल तेथे शस्त्रक्रियाही करावी लागेल. डॉ. येळीकर स्थानिक असल्याने त्यांना औरंगाबादेतील राजकारणाची पूर्ण जाण आहे. राजकीय मंडळींचा हस्तक्षेप कितपत मान्य करायचा आणि राजकारण्यांच्या मदतीने शासन दरबारी प्रलंबित पडलेले प्रश्न कसे सोडवायचे, हेही त्यांना ठाऊक आहे. त्याचा अचूक वापर करून घाटी रुग्णालय खऱ्या अर्थाने सर्वांसाठी आहे, असे त्या दाखवून देतील, अशी सार्थ अपेक्षा आहे. 

No comments:

Post a Comment