Thursday 4 April 2019

रंग, रेषांच्या दुनियेचे दर्शन

नाटक कोणत्याही ठिकाणी सुरू करता येऊ शकते आणि एकदा ते सुरू झालं की त्याला किमान भारतात प्रेक्षक मिळतातच. ते कोणत्या ठिकाणी सादर होतंय यावर त्याची लोकप्रियता अवलंबून राहत नाही. फक्त त्यात नेमकं काय सांगितलंय हेच रसिकांसाठी महत्वाचं असतं. मात्र ज्यांच्यासाठी ते नाटक तयार केलेलं असतं त्याच मंडळींसमोर ते झाले तर अधिक परिणाम साधतं. तसं चित्रकलेबद्दलही आहे. एखादी चित्रकृती रेखाटल्यावर ती विशिष्ट ठिकाणी प्रदर्शित करण्यास एक वेगळंच महत्व आहे. या प्रदर्शनाचेही एक टायमिंग असावे लागते. आणि त्यातील मांडणीची कलाही अवगत असली तर मग रेखाटनाला दर्दींची गर्दी होते. हे सारं काही माहिती असलेले, हरहुन्नरी छायाचित्रकार किशोर निकम यांच्या पुढाकाराने नुकत्याच झालेल्या पॅच नामक चित्रप्रदर्शनातून त्यावर शिक्कामोर्तब होते. औरंगाबाद शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवर आणि चित्रकलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या असंख्य रसिकांनी या प्रदर्शनाचा मनसोक्त आस्वाद घेतला. अनेक प्रतिभावान चित्रकार केवळ प्रदर्शनाचे तंत्र आत्मसात नसल्याने किंवा त्यापासून फटकून राहत असल्याने दुर्लक्षित राहतात. अशांना एकत्र आणून त्यांची अप्रतिम रेखाटने रसिकांसमोर आणण्याचे काम कोणालातरी करावे लागणारच आहे. ही जबाबदारी किशोर यांनी मनापासून स्वीकारली. आज मराठवाड्याच्या तरुण पिढीतील आघाडीचे फ्री लान्स छायाचित्रकार म्हणून किशोर यांचे नाव घेतले जाते. कारण त्यांनी मिडिआतील मंडळींशी सलगी असूनही कायम चौकटीबाहेर स्वतःचा वावर ठेवला.२५-३० वर्षांपूर्वी उत्तम छायाचित्रांची जाण असलेली तरुणाई पोटा-पाण्यासाठी वर्तमानपत्रांच्या जगात शिरली. त्यातील बहुतांशजणांना मिडिआच्या पॉवर, ग्लॅमरचेही आकर्षण होते. त्यामुळे ते एका कृष्णविवरात ओढले गेले. मिडिआमधील जीवघेण्या स्पर्धेत, जातीवादात आणि बातमीसाठी रोजचे फोटो एवढ्याच चक्रात अडकून पडले. निकम दोनदा अपघाताने त्या विवरात शिरले आणि चलाखीने बाहेर पडले. आता त्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. शास्त्रीय, पारंपारिक नृत्यांमधील काही हालचाली कॅमेऱ्यात टिपताना विशिष्ट तंत्राचा वापर केला की ती हालचाल एखाद्या पेटिंगसारखी उतरते. या तंत्रात निकम यांनी मातब्बरी प्राप्त केली. आणि अशा प्रकारच्या चित्रांची प्रदर्शने मुंबई, पुण्यात भरवली. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचे समाधान त्यांना मिळाले. पण आपण ज्या गावात राहतो तेथील रसिकांनीही या कलाकृती पाहिल्या पाहिजेत, असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी विचार करत असताना त्यांच्या असेही लक्षात आले की आपल्यासोबत १९९८मध्ये शासकीय कला महाविद्यालयात शिक्षण घेणारे वैशाली टाकळकर, स्वाती नरेंद्रसिंग, सावी निकम, डी. विद्यासागर, डॉ. ए. डी. काटे, डॉ. सर्वेश नांद्रेकर आदी मंडळीही आज दिग्गज कलावंत म्हणून परिचित झाली आहेत. प्रत्येकजण एका विशिष्ट रंगशैलीत पारंगत झाला आहे. त्यांनाही सोबत घेऊन चित्रप्रदर्शन आयोजित केले तर ते अधिक वैविध्यपूर्ण होईल. एकाच छताखाली अनेक कलावंतांच्या सृजनशीलतेचा आनंद घेण्याची संधी रसिकांना मिळेल. शिवाय सभागृहाचे भाडे आणि इतर खर्चाचा भार कोणा एकावर पडणार नाही, असा व्यावहारिक विचारही निकम यांनी केला.  त्यातून १५ ते १७ फेब्रुवारी कालावधीत एमजीएमच्या दीर्घा आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन झाले. मांडणी, आशय, विषयाच्या निकषात ते वजनदार होते. सर्वच चित्रकार, शिल्पकार दीर्घ अनुभवी आणि रंगरेषांचे उत्तम जाणकार. त्यांच्या विचारांचीही एक बैठक निश्चित झालेली. त्यामुळेही एकेक कलाकृती कसबी झाली होती. डॉ. नांद्रेकर यांनी रेखाटलेले छत्रपती शिवरायांच्या दरबाराचे चित्र कमालीचे लक्षवेधी. त्यात त्यांनी शिवकालीन तपशील ज्या बारकाईने आणि ठाशीवपणे रेखाटला तो पाहून नजर खिळते. सावी किशोर निकम, डॉ. ए.डी. काटे यांच्या पेंटिंग्ज सर्वस्तरातील रसिकांना कमालीची भावली. कारण त्यात त्यांनी जीव ओतल्याचे जाणवत होते. वारली हा तर महिला वर्गाचा आवडता प्रांत. त्यामुळे प्रदर्शनातून सावी यांच्या काही चित्रकृतींची विक्रीही झाली. डॉ. काटे यांच्या कुंचल्यात एक विशिष्ट प्रकारचा दमदारपणा, खोलाकार असल्याची नोंद अनेकांनी घेतली. स्वाती नरेंद्रसिंग यांच्या शिल्पकलेत दीर्घकाळ नजर गुंतवण्यास भाग पाडणारे सामर्थ्य आहे. त्या केवळ कलाकुसर पुरता मर्यादित विचार करत नाहीत तर शिल्पकला पाहणाऱ्यास एक थॉटही देतात. डी. विद्यासागर, 
वैशाली टाकळकर यांच्या कलाकृतींबद्दलही हेच म्हणता येईल. त्यांच्या रेखाटनातील स्ट्रोक्समध्ये छानशी लय आहे. शिवाय त्या चित्राच्या आसपासचा अवकाशही अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने भरतात. त्यामुळे त्यांच्या निर्मितीचे मूल्य अधिक. एकूणात सर्व प्रदर्शन विविध अभिरुचीच्या रसिकांच्या मनात रेंगाळत राहिल,एवढे नक्की. निकम आणि  त्यांच्या सहकाऱ्यांनी अशीच प्रदर्शने वर्षातून दोनदा आयोजित करायची आणि त्यात चित्रकार, शिल्पकारांची संख्याही वाढवायची, असे ठरवले आहे. त्यांचे ठरवणे प्रत्यक्षात येवो आणि या कलावंतांच्या प्रयत्नांना अधिक दाद मिळावी म्हणून एक भव्य आर्ट गॅलरी उभी करण्याची सुबुद्धी सरकारला सुचो, एवढीच अपेक्षा.

No comments:

Post a Comment