Thursday 4 April 2019

सांध्यावरच्या मर्मभेदी नोंदी

बालाजी सुतार हे मराठवाड्याच्या नव्या पिढीतील अत्यंत सशक्त, सखोल आणि अचूक विचार मांडणारे साहित्यिक. त्यांच्यातील या गुण- वैशिष्ट्य, बलस्थानाचा परिचय होतो त्यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहातून. जागतिकीकरणाचे पर्व सुरू झाल्यावर खेडेगावांमध्ये नेमकी काय स्थित्यंतरे घडली. तिथले जीवनमान कसे बदलत गेले, हे तर सुतार यांची लेखणी अतिशय मर्मभेदी पद्धतीने सांगतेच. त्यात ते कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत. जाती-पातींच्या आड माणूस म्हणून दडलेले राक्षसी चेहरे ते उघड करतात. कोण कुठं चुकतंय. जास्तीचं माप पदरात ओढून घेतंय, हे पण थेट हल्ला करत सांगतात. शिवाय गावांचा व्यवहार कसा. तिथली जातीव्यवस्था कुठल्या वळणावर येऊन ठेपली आहे. शतकानुशतके काबाडकष्टातच जगणारी महिला नामक व्यवस्था आज कोणत्या अवस्थेत आहे. तरुणाईची स्वप्ने कोणती आहेत. ती कशाने भंगत आहेत. गावांमध्ये धार्मिक तेढ म्हणजे नेमके काय असते, अशा एकना अनेक धागादोऱ्यांची अतिशय बळकट वीण ते आपल्याभोवती विणून टाकतात. ती देखील अतिशय सहजगत्या. म्हणजे हे सारे विषय आपल्या अवतीभोवती कधी गिरक्या घेऊ लागतात. गिरक्या घेत घेत वावटळीचे रुप धारण करतात आणि काही वेळानंतर कधी आपल्यालाच स्वःतमध्ये सामावून घेऊन भिरकावून देतात, हेच लक्षात येत नाही. कथा संपते तेव्हा आपण भानावर येतो आणि आणखी काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा मागची काही पाने चाळतो. सुतार यांनी मांडलेल्या विचारांच्या चक्रात अडकतो.  काही तपशील थोडासा सविस्तर असला तरी तो अतिशय मनापासून आलेला आहे. एकप्रकारचा तो मुक्त संवादच आहे. राजन गवस यांनी या पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये म्हटल्यानुसार लघुकथेच्या बंदिस्त परिघातून मराठी कथेला स्वतःचा मोकळा अवकाश करून देणाऱ्या आजच्या कथाकारांमध्ये बालाजी सुतार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘दोन शतकांच्या...’मध्ये ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’, ‘डहूळ डोहातले भोवरे’, ‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’, ‘दोन जगातला कवी’, ‘पराभवाच्या बखरीतली काही पानं’, ‘अमानवाच्या जात्याचा पाळू’, ‘संधिकाळातले जहरी प्रहर’ आणि ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ अशा एकूण सात कथा १५९ पानांमध्ये व्यापलेल्या आहेत. त्यातील पहिली ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’ ही कथा म्हणजे राघव नावाच्या एका तरुणाची विलक्षण शब्दांत टिपलेली भावस्पंदने आहे. दोन प्रसंगांमध्ये सुतार जी भाष्ये पेरतात ती थक्क करून टाकतात. उदा. सतत येणाऱ्या बधीर कंटाळ्याचे काय करावे, हे त्याला उमगत नाही हीच त्याची गोची आहे. हे वाक्य पूर्ण झाल्यावर सुतार लिहितात, ‘कल्पितांना कथा समजून वाचण्यात फार दिवस व्यर्थ गेले.  जिवंत गाथा वाचायच्याच राहून गेल्या. सव्यापसव्यं यांत्रिक असतात आणि डोहातली उसळीच फक्त जिती असते, हे, भडव्या कधी उमजणार तुलाॽ पारा उडून आणि गंध विरून गेल्यावरॽ’. त्यांचा हा सवाल प्रत्येक शब्दांवर अनेक अंतरंगे उलगडतो. पुढे ते आणखी एका संदर्भात म्हणतात, ‘तांडेच्या तांडे फिरताहेत अकाली मेल्या स्वप्नांच्या तिरड्या खांद्यावर घेऊन. हे शहर आहे की स्मशानॽ’, ‘मायेचा पाऊस असला तर माणसाच्या शिवारात ओल राहते. पाऊस नाही, धान मरून जातं. पाऊस नाही, मन जळून जातं. पाऊस नाही, तहानेनं वाळून जा. पाऊस ओढ देतो, चातक होऊन बस. पाऊस झड लावतो, अगस्ती होऊन उपस. पावसात रोमँटिक कविता लिहिणं ठीक आहे. पावसात खमंग भजी तळून खाणंही ठीकच. पावसाअभावी काही पिकं, काही शेतं, काही घरं, काही गावं आणि कितीएक शंकर मरून जातात हे लक्षात असू दे.’ असे सुतार म्हणतात. तेव्हा काळजाचा थरकाप उडतो. पुढील प्रत्येक कथांमध्येही त्यांची संवेदनशील माणूस म्हणून भूमिका समोर येत जाते. एकूणच जागतिकीकरणाने, जगण्यासाठी लढण्याच्या स्पर्धेने गावांचे, शहरांचे बदललेले रूप एवढ्या आतड्यापासून अलिकडील काळात कोणी मांडले असावे, असे वाटत नाही. सुतार यांची एकूण विषय स्वतःमध्ये भिनवून घेण्याची आणि त्यानंतर तो वाचकांपर्यंत पोहोचवण्याची शैली महान उर्दू कथाकार सआदत मंटो हुसेन यांच्यासारखी भासते. त्यामुळे त्यांचा हा कथासंग्रह अतिशय मौल्यवान आहे. केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषांतही या कथांचे भाषांतर नक्कीच होईल, याविषयी माझ्या मनात शंका नाही. आता सिनेमा, नाटकाच्या दृष्टीने एक मुद्दा. सुतार यांच्या एकूणच साहित्य विश्वातील काही निवडक गोष्टी घेत गावकथा नावाचे एक दीर्घनाट्य काही महिन्यांपूर्वी रंगमंचावर आले आहे. त्यातील दिग्दर्शक, कलावंतांनी ते अतिशय गांभीर्याने आणि पूर्ण मेहनतीने सादर केले आहेच. ‘दोन शतकांच्या...’ वाचताना असे वाटते की साऱ्याच कथांवर एक स्वतंत्र दीर्घांक होऊ शकतो. आणि लघुपट होण्याचीही शक्ती या कथांमध्ये नक्कीच दडलेली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची बीजे मराठवाड्यात रोवणारे निलेश राऊत, सुबोध जाधव यांनी गावकथाचे प्रयोग अविष्कृत होण्यासाठी पुढाकार घेतला आहेच. त्यांनी ठरवले तर काही अप्रतिम लघुपट तयार होऊ शकतील. यु ट्यूब किंवा अन्य जागतिक पातळीवरच्या माध्यमांमध्ये हे लघुपट पोहोचले तर खऱ्या अर्थाने मराठी माणसाचे नाव आणि मराठी गाव, गावातील माणसं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील. 

No comments:

Post a Comment