Thursday 4 April 2019

तो असा इतिहासही रचून गेला

जालना जिल्ह्याचे क्रीडाधिकारी हे त्याचे समाजातील मानाचे पद. पण त्याला आवडायचं ते रंगकर्मी असं बिरुद. तो हे बिरुद अभिमानानं सांगायचा. तेव्हा समोरच्याचे डोळे आपल्यावर पूर्णपणे रोखले जातील, याची काळजी तो घ्यायचा. पण या रोखलेल्या डोळ्यांना चुकवून तो हे जगच सोडून जाईल, असे कोणाला कधी वाटलेच नव्हते. अन्यथा साऱ्यांनीच नजरांची तटबंदी करून त्याला रोखून धरलं असतं. होय, मी तरुण रंगकर्मी संजय वनवेबद्दल सांगतोय. तो या जगात असताना एखाद्या अवखळ, निरागस मुलासारखा होता. मात्र, अकाली कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे जग सोडून जाताना सर्वांना गंभीर करून गेला. नवनव्या कलाकृती सादर करत रंगभूमीवर स्वतःला सिद्ध करणे हे तर आपल्या रक्तातच आहे. पण हे करताना सावध रहा. काळजी घ्या. एकमेकांना मदत करा. आपल्यानंतर आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा गोतावळा असू द्या, असा संदेशही त्यानं दिला. आणि संजयची महती अशी की, त्याचा संदेश मराठवाड्यातील तमाम तरुण रंगकर्मींनी मनावर घेतला. त्याच्या कुटुंबाला आपापल्या शक्तीनुसार मदत तर केलीच. शिवाय असा दुर्दैवी प्रसंग कोणावर ओढावलाच तर त्याच्या कुटुंबाच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणारी यंत्रणा निर्माण करण्याची शक्तीही देऊन गेला. कोणत्याही कुटुंबात, समाजात, कार्यालयात अगदी राजकीय पक्षात अशी काही माणसे असतात. ज्यांचे तसे म्हटले तर रोजच्या धबडग्यात फारसे योगदान नसते. महत्वही नसते. पण तरीही ती अनेकांना हवीहवीशी वाटत असतात. थोर व्यक्तिमत्व नसले तरी त्यांचा वावर अत्यावश्यक असतो. अशा निरलस माणसांना कोणाकडून फारशा अपेक्षाही नसतात. आपण वावरतोय, फिरतोय. सगळ्यांशी बोलतोय. आपल्या क्षमतेनुसार हातभार लावतोय, याच आनंदात ते असतात. थोडेसे पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधील नारायणसारखे. एका अर्थाने ते निरुपद्रवी असल्याने आणि कोणताही प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यात नसल्याने त्यांचे खरंच महत्व आहे का, असाही फालतू प्रश्न काही मंडळी बऱ्याचवेळा विचारत असतात. हा माणूस काही कामाचाच नाही, असे म्हणत अशा नारायणांना हुसकावून लावण्याचाही प्रयत्न सुरू असतो. या प्रश्न विचारणाऱ्यांना काळ उत्तर देतोच. परंतु, निरलसपणे काम करणाऱ्यांचे महत्वही सर्वांसमोर काळच आणून देतो. यातील काहीजण काळाच्या पडद्याआड झाल्यावरही इतिहासात नोंद होईल, अशी कामगिरी करतात. मराठवाड्याच्या रंगभूमीवरून अचानकपणे लुप्त झालेला संजय वनवे त्यापैकीच एक. त्याच्या जाण्याने साऱ्यांनाच धक्का बसला. त्याच्या निधनाची वार्ता कळताच त्याची आईही हे जग सोडून गेली. 
खरेतर संजय काही पट्टीचा अभिनेता नव्हता. नाट्य दिग्दर्शन, लेखन त्याचा प्रांत नव्हता. पण रंगभूमीवर कायम वावरत राहणे. जो कोणी नाटक करतोय. त्याच्या अडीअडचणीला कोणत्याही अपेक्षेशिवाय धावून जात होता. अगदी पडेल ते काम तो करायचा. अगदी पडदा उघडायचा किंवा पाडायचा असेल तरी संजय जबाबदारी स्वीकारायचा. आपण मोठ्या पदावरील शासकीय अधिकारी आहोत, याचा किंचितही अभिनिवेश त्याच्यात नव्हता. असा हा दुर्मिळ रंगकर्मी प्रख्यात लेखक अरविंद जगताप, प्रेषित रुद्रवार, रमाकांत भालेराव, शीतल देशपांडे, सतीश परब यांचा खास मित्र आणि त्यांच्यासारख्या शेकडो कलावंतांच्या गळ्यातील ताईत. घरची परिस्थिती ठीकठाक. त्यामुळे त्याच्या जाण्याने सारे हादरले असले तरी त्याच्या कुटुंबाला मदतीचा विचार पहिल्यांदा कोणाच्या मनात आला नाही. पण म्हणतात ना दुरून दिसते ते सारेच खरे असत नाही. तशीच स्थिती होती. संजयच्या कुटुंबाला सरकारी आर्थिक मदत मिळण्यास किमान एक वर्ष लागणार, असे काही दिवसांतच प्रेषित, शीतल यांच्या लक्षात आले. आणि अरविंद, सतीश, रमाकांत आदींशी चर्चा करून मदतीची योजना आखण्यात आली. संजयच्या नावाने व्हॉटस्‌अप ग्रुप स्थापन करून ज्याला शक्य असेल त्याने यशाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. मराठवाड्यातील रंगकर्मी नाट्य प्रयोगासाठी एकमेकांना मदत करतील. पण अशा स्थितीत खरेच कोण धावून येईल, अशी शंका होती. इतिहासात घडून गेलेल्या काही घटनाही त्यांना आठवत होत्या. पण संजयचे व्यक्तिमत्व म्हणा किंवा रंगकर्मींना काळाने मिळवून दिलेले भान म्हणा. सारेच एकवटले. प्रख्यात अभिनेता मकरंद अनासपुरे, अभिनेत्री गीता अग्रवाल, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्यापासून ते अगदी रंगभूमीवर स्थिरावू पाहत असलेल्या अनेकांनी रक्कम दिली. पाहता पाहता दोन लाखांचा निधी तयार झाला. चार मार्चला तो त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. इथपर्यंत तर कौतुकास्पद होतेच. पण डॉ. सुधीर निकम यांच्या पुढाकाराने आणखी एक पाऊल टाकण्यात आले. मराठवाड्यातील कोणत्याही रंगकर्मीवर असा दुर्दैवी प्रसंग ओढवला तर अडीच लाखापर्यंत निधी उपलब्ध करून देण्याची संजय कलाधार योजना आखण्यात आली आहे. ती पुढील सहा महिने-वर्षभरात कार्यान्वित होणार आहे. एक आदर्श निर्माण करण्यासाठी सारी कलावंत मंडळी पावले टाकू लागली आहेत. त्यांच्या पावलांना चित्त्याची गती, हत्तीचे बळ मिळो आणि हा निधी देण्याची वेळ कोणावरच न येवो, हीच या निमित्ताने संजय वनवेची अपेक्षा असेल नाही काॽ 

No comments:

Post a Comment