Tuesday 1 September 2015

शोधाचे उत्तर

जगातील बहुतांश तत्वज्ञांनी स्वत:चा शोध म्हणजे जीवनाची पूर्णता असे म्हटले आहे. ओशो म्हणतात,  स्वत:चा शोध घेण्याची जिज्ञासा निर्माण होणे, ही देखील अत्यंत महत्वाची पायरी आहे. या जगात दररोज कोट्यवधी प्राणी निर्माण होतात. तेवढेच मरणही पावतात. पण आपण नेमके कोण आहोत? कुठून आलोत? कशासाठी आपण निर्माण झालो आहोत. आपल्या येण्याचे उद्दिष्ट आणि जाण्याचे कारण काय, असे असंख्य प्रश्न माणसालाच पडतात. त्याचे उत्तर शोधता शोधता अनेकांचे जीवन संपते. काहींना त्याचा शोध लागतोही. मात्र, शोधाचे उत्तर काय मिळाले, हे त्यांना कुणालाच सांगता येत नाही. हीच जीवनातील खरी गूढता आहे. हे गूढ उकलणे सध्यातरी विज्ञानाला शक्य झालेले नाही. नाटककार, साहित्यकारांनी  तसा प्रयत्न केला आहे. अर्थात त्यासाठी त्यांनी कल्पनाविष्काराचा आधार घेतला आहे. खरेतर मनुष्याचे जीवन असे आहे की, स्वत:चा म्हणजे स्वयम््चा शोध  घेण्याची प्रक्रिया प्रत्येकाच्या जीवनात एका विशिष्ट वेळी प्रज्वलित होते. ही ज्योत जेवढी तीव्र तेवढ्याच तीव्रतेने स्वयमच्या शोधाचा प्रवास अधिक तीव्र होतो.

बहुतांश वेळी आशा, अपेक्षेच्या धक्क्यातून ज्योत पेटते. कुणीतरी जवळचा व्यक्ती धोका देतो. दूर निघून जातो. मग आपण आपल्या स्वत:चा शोध घेतला पाहिजे, असे वाटू लागते. स्रियांमध्ये स्वयमचा शोध घेण्याची प्रक्रिया अधिक असावी. कारण त्यांचे जीवन पुरुषांच्या तुलनेत अधिक धक्कादायक असते. ज्या पुरुषांवर आपण सर्वाधिक अवलंबून असतो. ज्याच्यासाठी आपण आयुष्याचा बहुमोल काळ खर्ची घातला. तो दुसऱ्या कुणामध्ये अडकल्याचे प्रसंग स्रियांच्या नशिबात जास्त येत असतात. अर्थात हे काही पूर्णांशाने सत्य नसले तरी पूर्णपणे नाकारता येत नाही. अशाच एका स्त्रीने घेतलेला स्वयम शोध पुण्यातील बहुआयामी लेखिका आशा साठे यांनी मांडला.

स्वत:चे विचार आणि अस्तित्वाबद्दल काहीशी बोल्ड, ठाम भूमिका असणाऱ्या कलावंत रमाकडे तिच्याच एका मित्राने लिहिलेले नाटकाचे स्क्रिप्ट येते. त्यातील अनुराधाची भूमिका रमाने करावे, असा त्या मित्राचा आग्रह असतो. नवऱ्याचे दुसऱ्या स्त्रीशी जुळलेले संबंध स्वीकारण्यापर्यंत तयारी असणाऱ्या सोशिक अनुराधाची भूमिका रंगमंचावर साकार करण्यास रमा ठाम नकार देते. पण स्क्रिप्टचे वाचन करत असताना तिला तिचे पूर्वायुष्य आठवू लागते. आपल्यातही एक अनुराधा दडलेली आहे, असे तिला वाटू लागते. आणि हळूहळू ती स्वत:चा शोध घेऊ लागते, अशी वळणावळणाची मांडणी साठे यांनी केली आहे. स्त्री पुरुषांचे नाते-संबंध हा अतिशय गुंतागुंतीचा आणि अनेक कंगोरे असलेला विषय. पुरुषाला स्त्री विषयी प्रचंड आकर्षण असतेच आणि तो ते व्यक्त करत असतो. तसे स्त्रीलाही असते मात्र ते व्यक्त करण्यासाठी तिला अनेक मर्यादा समाजव्यवस्थेने घालून दिल्या आहेत. काही तिने स्वत:हून आखून घेतल्या आहेत. अजूनही स्त्रीच्या बाजूने पुरुषांविषयीच्या आकर्षणाचे, ओढीचे पैलू समोर आलेले नाहीत. म्हणूनच या आकर्षणाचा, नात्याचा, त्यातील सर्व धाग्यांचा तळ आणि त्यातील नेमकेपण सांगणे कठीणच. म्हणूनच की काय अनेक बाजूंनी मांडला तरी हा विषय चर्चिला जातोच. साठे यांनी त्यातील एका धाग्याचे सुरेख विस्तारीकरण करताना स्त्रीचे स्वत:चे अस्तित्व शोधण्याचा केलेला प्रयत्न अधोरेखित केला आहे.

एकेकाळी म्हणजे साधारणत: १२ वर्षापूर्वी दीपा लागू, लालन सारंग यांनी केलेल्या या दीर्घांकाचा प्रयोग नुकताच सभुच्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात पद्मनाभ पाठक यांच्या दिग्दर्शनात झाला. पाठक यांनीही संहितेची धाटणी अभ्यासत त्याचे प्रवाही सादरीकरण होईल. त्यातील आशय टोकदारपणे रसिकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली आहे. मुख्य म्हणजे या नाट्यातील दोन टोकांच्या महिलांमधील अंतरंग, त्यांच्या भाव भावना, एकारलेपण वेगवेगळे दिसत असले तरी ते महिलांमध्ये निसर्गत: दडलेल्या दोन व्यक्तिरेखाच आहेत. ही बाब पाठक यांनी टिपत एकाच कलावंतांकडून दोन्ही व्यक्तिरेखा ठसठशीत कशा होतील, याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे सादरीकरणाची उंची अधिक उंचावली आहे. या नाटकाचे तिसरे आणि अत्यंत महत्वाचे बलस्थान म्हणजे सुजाता देशमुख पाठक यांनी साकारलेली मध्यवर्ती भूमिका. अनुराधा आणि रमा या दोन भिन्न स्वभावाच्या, वेगवेगळा जीवन प्रवास असलेल्या महिला त्यांनी खूपच विलक्षणरित्या उभ्या केल्या आहेत. त्यांचा रंगमंचावरचा वावर, शब्दफेक, चेहऱ्यावरील हावभाव सारेच त्यांच्यातील अभिनयाच्या ताकद प्रगट करणारे होते. विशेषत: रमाच्या भूमिकेतून अनुराधाच्या भूमिकेत आणि अनुराधाच्या भूमिकेतून रमाच्या भूमिकेत प्रवेश करताना त्यांनी खांद्यांना दिलेला जर्क, आवाजातील करारी व कोमलपणा, शरीराचे पोश्चर, इतर लकबी अगदी डोळ्यातील भावही त्यांनी लिलया बदलले होते. त्यांना मणिराज पवार, ऐश्वर्या हुद्दार यांनी छोट्याशा भूमिकेत दिलेली साथही लक्षणीय. विजय पवार, अपूर्व बुद्रूककर, विकी वाघमारे यांचे नेपथ्य, मुस्तजीब खान, विकास पगारे, चेतन ढवळे यांची प्रकाशयोजना, आकाश थोरात यांचे संगीत, जयंत शेवतेकर यांचे नृत्य दिग्दर्शन आणि यशोदा आहेर यांची रंगभूषा संहितेला न्याय देणारी होती.

आता थोडेसे या प्रयोगाच्या मानकऱ्यांविषयी. प्रख्यात अभिनेते संदीप पाठक यांचे वडिल शाम पाठक बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील हरहुन्नरी कलावंत आणि लेखक. त्यांनी तरुण पिढीत नाट्यबीजे रोवली. त्यांच्यावर अभिनय, लेखनाचा संस्कार केला. या संस्काराचा वसा सांगणारे त्यांचे विद्यार्थी संजय शिंदे, अभय देशमुख, सुनिलदत्त कुलकर्णी, ललिता बडवे आदींनी एकत्र येऊन स्वयमच्या सादरीकरणासाठी पुढाकार घेतला. अशी गुरुदक्षिणा देण्याची परंपरा नाट्यकर्मींनी सुरू केली तर औरंगाबादेत अनेक नाट्यप्रयोग होऊ शकतील, होय ना?



No comments:

Post a Comment