Wednesday 30 September 2015

हा ठेवा नव्या रुपात जपायलाच हवा

चौदा कलांचा अधिपती, चौसष्ट विद्यांचा महामेरु असलेल्या गणेशाचा उत्सव अपूर्व उत्साहात साजरा झाला. गणेश भक्तांनी त्यांच्या लाडक्या देवतेला पुढल्या वर्षी लवकर या, दुष्काळाचे अरिष्ट दूर करा, असे साकडे घालत निरोप दिला. त्यात कलावंत मंडळींचाही समावेश होता. मात्र, ही मंडळी यंदा काहीशी हळहळल्या सारखी वाटत होती. कारण गणेशोत्सव म्हणजे विविध कलागुणांचे दर्शन असे स्वरूप गेल्या अनेक वर्षांपासून पाहण्यास मिळत होते. यावेळी कुठेही नाट्य, गायन, चित्र अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांना सादरीकरणाची संधीच मिळाली नाही. केवळ औरंगाबादच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात कमी अधिक फरकाने अशीच स्थिती होती. त्यामागे दुष्काळी वातावरण हे प्रमुख कारण असले तरी कलाप्रांताविषयी वाढती अनास्था आहे. शिवाय कलावंत मंडळीही नव्या वाटा शोधण्यात कमी पडत आहेत, असे वाटते. एकेकाळी गणेशोत्सव म्हणजे कलावंत तयार होण्याची खाण होती. त्याचे मराठवाड्यातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे, प्रख्यात लोककलावंत विश्वास सोळुंके. हे दोघेही मातब्बर. त्यांनी त्यांच्या आठवणीत गणेशोत्सवाचा आवर्जून उल्लेख केला होता. ते सांगत की, गणेशाचे आगमन होण्याच्या महिनाभर आधीच बाल कलावंतांना मेळ्याचे वेध लागत. वाड्यांच्या ओसरीत, गल्लीतील खुल्या जागेत रात्री उशिरापर्यंत तालमी होत. पट्टीचे गीतकार सामाजिक भाष्य करणारी गीते रचत. वादक त्यांना तालात बसवत. उत्स्फूर्त नाट्ये रचली जात. त्यात भूमिका करण्यासाठी कलावंतांमध्ये स्पर्धा असे. समूह गायन, वैयक्तीक गायनाचे संचही तयार असत. रात्रभर अक्षरश: कलावंतांचा जल्लोष असे. टीव्ही नसल्यामुळे लोक प्रचंड प्रतिसाद देत. तो कलावंतांना पुढील वर्षभर पुरत असे. मेळे हे केवळ मनोरंजनाचे नव्हे तर प्रबोधनाचे माध्यम होते. त्या काळातील सामाजिक घडामोडींवर त्यात परखड भाष्य होते. जबाबदारीची जाणिवही करून िदली जात असे. त्यामुळे समाजमन घडवण्याचे मोठे काम मेळ्यांमधून साधले जात होते. १९८४ मध्ये टीव्हीचे आगमन झाल्यावर हळूहळू मेळा परंपरेला ओहोटी लागली. त्याची जागा नाटकांनी घेतली. गणेश मंडळाचे हरहुन्नरी कलावंत छोटेखानी नाट्यप्रयोग सादर करू लागले. त्यात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. काही ठिकाणी हौशी, अर्ध व्यावसायिक नाट्य कलावंतांनाही निमंत्रित केले जात होते. पुरुषोत्तम खोपटीकर, विवेक दिवटे यांनी १९९० च्या दशकात विनोदी नाटकांची बहार उडवून दिली होती. त्यांच्या डार्लिंग डार्लिंग, टूरटूर नाटकांमध्ये मकरंद अनासपुरे, मंगेश  देसाई या सध्या चित्रपट क्षेत्रात नाव कमावलेल्या अभिनेत्यांनीही कामे केली होती. श्रीमंत गणेश मंडळे मुंबई, पुण्याहून व्यावसायिक नाट्य प्रयोगांना निमंत्रण देत. शिवाय बड्या गायकांच्या मैफली होत. जुन्या औरंगाबादेतील मंडळांमध्ये तर ऑर्केस्ट्रा कलावंतांच्या तारखा मिळवण्याकरिता धडपड सुरू असे. हे सारे टप्प्या टप्प्याने विसर्जित होत गेले. त्यामुळे गणेशोत्सव फक्त देखाव्यांपुरता मर्यादित राहिला की काय, असे वाटत आहे. हे चित्र सुखावणारे नक्कीच नाही. त्यावर सर्वांनाच गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. कारण हा केवळ मनोरंजन किंवा कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यापर्यंतचा मर्यादित विषय नाही. तर सामाजिक भान प्राप्त करून देण्याशी याचा संबंध आहे. मेळे, संगीताच्या मैफली आणि नाटकाचे प्रयोग यातून संवेदनशील कलावंत तयार होत होते. समाजात नेमके काय सुरू आहे, याची ते संवेदनशीलपणे नोंद घेत आणि हजारो लोकांपर्यंत पोहोचवत.

त्यांचेही मन घडवण्यात या कलावंतांचा मोठा वाटा होता, हे नाकारता येणार नाही. सर्व जाती, धर्माचे आणि पंथाचे लोक भेद बाजूला ठेवून एका व्यासपीठावर येत होते. त्यातून सामाजिक एकोप्याचा संदेश ठसत होता. बालवयात आवश्यक असलेला सभाधीटपणाचा, वक्तृत्वाचा संस्कार कलावंतांवर होत असे. आणि तो संस्कार खोलवर रुजावा यासाठी वरच्या फळीतील कलावंत मंडळी जाणिवपूर्वक प्रयत्न करत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या या सगळ्या वाटा बंदच झाल्या आहेत. त्या खुल्या करण्यासाठी राजाश्रयाची म्हणजे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. लोकाश्रयाशिवाय सादरीकरण तर होऊच शकत नाही. म्हणून असा काही प्रयत्न झाला तर टीव्हीच्या खोक्यांबाहेर पडून लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे काळाची गरज लक्षात घेऊन कलावंतांनीही नव्या स्वरूपाची निर्मिती करावी. विविध कला दर्शनाची चपखल मांडणी केली. त्याला व्यावसायिकतेची जोड दिली तर हे शक्य आहे. मोठ्या नाटकांचे प्रयोग होणे शक्य नसल्याने दहा मिनिटांचे तीन प्रहसने केली. त्याला तीन-चार जुन्या नव्या गाण्यांची जोड दिली तर उत्तम मनोरंजनाचा कार्यक्रम सादर होऊ शकतो. शेवटी गणेशोत्सव आणि त्यात होणारे विविध कलांचे सादरीकरण हा मराठी माणसाचा ठेवा आहे. तो नव्या रुपात जपायलाच हवा. अन्यथा गणेशोत्सवासारखी महत्वाची चळवळ आपल्या हातून निघून जाईल.



1 comment:

  1. खूपच छान. केवळ मराठवाडाच नव्हे तर विदर्भासह सर्वत्र गणेशोत्सव म्हणजे कलावंत घडवण्याची शाळाच होती. या लेखामुळे भूतकाळात डोकावता आले.
    अतुल पेठकर

    ReplyDelete