Tuesday 22 September 2015

मैफलींचा सुगंध

एका प्राध्यापकाने सांगितलेला किस्सा. २५ वर्षापूर्वी एक जर्मनीचे पर्यटक जोडपे अभ्यास दौऱ्यासाठी बीड शहरात आले. ते चांगले महिनाभर मुक्कामी होते. तेथील सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास संपत आल्यावर या जोडप्याने काही करमणुकीची साधने आहेत का? अशी विचारणा केली. मग प्राध्यापक महोदयाने त्यांना आसपासच्या डोंगरदऱ्यांवर भटकंती करून आणली. तरीही त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. काही करमणूक, मनोरंजनाचे साधन नाही का? आता या जर्मन जोडप्याचे कसे मनोरंजन करावे? असा प्रश्न प्राध्यापकाला पडला. बराचवेळ विचार केल्यावर त्यांना एक कल्पना सुचली. ते त्यांना जवळच्या खेड्यातील एका टुरिंग टॉकीजमध्ये हिंमतवाला चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेले. वाळूच्या ढिगाऱ्यावर मनसोक्त लोळत त्यांनी चित्रपटाचा आनंद घेतला. नंतर सलग चार दिवस हे जोडपे तेथेच मुक्कामी राहून हिंमतवाला पाहात होते. प्राध्यापकाने कुतूहलापोटी अखेर त्यांना विचारले. एवढे तुम्हाला या चित्रपटात काय आवडले? कुणाचा अभिनय चांगला वाटला. त्यावर त्या जोडप्याने सांगितले की, कथा, संवाद तर आम्हाला फारसे कळाले नाहीत. पण त्यातील गाणी हा प्रकार फारच भन्नाट वाटला. आमच्या जर्मन चित्रपटात गाणी वगैरे काही भागच नसतो. चित्रपट गीतांची मनापासून आवड असलेले प्राध्यापक महोदय खूपच खुश झाले. आणि मग या जोडप्याला घेऊन ते बीड शहरात  आयोजित ऑर्केस्ट्रा म्हणजे चित्रपट गीतांच्या मैफलीला घेऊन गेले. ती ऐकून तर जर्मन जोडप्याच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. त्यांनी त्यांच्या अभ्यास  पुस्तिकेत  भारतीय चित्रपट गीते आणि त्यांच्या मैफली असा  विषय घेत त्याचा अभ्यासही केला. चित्रपटातील गीते हुबहू भारतीय कलावंत सादर करतात. त्यात खूपच अस्सलपणा असतो. ही गीते ऐकताना भारतीय रसिक देहभान विसरून जातात. या मैफली म्हणजे  केवळ विरंगुळा नव्हेत तर आनंद मिळवण्याचे ठिकाण असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ही जुनी घटना असली तरी त्यातील अस्सलपणा कायम आहे.

असे म्हणतात की,  नाटक, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, नृत्य, शास्त्रीय व सुगम गायन म्हणजे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून  सुसंस्कृत मनाची जडणघडण होत असते. माझ्या मते भारतीय त्यातही मराठी रसिकाविषयी सांगायचे झाले तर यामध्ये हिंदी, मराठी चित्रपटगीतांच्या मैफलींचाही समावेश करावा लागेल. एवढ्या त्या आपल्याशी एकरूप झाल्या आहेत. अनेक लोक अशा मैफलींची वाट  पाहत असतात. केवळ वाट पाहतात असेच नाही तर तुंबळ गर्दीही करतात. औरंगाबादमध्ये त्याचा वारंवार अनुभव येत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. मल्हार ग्रुप आणि  सूर दरबारतर्फे नुकत्याच झालेल्या ‘जुस्तजू : फिर छिडी शाम’, ‘हमारी आशा’ या सुमधूर मैफलीने कानसेनांना तृप्त केले.  आणि विशेष म्हणजे या तृप्ततेसाठी रसिकांना  एक पैसाही खर्च करावा लागला नाही. नीरज वैद्य यांचा मल्हार ग्रुप गेल्या काही वर्षापासून सातत्याने अशा मैफलींचे आयोजन करत आहे. कधी शिक्षक, कधी अभियंते तर कधी डॉक्टर अशा समाजातील विविध घटकांना त्यांच्या मैफली समर्पित असतात. स्वत:च्या व्यवसायातून मिळणारी रक्कम नीरज आणि त्यांचे सहकारी अखिल अब्बास, हितेन पटेल मैफलींच्या आयोजनासाठी खर्च करत असतात. स्वरसाक्षीचे अतुल दिवे, प्रसाद साडेकर, आलापचे अभिजित शिंदे, सरला शिंदे आणि त्यांचा मित्र परिवारही याच पद्धतीने आयोजन करतात. त्यातून जीवन कुलकर्णी, जितेंद्र साळवी, राजेश भावसार आदी वादक मंडळींनी औरंगाबादकरांना त्यांच्या तालावर ठेका धरायला लावला. संगिता भावसार, कविता वतनी, डॉ. नासेर सिद्दीकी, ईश्वर शर्मा, प्रज्ञा उम्रीकर, शीतल देशपांडे - रुद्रवार यांच्यासारख्या प्रतिभावान गायकांनी त्यांच्यातील ताकद सिद्ध केली. प्रेषित रुद्रवार, नीता पानसरे, दिलीप खिस्ती, डॉ. सर्वेशा महाजन असे उत्तम निवेदक, सूत्रसंचालक अशा मैफलींमध्येच तयार झाले. प्रा. राजेश सरकटे, प्रमोद सरकटे, राम विधाते, बजरंग विधाते, केशव कुंभकर्ण यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठी भक्तीगीत, भावगीतांच्या मैफलींचे आयोजन करून औरंगाबादचे संगीत जगत एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. प्रा. सरकटे तर राज्यातील आघाडीचे राजगायक म्हणून परिचित झाले आहेत. कोणताही मोठी राजकीय, शासकीय सोहळा त्यांच्याशिवाय अपूर्ण राहतो. भक्तीच्या आनंदाची पर्वणी रसिकांना देत असताना त्यातील त्यांचे सातत्य कमालीचे आहे.  संगीत मैफलीच्या तमाम गायक, वादकांना केवळ औरंगाबादच किंवा मराठवाड्यातच नव्हे तर राज्यभरात लोकप्रियता लाभली आहे. मुंबई, पुण्याचे अनेक मोठे कलावंत त्यांच्यासोबत गाण्यास उत्सुक असतात किंवा गाताना येथील वादकांची साथसंगत घेत असतात. या साऱ्यांच्या मैफलीचा सुगंध सांस्कृतिक विश्वाला ताजेपणा प्राप्त करून देत आहे. तो कायम ठेवण्यात येथील रसिकांनीही कसूर ठेवलेली नाही, हे महत्वाचे. पूर्वीच्या काळात गणेशोत्सवाच्या निमित्ताने मेळे होते. त्यात गायक, वादकांना त्यांची प्रतिभा चमकवण्याची संधी मिळत होती. लक्ष्मीकांत देव, दीपा काळे, लक्ष्मीकांत काळे आदींचे ऑर्केस्ट्रा ऐकण्यासाठी औरंगाबादलगतच्या आणि मराठवाड्यातील काही शहरांमधूनही लोक येत. काळाच्या ओघात मेळे लुप्त होत गेले. ऑर्केस्ट्रांचे प्रमाणही कमी झाले. त्यांची जागा तरुण पिढीतील कलावंतांनी वेगळ्या बाजातील संगीत मैफलीतून काही प्रमाणात भरून काढली आहे. शास्त्रीय गायनाची मनापासून आवड असणाऱ्या रसिकांनाही आवडेल, अशी मांडणी असणाऱ्या त्यांच्या मैफलींची सुगंध असा दरवळत राहावा आणि वाढावा. औरंगाबाद स्मार्ट होईल तेव्हा होईल. तोपर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या सुगंधित राहावे, हीच अपेक्षा. ती मुंबई, पुण्याकडे न धावता ताज्या दमाचे गायक, वादक, निवेदक नक्कीच पूर्ण करतील, याची खात्री सर्वांना आहे.

No comments:

Post a Comment