Tuesday 15 December 2015

जाणून घ्या, रंगभूमीवरील दिग्गजांचा कला प्रवास




नाट्यक्षेत्रातील कोणताही कलावंत घडत असताना त्याला एका चांगल्या मार्गदर्शकाची आणि सहकलावंताची गरज असतेच. पण त्याच बरोबर त्याला स्वत:चे एक संवेदनशील मन असावे लागते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींचे कधी तटस्थपणे तर कधी एकरूप होऊन आकलन करावे लागते. निरीक्षणाची एक मूळ शक्ती कलावंत होऊ पाहणाऱ्यामध्ये असतेच. काहीजणांमध्ये ती जन्मजात देणगी म्हणून येते. तर काहीजणांना नाट्यप्रवासात त्याचा उलगडा होत जातो. हळूहळू त्यांची निरीक्षण आणि अनुकरणाची शक्ती वाढत जाते. नाट्यशास्त्र विभागात किंवा नाट्यसंघात काम करणाऱ्या बहुतेकांना याचा अनुभव येतोच. या साऱ्यामध्ये आणखी एका बाबीची गरज असते. ती म्हणजे व्यावसायिक, प्रायोगिक किंवा समांतर रंगभूमीवर काम करणाऱ्या दिग्गजांना जाणून घेण्याचे ओढ असावी लागते. अशा दिग्गजांचा रंगभूमीवरील प्रवास, त्यांची विविध विषयांवरील मते, भूमिका करताना ते करत असलेला अभ्यास किंवा दिग्दर्शन करताना वापरलेल्या क्लृप्त्या याची माहिती असावी लागते. शिवाय ही मंडळी नाटक करतात म्हणजे नेमके काय करतात. त्यांच्या जीवनातील कोणत्या महत्वाच्या घटनांनी ते नाट्यक्षेत्राकडे ओढले गेले आणि स्थिरावले. त्यांची पाळेमुळे कशी रुजत गेली. त्यांच्यासभोवती घडणाऱ्या घडामोडींकडे ते कसे पाहतात. त्यांच्या समोरील अडचणी त्यांनी कशा दूर केल्या. हे सर्व काही नवख्यांना कळाले तर त्यांचे कलावंत म्हणून घडणे अधिक सकस होऊ शकते. मुंबई, पुण्यामध्ये दिग्गजांना जाणून घेण्याची संधी बऱ्यापैकी उपलब्ध होऊ शकते. कारण तमाम बडी मंडळी तेथेच वावरत असतात. त्यांच्या नाटकांचे प्रयोग होतात. कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांना भेटणे, जाणून घेणे सोपे जाते. मात्र, महाराष्ट्रातील इतर भागांत ते शक्य होत नाही. संमेलन, परिषद किंवा नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मंडळी येत असली तरी त्यांच्या मनमोकळा संवाद होणे तसे कठीणच असते. त्यातच ही कलावंत मंडळी डॉ. श्रीराम लागू, बी. व्ही. कारंथ, सुहास जोशी, विजया मेहता, रतन थियम, गिरीश कर्नाड, सतीश आळेकर, सुलभा देशपांडे आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासारखी असतील तर संवाद दुरापास्तच असतो. ही कमतरता पुण्यातील प्रख्यात नाट्य समीक्षक, अभ्यासक माधव वझे यांनी त्यांच्या रंगमुद्रा पुस्तकातून भरून काढली आहे. त्यांनी एक विशेष अभियान हाती घेत या साऱ्यांना बोलते केले आहे. या कलावंतांच्या घडणीमध्ये त्यांच्या बालपणीचा, तरुणपणीचा वाटा किती. तिथून ते रंगभूमीकडे कसे ओढले गेले. रंगभूमीची समकालीनता त्यांच्या दृ्ष्टीने नेमकी कशी आहे. लेखन, अभिनय किंवा दिग्दर्शनाकडे ते कसे पाहतात. नाट्य प्रशिक्षणाविषयी त्यांची मते काय आहेत. शास्त्रीय संगीताप्रमाणे नाट्यक्षेत्रात गुरु-शिष्य परंपरा असते का? असेल तर त्याचे स्वरूप काय आहे. १९६० ते १९९० च्या कालावधीत रंगभूमीवर काय काय घडत होते. त्याविषयी त्यांना काय वाटते, अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी मिळवली आहेत. वझे यांचा नाटकाचा अभ्यास दांडगा. अभिनेता, दिग्दर्शक, नाट्यशिक्षक, समीक्षक अशीही त्यांची ओळख. राज्य नाट्य स्पर्धेत तीनदा उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक त्यांनी मिळवले. शामची आई व वहिनीच्या बांगड्या चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांनी केलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाचे सभासद. या साऱ्यामुळे तमाम दिग्गजांच्या वर्तुळातील एक असे ते होते. तरीही त्यांनी मुलाखती घेताना नव्या पिढीच्या कलावंतांचे प्रश्न गिरीश कर्नाड, विजया मेहतांपर्यंत पोहोचवले. त्यांची निखळ उत्तरे घेतली आणि ती जशीच्या तशी नोंदवलीही आहेत. घाशीराम कोतवाल या जगप्रसिद्ध नाटकाचे संगीतकार भास्कर चंदावरकर यांना घाशीरामविषयी फारसे प्रश्न विचारलेले आवडत नाही, असे कळाल्यावर त्याभोवतीचे प्रश्न विचारून त्यातील मर्म जाणून घेण्याचे त्यांचे कसब मुलाखत वाचल्यानंतरच लक्षात येते.
रंगभूमीवरच नव्हे तर चित्रपट, मालिकांमध्ये ठसा उमटवणाऱ्या या कलावंतांना इतर कलावंतांविषयी काय वाटते, असा एक मूळ प्रश्न असतो. त्याचेही उत्तर त्यांनी मिळवले आहे. त्यातील काही धक्कादायक आहेत. म्हणजे सुहास जोशी म्हणतात की, विजया मेहता रंगमंचावर बोलतात - ती त्यांची एक पद्धत आहे. त्यांचे स्वर वेडेवाकडे असतात. सुलभा देशपांडेच्या मते सुहास जोशींना पाहताना वाटते की विजयाबाई डोकावतात त्यांच्यामध्ये. विजयाबाई नटमंडळींबद्दल भाष्य करतात. त्या म्हणतात की, आपल्याकडे नटाच्या मोकळेपणाबद्दल वेगळे प्रश्न आहेत. आपल्या नटांना शॉर्टकट घेण्याच्या सवयी लागल्या आहेत. त्यातून त्याला कसं मोकळं करायचं, हा प्रश्न आहे. तो अधिकाधिक संवेदनाक्षम कसा होईल. येणारे नवनवीन अनुभव स्वीकारण्याच्या मन:स्थितीत त्याला कसं आणायचं, हा आपल्याकडे प्रश्न आहे. नट अनेकदा अति नैसर्गिक अभिनयशैलीत अडकतात. नटसम्राटचे दिग्दर्शक पुरुषोत्तम दारख्हेकर यांच्याविषयी डॉ. श्रीराम लागू म्हणतात की, माझ्या भूमिकेत त्यांनी हस्तक्षेप केला नाही. मी तालमीतून बाहेर पडल्यावर ते इतरांना सांगायचे , हे पाहा डॉक्टर प्रायोगिक रंगभूमीवरचे आहेत. ते त्यांच्या पद्धतीने काम करणार. प्रभाकर पणशीकर यांनी जयवंत दळवी आपल्याचे कादंबऱ्यांचे कानामात्रा बदलून नाटककार झाले, असे विधान केले. विजय तेंडूलकर लिहितात ते तेवढं विदारक दर्शन म्हणून त्यांची पाठ थोपटणं मला मान्य नाही, असेही ते म्हणतात. गिरीश कर्नाड, कारंथ आणि पूर्व भारतातील महान दिग्दर्शक रतन थियम यांची एकूण भारतीय नाट्य परंपरेविषयीची मते नव्या पिढीच्या ज्ञानात भर टाकणारीच आहेत. त्यामुळे हे पुस्तक नाट्यक्षेत्रासाठी एक महत्वाचा दस्तावेज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह सर्वच नाट्यशास्त्र विभागात त्याचा अभ्यास व्हावा. अभ्यासक्रमाच्या पातळीवर करणे शक्य नसले तर ज्यांना कलावंत म्हणून उत्तुंग शिखर गाठण्याची इच्छा आहे. त्यांनी वैयक्तीक पातळीवर त्याचे जरुर चिंतन करावे, असे वाटते.

No comments:

Post a Comment