Wednesday 23 December 2015

स्नेहांकित : मैत्र रंगकर्मींचे

  

 व्यावसायिक, हौशी, समांतर रंगभूमीचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड क्षमता असलेली मंडळी त्यावर एकत्र येतात. काही दिवस रसिकांना काहीतरी भन्नाट, अचाट प्रयोग  पाहण्यास मिळतात. चकित करणारे विषय मांडले जातात. त्यातून काही जण विलक्षण प्रतिभेचे असल्याचे लक्षात येऊ लागते. आणि त्यानंतर काही वर्षांतच हे रंगकर्मी वेगवेगळ्या रस्त्यांनी निघून जातात. त्यातील मोजके जण चमकदार कामगिरी करत राहतात, तर बहुतांश जण नोकरी, व्यवसाय आणि संसारात अडकून जातात. ते कालांतराने नाट्यप्रयोग पाहण्यापुरतेच राहतात. अगदी मुंबई, पुण्यातील रंगायन, अाविष्कार, पीडीए ते औरंगाबादेतील रंगकर्मी, नाट्यरंग, दिशांतर अशा संस्थांची  उदाहरणे देता येतील. आठ, दहा वर्षांपलीकडे अशा रंगकर्मींचा एकत्रित प्रवास राहत नाही, असा अनुभव आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दशकांपासून म्हणजे तब्बल तीस वर्षे कार्यरत असलेल्या स्नेहांकित संस्थेचे योगदान अमूल्य आहे. नाट्य प्रयोग करत राहणे, एवढेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत केलेला त्या साऱ्यांचा निरंकारी प्रवास थक्क करणारा आहे. १९ डिसेंबर रोजी स्नेहांकितच्या तीन दशकपूर्तीचा सोहळा तापडिया नाट्यमंदिरात झाला. त्यास तमाम रंगकर्मी आवर्जून उपस्थित होते. 

 मराठी रंगभूमीच्या इतिहासात नोंद होणाऱ्या संस्थेची पायाभरणी १९७९ मध्ये झाली. त्या वेळी औरंगाबादेत सिडको-हडकोची वसाहत अस्तित्वात आली होती. तेथे मराठी कुटुंबांचे प्रमाण लक्षणीय होते. मराठवाड्याच्या विविध शहरांतून आलेली धनंजय सरदेशपांडे, रमाकांत मुळे, शरद कुलकर्णी, बबन माळी, दिनेश मानवतकर, श्रीकांत देशपांडे, अरुण दप्तरे, सुनिल कुलकर्णी, बाबा शेडगे, मोहन वाखारकर, मदन मिमरोट, जितेंद्र दाशरथी ही तरुण मंडळी  सांस्कृतिक चळवळीत काही योगदान देता येईल का, याचा विचार करत होती. प्रस्थापित कलावंत, नाट्यसंघांकडे अनुभवासाठी जाण्याऐवजी त्यांनी स्वत:चा छोटेखानी ग्रुप तयार केला. धनंजय यांच्याकडे लेखनाचे कौशल्य होते. त्यांनी निष्कलंक, वृक्षारोपण झालेच पाहिजे, अशा सामाजिक आशयाच्या एकांकिका लिहिल्या. रमाकांत मुळे यांच्यात प्रत्येक विषयाच्या तळाशी जाऊन खोलवर विचार करण्याची प्रचंड क्षमता. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. दोन्ही  एकांकिकांसह ‘गणपती बप्पा हाजीर हो’ हे बालनाट्य लोकप्रिय झाले. १९८५ पर्यंत एकत्रितपणे काम केल्यावर आपल्या सर्वांची मने जुळली आहेत. आता आपण एक संस्था स्थापन केली पाहिजे, असा विचार मुळे यांनी मांडला आणि स्नेहांकितचा जन्म झाला.   

 धनंजय यांनी लेखन करायचे, मुळे यांनी ते  दिग्दर्शित करायचे आणि शरद कुलकर्णी, दिनेश मानवतकर, श्रीकांत देशपांडे, ज्योती सातघरे, अंजली कुलकर्णी आदींनी त्यात भूमिका करायच्या. गंगाधर भांगे, शरद हिवर्डे, मोहन वाखारकर आदींनी तांत्रिक बाजू सांभाळायच्या अशा जबाबदाऱ्या ठरवण्यात आल्या. स्थापना होतेवेळीच रोपण खड्डा ओपन ही एकांकिका धनंजय यांनी लिहिली होती. ग्रामीण भागात वृक्षारोपण मोहिमेची कशी वाट लावली जाते, याची भेदक मांडणी त्यात होती. प्रत्येक व्यक्तिरेखेला ठसठशीत करण्याची किमया त्यात साधण्यात आली होती. मुळे यांनी संहितेची मूळ बांधणी अधिक घट्ट आणि आशयपूर्ण केली होती.  पाहता पाहता ‘रोपण’ लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. प्रत्येक स्नेहसंमेलनात, स्पर्धांमध्ये त्याचे प्रयोग गाजू लागले. स्नेहांकितशिवाय इतर तरुण, हौशी मंडळी गावोगावी प्रयोग करू लागले. १९८७ ते १९८९ या काळात तर औरंगाबादेतील त्या वेळचे रंगकर्मी ‘मी रोपण करतोय,’ असे अभिमानाने सांगत होते.  दुसरीकडे स्नेहांकितने ‘अब तुम्हारे हवाले वतन’, ‘कशाचा भारत बसलो चरत’ ‘इथं वेळ आहे कुणाला’, ‘गर्भरेषा’, ‘फारच टोचतंय’या एकांकिकांचा धडाका लावला होता.  

 त्यानंतर त्यांनी दोन अंकी नाटकांकडे लक्ष वळवले. यकृत, खोल खोल पाणी, महापूर ही प्रख्यात लेखकांची नाटके केली. त्यातील बारकावे जाणून घेतल्यावर धनंजय यांनी मराठी रंगभूमीचे लक्ष वेधणारी उलगुलान, तर्पण, वेग वाळूचा या दोन अंकी संहिता लिहिल्या. या साऱ्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळालाच. तर्पणचे हिंदीत रूपांतर झाले. राज्य नाट्य स्पर्धेत तिसरा क्रमांकही पटकावला.  

 एकीकडे एवढे लक्षणीय यश मिळत असतानाही स्नेहांकितच्या एकाही कलावंताच्या डोक्यात हवा शिरली नाही. आपापली नोकरी, व्यवसाय सांभाळून ही मंडळी झपाटून जात काम करत राहिली. बऱ्याच वेळा एखाद्या संस्थेत स्थिरावलेल्या उत्कृष्ट कलावंताला दुसऱ्या संस्थेतून निमंत्रण येते. आणखी यश, नवा अनुभव अशा नावाखाली तोदेखील दुसऱ्या संस्थांमध्ये  काम करू लागतो आणि हळूहळू मातृसंस्थेला दुरावतो; पण स्नेहांकितबद्दल असे काहीच झाले नाही.  इतर संस्थांच्या नाटकांमध्ये काम करत असतानाही स्नेहांकितबद्दलच ओलावा, आपुलकी मुळीच कमी झाली नाही. उलट नंदू काळे (सीआयडी मालिकेचे सहायक दिग्दर्शक), मंगेश देसाई (मराठी चित्रपटातील लक्षवेधी अभिनेता), रोहित देशमुख (जय मल्हार मालिका) योगेश शिरसाट, विनित भोंडे  (कॉमेडीची बुलेट ट्रेन), गटशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, गजेंद्र बिराजदार, मधुकर कांबळे, प्रेषित रुद्रावार यासह अनेक जण स्नेहांकितसाठी काम करत राहिले. नंदू काळे यांनी दिग्दर्शनाचा पहिला धडा स्नेहांकितमध्येच गिरवला. सहसा नाट्य संस्थांमध्ये परस्परांबद्दल छुपा द्वेष असतो. तो अनेक स्पर्धा, महोत्सवाच्या निमित्ताने कमी-अधिक प्रमाणात उघड होतो. धनंजय सरदेशपांडे, रमाकांत मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी द्वेषाला कधीच थारा दिला नाही. उलट दुसऱ्या संघांचे नाट्य प्रयोग यशस्वी होण्यासाठीच मदत केली. इतरांचे सादरीकरण झाल्यावर त्याचे कौतुक करण्यात, प्रोत्साहन देण्यात, मार्गदर्शन करण्यात कधीच हात आखडता घेतला नाही.  खऱ्या अर्थाने त्यांनी मैत्र रंगकर्मींचे अशी भूमिका मनापासून बजावली. त्यामुळेच त्यांचा इतका दीर्घ अन्् आदर्श  प्रवास अनंत अडचणींना तोंड देऊनही यशस्वी झाला. नव्या पिढीच्या कलावंतांना सोबत घेत, घडवत तो यापुढेही असाच होईल, याविषयी मुळीच शंका नाही.



1 comment:

  1. श्रीकांत, खूप छान लिहीलंयस रे.... मी त्या सोहळ्याला येऊ शकलो नाही ही खंत मनात आहेच, पण तुझा हा लेख वाचून छान वाटलं. यातील रोपण, तर्पण अशा अनेक प्रयोगांचा मी एक भाग होतो... खूप अभिमान वाटतो. धनुदा, मुळे सर, शरददा, अरुण, ज्याेती, श्रीकांत, दिनेश, मदन, अनू, अंजू, नंदू, मंगेश..... मिस करतोय ते सगळं.......

    ReplyDelete