Friday 25 December 2015

देह देवदान


देह देवदान 
-- १ --

अजगराच्या आतड्यासारखी पसरलेली अंधारी बोळ तिच्या अगदी सरावाची झाली होती. कोणी रुमालाने बांधून डोळे झाकले तरी ती सहज बोळ पार करू शकली असती. 
पंधरा-वीस हात लांबीची बोळ संपली की धुरकट झालेल्या, झिजलेल्या लाकडी पायऱ्या. प्रत्येक पायरीवरील पोत्याची पायपुसणी. 
नाव प्रिन्स पॅलेस असलं तरी तिथं ना कधी प्रिन्स येई ना इथल्या खोल्या पॅलेससारख्या. 
इथं येणारे-जाणारे लोकच वेगळे. प्रत्येकाचे चेहरे वासनांनी रंगलेले. वखवखलेले, पेटलेले, भुकेले लोक येथे दुपारपासून येतात आणि पेटलेल्या भट्टीत लाकडानं स्वतला झोकून द्यावं तसं भडभडून पडतात. 
रेल्वेस्टेशनच्या पाठीलाच लागून पॅलेसची भिंत. दररोजच्या वीस-पंचवीस रेल्वेगाड्या, पाचपन्नास मालगाड्या धडधडून जातात. तेव्हा पॅलेससोबतची दहाबारा हॉटेलं, खानावळी दमेकऱ्यासारख्या खोकतात. त्याचीही तिला सवय झालीय.  पण ती पहिल्यांदा गिऱ्हाईकासोबत आली तेव्हा फार घाबरली होती. त्यात तो कॉलेजचा पोरगा होता. तिच्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी लहान. तेव्हा थेट तिसऱ्या मजल्यावर तिला रेल्वेचा हादरा जाणवला होता. तोही दचकला होता. पण हळूहळू भीती गेली. आता तर हादरे नसले तर तिला मजाच येत नव्हती.
गेल्या काही वर्षांपासून ती न चुकता येत होती इथं. तिची चप्पल उंच टाचेची. अणकुचीदार टोकाची. नेहमीच नव्या फॅशनच्या चपला घालायची आवड. पायपुसण्यातला चिखल कधी तिच्या पायाला लागला नाही. अंधाऱ्या बोळीत कधी पाय लडखडले नाही तिचे. फक्त चपलेच्या टाचाचे टोक निमुळते होत गेले आणि ब्लाऊजच्या पाठीचा, गळ्याचा आकार वाढत गेला.
प्रिन्स पॅलेसवर कितीही पटवून आणलं असलं तरी सोबतचा माणूस नाराज होतो बोळीत पाऊल ठेवताना. नवखा असेल तर चीड-चीड करतो तो. समजता समजत नाही. मग कमरेत हात घालून,  एखादवेळी थेट त्याच्या खिशातून खाली स्पर्श करत आणावं लागतं त्याला. एखादा तर पैशातही कमी करायला बघतो. तीदेखील काही कमी नाही म्हणा. गोड बोलून, गळ्यात हात टाकून, मुरका मारून पैसा काढून घेण्याची टॅक्ट जमवून घेतली आहे तिनं. गिऱ्हाईक बोळीत आलं की त्याच्याशी लगट करत त्याला गरम करायचं, ते अभ्यासासारखं पाठ केलं होतं. 
अलीकडं या पाठांतराचीही तिला कंटाळा आलाय. तेच लोक. तेच चेहरे. त्याच अंधारलेल्या खोल्या. काळपट पडदे. हिरवे, पिवळे दिवे. तोच धंदा. थोडासा पैसा पदरात पाडून घेण्यासाठी दिवसरात्र परेशानी. अधून-मधून पोलिस आहेतच. त्यांच्यासाठी कधी पैसे, तर कधी रात्र काळी. पोलिस स्टेशनच्याच खोलीत. सुरुवातीला झाला त्रास; पण आता सगळंच अंगवळणी पडलंय.
घरी दोनशे आणि खर्चायला शंभर रुपये मिळवायचे एवढंच डोक्यात ठेवून घराबाहेर पडते ती. पूर्वीची गोष्ट वेगळी होती तिची. हजार-दीड हजार, अगदी दोन हजार पण मिळायचे. नोटांच्या गादीवरच झोपवायचे काही जण. म्हणून तर दोन खोल्यांचं घर झालं. पोराला बऱ्यापैकी शाळेत टाकता आलं. बापाचंं दवाखान्याचं एवढं मोठं बिल एकाच फटक्यात मोकळं झालं. 
त्या काळात ती कारमधूनच फिरायची. कधी मालकाची, तर कधी ट्रॅव्हल्सची. त्या वेळी तिला वाटायचं की हे असंच सुरू राहील. पैसा कमी होऊन होऊन किती कमी होईल. हजाराऐवजी पाचशे मिळतील. दोनाच्या ऐवजी चार जण गाठावे लागतील.
पण तिला वाटलं तसं कधीच तिच्या आयुष्यात घडलं नाही. अगदी दहावीत भेटलेल्या वसंतापासून ते तीन वर्षांपूर्वी कुंकू पुसलं जाण्यापर्यंत.
बरा चालला होता संसार. रिक्षावरून टेंपो घेतला होता प्रकाशनं. आपल्यालाही घराबाहेर फार पडायची गरज राहिली नव्हती. त्यानं अटच घातली होती ना लग्नापूर्वी. तरीही कधी पैशाची नड पडली तर जावंच लागायचं; पण ते आपल्या मनावर होतं. पैसा मनासारखा मिळत असला तरच जायचो. तेही देवाला मान्य झालं नाही. टेंपो उडवून टाकला ट्रकनं.
सगळं आठवायला तिला वेळ नव्हता. इच्छाही नव्हती. तिनं मागं घडून गेलेल्या सगळ्या काळ्याकुट्ट घटनांचं गाठोडं बांधलं अन् थुंकीची लांबलचक पिचकारी सोडली.
तेवढ्यात मागून आवाज आलाच गुल्ल्याचा.
छाया... ओ छाया चहा घ्यायची का? 
रोज काय विचारतोस. ठेव काउंटरवर. 
वैतागलेल्या आवाजात तिनं उत्तर दिलं. तिला त्याच्याशी बोलण्याचा कंटाळा आला होता. पण प्रिन्स पॅलेसमध्ये घडणाऱ्या सगळ्या घटना-घडामोडींची माहिती तिला गुल्ल्याकडूनच कळणार होती. त्यामुळं त्याला टाळणं कठीण होतं. साडेअकरा वाजले तरी सेठ अजून काउंटरवर आला नव्हता. गेल्या चार-पाच दिवसांपासून भेटलाच नव्हता. तिची नेहमीची तिसऱ्या मजल्यावरची चांगली खोली तिला अलीकडं मिळत नव्हती. त्या मागं नेमकं काय कारण हे तिला गुल्ल्याच सांगू शकत होता.
म्हणून चहाचा ग्लास ठेवताच तिनं त्याच्यावर नजर रोखली. पदर खांद्यावरून पूर्ण घसरू देत डावा डोळा किंचित बारीक करत म्हणाली, 
‘काय रे, सेठ कुठंय चार-पाच दिवसांपासून. रोज मी त्याला विचारून जातीय. मोबाइलही उचलत नाही माझा. पैसे पण दिले नाहीत माझ्या वाट्याचे. काय गावाला गेलाय की काय.’
मजबूत हाडापेराचा, किंचित बसकं नाक असलेला गुल्ल्या चेहऱ्यावरची रेषही न हलवता तिच्या समोरच्या सोफ्यात रेलला. ‘स्साली चार वर्षांपूर्वी अंगाखाली आली असती तर जिंदगीत तहलका झाला असता. आता पार उतरलीय. शंभर-दोनशेचं गिऱ्हाईक मिळवण्यासाठी रेल्वेस्टेशन, बसस्टँडवर फिरावं लागतंय हिला.’
हा आपल्याशीच एेश करायला बघतोय, हे त्याच्या नजरेवरून लक्षात आलं; पण दुसरा पर्याय पण नव्हता. ती उठून सरळ त्याच्या बाजूला जाऊन बसली. अगदी चिकटून. नवीन पोरींची चटक लागलेल्या गुल्ल्याला त्या चाळीस बेचाळीस पावसाळे-उन्हाळे ओलांडून गेलेल्या शरीरात रस उरला नव्हता. तो पटकन उठत म्हणाला,
‘चला, मला खोल्या आवरायच्यात. तुझ्या बाजूला बसलो तर कामंच होणार नाहीत.’
त्याच्या अशा उठून जाण्यानं छायाचं डोकं भडकलं होतं.
चाळिशी ओलांडली म्हणून हॉटेलमधल्या स्वयंपाक्यानं, आपलीच भाड खाणाऱ्यानं आपल्याला झटकून टाकावं? चेहऱ्यावर सुरकुत्या नाहीत आपल्या. पोटावर थोडं टायर वाढलंय. डोळ्याखाली काळी रेष दिसतीय. पण फिगर काही एवढी कामातून गेलेली नाही. बेडवर तिघांना भारी आपण. आणि हा गुल्ल्या तरी कोण? पोळ्या-भाज्या, चिकन-मटण करणारा. 
सेठसोबत वीस वर्षांपासून काम करतोय, या पलीकडं काय लायकी आहे त्याची. नुसता लाळ घोटत होता. फुकटात पाहिजे होतं त्याला सगळं. तरीही सगळा अपमान गिळत ती पुन्हा त्याच्याजवळ गेली. आवाजात आणखी गोडवा आणत म्हणाली
ए, राजा...सेठ कुठं गेलाय. माझ्या नोटा ठेवल्यात का त्यानं. चल रूमची चावी तरी देऊन टाक ना. मी तयार होते.
गुल्ल्यानं किचन बॉक्समध्ये लावलेली किल्ली काढून तिच्या अंगावर भिरकावली. 
चांगली तयार होऊन ये. आज तीन तरी गिऱ्हाईकं झाली पाहिजेत.
आँ, माझ्या गिऱ्हाईकांची तुला काय काळजी. तीन मिळतील नाही तर दहा.
दहा? तुला?
का. केली नाहीत का मी? 
ए...छाया...मला नको सांगू हां. आणलेली दहा गिऱ्हाईकं तू कशी वाटी लावली ते. दारूच्या नशेतल्या पोरांना तर काय झालं तेच कळत नव्हतं. फक्त ब्लाऊज उतरवताच गळून जात होती पोरं...
ऐ धंद्यात बेइमानी केली नाही हां कधी. तुझा विश्वास नाहीये माझ्यावर...
तुझ्यावर? वीस वर्षांपासून धंद्यात असलेल्या बाईवर? एकेकाळी होता तुझा धंदा छाया. गिऱ्हाईक तुला शोधत फिरत होतं. मुंबई, पुण्याहून येऊन घेऊन जायचे तुला. राजस्थान, दिल्लीचे सेठ लोक माणसं पाठवायचे. एसी कारनं, रेल्वे फर्स्ट क्लासनं  गेलीस तू त्या वेळी. पण आता तसं राहिलं नाहीये. एक्सपिरिअन्स एवढा झालाय तुझ्याकडं की तू आँटी व्हायला पाहिजे. पण तूच अजून तोंड मारत फिरते इकडं तिकडं. कॉलेजची पोरं पकडतेस. त्यांच्याकडून काय पैसे मिळणार. रात्रभराचा मोठा कस्टमर पाहिजे. तुझी, तुझ्या धगड्याची अन् पोराची काळजी वाटते म्हणून बोलतोय मी. कडवं प्रवचन आहे गुल्ला महाराजाचं. वाईट दिवस येण्याच्या आधीच शहाणी होऊन जा. पोरा-सोरांपेक्षा जरा म्हातारे, कारवाले पकड. पैसा जास्त अन् शरीरालाही त्रास कमी.
असे अपमानाचे अनेक क्षण तिने पचवले होते. पोलिस ठाण्यात दोन रात्री ती नागडीच बसली होती. एकदा हैदराबादला तर इन्सपेक्टरीणबाईनंच मजा लुटली होती. नंतर मारहाण करून हैदराबादबाहेर आणून सोडलं होतं. तिथून दहा किलोमीटर चालत येऊन मग ती एका स्टॉलवाल्यासोबत रात्र घालवून परतली होती. त्या वेळी ती इन्सपेक्टरीण तोडक्या मोडक्या हिंदीत हेच तर सांगत होती. तिच्यापेक्षा गुल्ल्याचं बोलणं अधिक खुपणारं, दुखावणारं होतं. त्यात खरेपणा होता. गिऱ्हाईक मिळवता मिळवता नाकीनाऊ येत होतं तिला. दोन दिवसांपासून एकही जण फिरकला नव्हता. बसस्टँड, रेल्वे स्टेशनला चार-पाच चकरा झाल्या. कॉलेजेसपाशी घुटमळून पाहिलं. एक फालतू सिनेमाही पाहिला. पण नाहीच. सगळ्यांना कॉलेजच्या पोरीच पाहिजे होत्या. अन् कॉलेजच्या पोरांना कमी पैशात ट्रिपल सीट चालायचं होतं. 
एक जबरदस्त सणक गेली तिच्या अंगातून. समोरच्या भिंतीवर लावलेल्या गणपती, लक्ष्मी, तिरुपतीच्या फ्रेमकडं तिनं त्वेषानं कटाक्ष टाकला. उद्या शांतारामला, पोराला जेवायला मिळालं नाही तर माझ्या घरात काही काम नाही तुमचं, तिनं देवांना बजावलं. अन् सारं अवसान एकत्र करत खोलीचं कुलूप उघडलं.
शॉवरचं थंडगार पाणी अंगावर पडताच छायाच्या अंगात जणू नवं जीवन संचारलं. चेहऱ्यावर हास्य उमटलं. ओलेत्या अंगानंच ती बाहेर आली. आरशासमोर उभी राहून स्वत:ला न्याहाळू लागली. डोळ्याखाली बारीक काळसर रेष आली होती. पर्समधून लाली काढून तिनं रेषा पुसून टाकल्या. निळेशार लिपस्टिक ओठांना चोपडलं. डोळ्यांमध्ये भरपूर काजळ भरले. मग स्वत:लाच एक छानसा डोळाही घातला. केस विंचरून छान अंबाडा बांधला. मग कपाटातला छानसा काळपट हिरव्या रंगाचा, भल्या मोठ्या पाठीचा स्लीव्हलेस ड्रेस बाहेर काढून अंगावर चढवला. गॉगल कपाळावर खोचला. त्याच झोकात किल्ली गुल्ल्याच्या अंगावर फेकली आणि  त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत तिनं पायऱ्या उतरल्या.

-- २ --

बसस्टँडवर गिऱ्हाईक मिळणारच. तिला पक्की खात्री होती. पण गुल्ल्याचं बोलणं घुमत होतं. मोठं पाकीट पाहिजे. बसस्टँडवर सगळे खेडेगावातले. पन्नास- शंभर रुपये जास्त देतील. गुल्ल्या स्साला. हरामी. छाया...छाया करून अंगचटीला येतो. मांडीवर बसवायला बघतो. पण अजून त्याला मी कळालेलीच नाही. माझं नाव छाया नाही. प्रभा आहे. प्रभावती दिलीप गोंदेकर. हेही त्याला २० वर्षांत कळालं नाही. पण या धंद्यात नावाला काय अर्थय म्हणा. छाया काय, माया काय, डॉली, शबनम, पारु, रेखा, सुनीता...सगळ्यांचं नशीब एकच. 
तिच्या कपाळावर चिंतेचं जाळं पुन्हा तयार झालं. सेठ आता आला असेल हॉटेलवर. गुल्ल्या त्याचे कान भरत असंल. पैसा पाहिजे सेठला. सेठचंही बरोबर होतं. त्याला पोलिस, नगरसेवक, फुटकळ कार्यकर्ते सगळ्यांनाच पैसा द्यावा लागत होता. एखादा अगदीच ऐकत नसला तर पैशांनी तर तो एखादी पोरगी पाठवून देतो त्याच्याकडं. छायालाही दोन-तीन वेळा जावं लागलंच होतं. पण मजा आली. पैसाही मिळाला. रात्रभर परेशान करणाऱ्या साहेबाला तिनं असंच पाठलाग करून एका हॉटेलात गाठलं. तो त्याच्या साहेब अन् मित्रासोबत होता. अलीकडच्या टेबलावर बसून कचकन डोळा मारला तर पंटरमार्फत पाचशेची नोट पाठवली होती त्यानं.
आता फार मोठा माणूस झालाय तो. तसा गठायला पाहिजे पुन्हा  एकदा. म्हातारपणी त्याची साथ मिळू शकते. पण त्यालाही बायका-पोरं आहेत. तो कशाला सांभाळेल आपल्याला. देव...तिच्या डोळ्यासमोरून रांगेने साऱ्या देवांच्या मूर्ती येऊन गेल्या. तशी ती पचकन थुंकली. 
चटचट पायऱ्या चढून बसस्टँडच्या भल्या मोठ्या बाजारात शिरली. ते हजारो लोकांनी भरलं होतं. दुपारचे दोन-अडीच वाजले होते. आपल्याकडं कोण कोण पाहतंय, हे कोपऱ्यातून न्याहाळत तिनं चाल मंदावली. चेहऱ्यावर हसू पांघरत ती मुद्दाम दोन- चार जणांच्या अंगाला अंग घासून गेली. पण आज काय झालं होतं कुणास ठाऊक. कुणी फारसा प्रतिसाद दिला नाही. दहा-पंधरा मिनिटांत तिनं सगळे प्लॅटफॉर्म  धुंडाळले. पुस्तकाच्या दुकानासमोर घुटमळली. कँटीनमध्ये बसून एक कप चहा पिऊन पाहिला. तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या काही गावरान खेडूतांना डोळ्यांनी खुणावून पाहिलं. पण उपयोग होईना. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तिला हाच अनुभव येत होता. आता इथं थांबून फार वेळ जाईल, हे तिच्या लक्षात आलं. मग तिने तिच्या खात्रीच्या हॉटेलकडं नजर टाकली. दोन-चार जण बाहेर उभे होते. पण ते तिला भरवशाचे वाटले नाहीत. शिवाय त्यांच्या हातात प्लास्टिकच्या पिशव्या होत्या. म्हणजे त्यांना बाहेरगावी जायचे असणार. तासभर थांबायची अशांची तयारी नसते, हे अनुभवावरून तिला माहिती होते. 
म्हणून ती थेट हॉटेलात शिरली. काउंटरवर बसलेल्या बाबा पठाणला आदाब करून थेट कोपऱ्यातील खास टेबलावर तिने पर्स फेकली. बेसिनपाशी जाऊन नळ सोडला. कोणत्या टेबलवर कोण बसलंय, ते आरशातून मागे पाहत न्याहाळून घेतलं. मग पर्समधून रुमाल काढला. पाणी पुसले. पुसता पुसता चौथ्या नंबरच्या टेबलावर माणसाकडे तीक्ष्णपणे पाहून एक डोळा बारीकही केला. काही क्षण तिने त्याच्या प्रतिसादाची वाट पाहिली. तो तिच्याकडे रोखून पाहतच होता. निम्मे काम झाले होते. तो बऱ्यापैकी पैसेवाला दिसत होता. दिसायला पण ठीकठाक होता. हा हातातून सुटला तर...विचारानेच तिचे मन थरथरले. मग तिने फारसा वेळ घालवला नाही. टेबलावर वसून तिने मुद्दाम वेटरला मोठ्याने एक गोल्डन चहा अशी ऑर्डर दिली. ते देत असताना गिऱ्हाईकाकडे मंदसे स्मित फेकले. तसा तो घायाळ झाला. टक लावून तिच्याकडे पाहू लागला. पाच मिनिटांत पुढचा व्यवहार पक्का. याला रिक्षातूनच घेऊन जाऊन पॅलेसवर, असेही तिने ठरवून घेतले. तेवढ्यात तो उठला. काउंटरपाशी पोहोचला. तिला खुणावतच त्याने तिच्या चहाचे पैसे देऊन टाकले. तशी ती झटपट उठली. पर्स उचलून घेत त्याच्यापाशी जाऊन पोहोचली. तसा त्याचा चेहरा तिला अगदी स्पष्ट दिसला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. पूर्वीची ओळख असल्यासारखी. इतके गिऱ्हाईक पाहिले. त्यात कुणाचाही चेहरा निरखून पाहण्याच्या भानगडीत ती कधी पडली नव्हती. पण तरीही  पाहिल्यासारखे वाटत होते. या अवघडलेल्या स्थितीतून त्यानेच तिची सुटका केली. 
मी सुरेश...सुरेश भाबळे...तुमच्या पलीकडं तीन गल्ल्या सोडून राहतो. प्रकाशसोबत आलो होतो मी तीन वर्षांपूर्वी तुमच्या घरी. 
हं...हरामी...तरीही अधाशासारखा बघत होता. आपल्याला दुरून लक्षातच आलं नाही. आणि आता याला कसं इथूनच कटवायचं. ती मनाशी बोलता बोलता त्याच्याशी लपवाछपवी करत बोलू लागली. एक तर हा ओळखीचा निघाला. हातातून निसटला. पंधरा-वीस मिनटं वाया गेली. नवा माणूस शोधावा लागणार. 
हे इथं बसस्टँडवर आले होते. माझ्या मावशीची मुलगी होती ना धुळ्याला. तिला सोडायसाठी आले होते. बसवलं तिला बसमध्ये आणि तहान लागली म्हणून आले होते इथे तर इथेच चहा पिला. चला, निघते मी.
काउंटरवर बसलेल्या बाबा पठाणलाही गडबड कळली; पण सुरेशचं समाधान झालं नव्हतं.
धुळ्याला कुठंय आता बस.
हो. आहे तर. मी आताच बसवलं तिला.
मी एसटीमध्येच आहे नोकरीला. धुळ्याच्या बसला अजून चाळीस मिनिटं आहेत. 
ती पूर्णपणे फसली होती. संतापाने डोक्याची शीर उडत होती. त्यात संध्याकाळच्या जेवणाची, पोराच्या फीसची काळजी. आता याला काय सांगावे. कसं सुटावे, हे तिला सुचेना. तेवढ्यात बाबा मदतीला आला धाऊन. 
अरे साब, मॅडमने बसस्टँड के बाहरही छोड दिया होगा, नही तो टॅक्सी में बिठाया होगा...
हा हा..टॅक्सीतच बसवलं मी. बससारखी होती ती. चला येते मी.
काही मिनिटांतच दोन जण गळाला लागले. मग तिनं थेट गळ्यापर्यंत हात घालत घाम पुसून काढला. मंगळसूत्र बाहेर काढून त्याच्याशी चाळा करत ते पुन्हा आत टाकलं. तसा समोरच्या माणसाचा डोळा चमकला. गठला. पैसेवालाही दिसतोय. दोन हजारापासून सुरुवात करून हजारावर निपटू, असा विचार करत तिनं त्याला मैदानावर साचलेल्या बाभळीच्या झाडाकडं येण्याची खूण केली. ते धंदेवाल्या बायकांसाठी सुरक्षित ठिकाण होतं. 
चलायचं का...
बाभळीच्या झाडामागं...
नाही. खास अॅरेजमेंट आहे.
पण माल गरम आहे का.
आहे तर तुझ्यासमोरच उभा आहे की...
तू...? गरम? तुला गॅसवर ठेवलं तरी गरम व्हायची नाहीस. मलाच थंड करून टाकशील. जा दुसरी एखादी घेऊन ये. 
असं इथं उभ्या उभ्या...कुणाचं थंड गरम कळतं का. त्याच्यासाठी बेडरूममध्ये मऊशार पलंगावर पडायला पाहिजे.
तुझ्या घरी जायचं का?
घरी...माझ्या...कशाला. घरापेक्षा भारी व्यवस्था आहे.  
मगाशी मंगळसूत्र खालून वर काढलं...पुन्हा आत टाकलं...तर...
तर..काय
मला वाटलं तुझा नवरा नाही घरी...असं सांगितलं तू..
आँ...आयला मजाक करतो यार तू....बरं चल...इथं हॉटेलंय.
हॉटेल...नको...हॉटेलात नाही परवडत
अरे. फक्त दोन हजार..एकदम फूल एैश. तू जशी म्हणशील तशी.
दोन हजार. जा दुसरीकडं बघ कुणाला तरी.
हॉटेल एकदम खासंय.
त्याला काय चाटायचंय का. मला काय घरी गादीवर झोपता येत नाही का रात्रभर?
दीड हजार...बाराशे...एकदम...फायनल
ऐ, एवढ्यात तर कॉलेजच्या कवळ्या पोरी मिळतात. 
मग त्यांना घेऊन गावाबाहेर जावं लागतं. हॉटेलचा खर्च.
अरे पण मजा. तुझ्यात अन् तिच्यात फरक किती...
गिऱ्हाईकाशी शब्दाचा खेळ खेळता खेळता छाया थकून गेली. घरातली रिकामी भांडी डोळ्यासमोर नाचू लागली होती. गांजाच्या नशेत शांताराम अंगावर पट्ट्याचे वार करतोय, असंही तिच्या डोळ्यासमोर दिसून गेलं. काहीही झालं तरी आज एक गिऱ्हाईक झालंच पाहिजे, असं तिनं मनाला बजावलं. पाचशे रुपये पाहिजेतच. 
चेहऱ्यावर थोडेसे आणखी मादक भाव आणत, मंगळसूत्राशी खेळत, केसाची लांबसर बट आणखी उडवत तिने गिऱ्हाईकाशी आणखी चाळा सुरू केला. 
बघा, लास्ट सांगते. पाचशे रुपये. त्याच्यापेक्षा कमी पाहायची असंल तर झोपडपट्टीत जा समोरच्या. 
आम्ही कशाला जावं झोपडपट्टीत. मला तर तूच पाहिजे. 
मग चल की लवकर. कशाला वेळ घालवतो.
माझ्याकडं फक्त शंभराची नोट आहे. त्याने खिशात हात घालून नोट तिच्यासमोर नाचवली. तो तिच्याकडे थंडगार डोळ्यांनी पाहू लागला. तशी छायाच्या डोक्यात जोराची सणक भरली. 
एवढं सोन्यासारखं शरीर फक्त शंभर रुपयांत. आतापर्यंत एवढी खालची वेळ कधी आली नव्हती. हरामी स्साला. बाईच्या शरीराची एवढी  कमी किंमत लावतोय. तिनं तटकन त्याच्याकडं पाठ फिरवली. तडातडा चालत शंभर-दीडशे फूट पुढं गेली. एकाएकी तिला वाटलं की तो पाठीमागून चालत येतोय.  तसा तिनं वेग थोडासा मंद केला. अंगावरचा पदर पूर्णपणे खाली पाडला. आणि तो उचलण्याचा मादक अंदाज घेत डोळ्याच्या  कोपऱ्यातून मागे पाहिलं तर...तर तिथं कुणीच नव्हतं. प्रिन्सवर तिच्यासोबत धंदा करणाऱ्या रेश्मा, सलमा, यास्मीन, मंदा, गौरी मात्र झाडाखाली बसून गप्पा करत गिऱ्हाईकं शोधत होत्या. इशारे करीत हसत खिदळत होत्या. ते पाहून छायाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आपल्या हातून गिऱ्हाईक गेल्याच्याच आनंदात हसतायत या. असं म्हणत तिनं एक बारीक दगड उचलला आणि त्यांच्या दिशेने भिरकावला. तशा त्या अजूनच खिदळू लागल्या. त्या साऱ्या छायापेक्षा पाच-सात वर्षांनी लहान होत्या. लग्नं झाली असली तरी एकीलाही पोर-बाळ नव्हतं. संसाराचा फारसा ताप नव्हता.
मंदा ओरडली-
छाया, एखादा म्हातारा पाहा. त्याच्याकडूनच मिळतील शंभर-दोनशे.
रेश्मानं पण आवाज चढवला.
तुला आता इकडं धंदा नाही. एखाद्या कॉलनीत जा. तिथल्या बंगल्यात राहणाऱ्या म्हाताऱ्यांना लागत असती बाई. ती बरकतपुऱ्यातली काळी सुलू गेली होती. दोन रात्रीचे  हजार रुपये मिळाले. अन् म्हाताऱ्यानं केलं तर काहीच नाही. कपडे काढले की ढँ...झाला. 
रेश्मानं खरं तर हा किस्सा तिसऱ्यांदा सांगितला होता, तरीही छायाला चिडवण्यासाठी त्या जोरजोरात खिदळल्या. 
आता तिथं थांबणं शक्यच नव्हतं. एक प्रदीर्घ श्वास घेऊन छाया पुढं निघाली. का आपल्या नशिबी हे रांडेचं जगणं आलं. का नाही आपल्याला लहानपणी चांगले आई-बाप मिळाले. का नाही आपले आई-बाप आपण किमान तरुण होईपर्यंत जगले. का त्यांचं घर झोपडपट्टीतच होतं. का त्यांनी आपल्याला शाळेत शिकू दिलं नाही. आणि आपल्याला काकूकडे पाठवून आईनं स्वतला का पेटवून घेतलं. बापानं आपल्याला शेजारच्या पोस्टातल्या शेळकेकडे पाठवून बाहेरून दरवाजा बंद करून घेतला. आपण  पण का शेळकेला अंगचटीला येऊ  दिलं. का त्याला चपलांनी बडवलं नाही. पोलिसांना का सांगितलं नाही. पोलिस बापाला पकडायला आले तेव्हा देवाची शप्पथ घेऊन खोटं का बोललो. बापानं पलंगाखाली गांजाची पिशवी लपवल्याचं पाहूनही ती शेजारच्या प्रकाशनंच ठेवल्याचा आरडाओरडा बापाच्या सांगण्यावरून का केला. एकसाथ शेकडो प्रश्न वादळासारखे छायाभोवती फिरू लागले. त्याचा वेग एवढा प्रचंड होता. की वाऱ्याच्या झोतानं आपण उडून चालल्याचा भास तिला झाला. त्यामुळे ती थोडी भानावरही आली. तेव्हा सूर्य तिरपा होऊन तळपत होता. एकदम कडक. तिला भोवळल्यासारखं झालं. घशाला कोरड पडली होती. दुपारी तीनपर्यंत काहीच कमाई नाही. पुन्हा डोक्यात तोच विचार. कुठून आणायचं कुणाला. एखादा कॉलेजातला पोरगाही दिसेना. कुणी म्हातारा नजरेला पडेना. आज जणू काय सगळे कामपिपासू पुरूष संपावर गेले होते. कुणी तिच्याकडं ढुंकूनही पाहायला तयार नव्हतं.  


-- ३ --

तेवढ्यात समोरच्या रस्त्यावरून एक कार गल्लीत वळाली. चालविणाऱ्यानं हलकेच काच खाली घेतली. बोटभरच. त्यातून माणिकचंदची रिकामी पुडी बारीक, चपटी करून कॅरमच्या स्ट्रायकरसारखी बाहेर भिरकावली आणि काच पुन्हा चढवली. तेवढ्या चार-पाच सेकंदांत छायानं त्याला आणि त्यानं छायाला न्याहाळून घेतलं. सकाळपासून कार चालवत असल्यानं थकलेले त्याचे डोळे चमकले. छायानं डोळा थोडासा बारीक केला आणि त्याच्याकडे टोकदारपणे पाहिलं. त्याला खूण पटली.
त्याला वाटलं इथंच कार थांबवावी. या बाईला गाडीत बसवावं आणि कारमध्येच शरीर शांत करून घ्यावे. तेवढ्यात बायकोचा चेहरा समोर आला. आधी मंदिरात जाऊन दर्शन घ्या...मग चहा, नाष्टा, जेवण करा, असं तिनं दोन-तीन वेळा बजावलं होतं. जागृत महादेव मंदिरात जाऊन प्रसाद घेऊन या. त्यामुळं आधी दर्शन करून, नारळ फोडायचं नंतर या बाईला शोधून काढू, असं मनाशी बोलत त्यानं झर्रकन गाडी मंदिराकडे वळवली. तत्पूर्वी तिचा चेहरा साइड ग्लासमधून न्याहाळून घेतला. तिचा आक्रमक, रापलेला चेहरा, कपाळावरचं दाट कुंकू, मुद्दाम सोडलेली केसाची बट, उघड्या पाठीच्या ब्लाऊजमधून दिसणारं गच्च शरीर त्यानं डोळ्यात भरून घेतलं.
मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती. त्यामुळे सदानंदनं मंदिराच्या खूप अलीकडं कार लावली. पायी चालत तो निघाला. तेव्हा भिकाऱ्याच्या पोरांनी त्याला गराडा घातला. त्यांना वाटलं हा कार मालकच आहे. बोंबलत सुटलेल्या पोट्यांना हाकलून लावत तो मंदिरात पोहोचला. तेव्हा त्याचं लक्ष तिच्या येण्याकडंच होतं. त्यानं हलकेच डोळ्याच्या कोपऱ्यातून नजर फेकली तेव्हा ती झपझप पावले टाकत येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. साहेबाला रात्री नऊ वाजता हॉटेलावर घ्यायला जायचे आहे. तोपर्यंत सगळं साध्य होईल. असा विचार त्याने केला. खिशातील पाकीट काढून पाचशेची नोट आहे की नाही, याची खात्री करून घेतली. मनाशी खुदकन हसत तो मंदिरात वळाला.  झपझप पावलं टाकीत छाया मंदिराच्या रस्त्यावर निघाली. आज मंगळवार. देवीचा वार. या महादेव मंदिराच्या जवळच रेणुकादेवीचं मंदिर होते. लग्न झाल्यावर ती आणि शांताराम दोन-तीन वेळा आले होते दर्शनाला. पुढं या धंद्यात पडल्यावर सगळंच संपत गेलं. पापात बुडालेलं शरीर घेऊन देवीपुढे कसं जायचं असाच प्रश्न पडत होता तिला. हळूहळू देवीचा आणि त्या प्रश्नाचाही विसर पडत गेला. 
आज महादेव मंदिराकडे निघाल्यावरही तो प्रश्न पुन्हा तिच्यासमोर आला. अनेक पुरुषाशी संग करून बाटलेलं आपलं शरीर. पैशासाठी धंदा करत असलो तरी कधी-कधी आपणही तीन- चार जणांशी मनापासून रत झालोच होतो ना, याचीही तिला आठवण झाली. आपण शीलभ्रष्ट, शरीर भ्रष्ट, मन भ्रष्ट, विचार भ्रष्ट. आणि आता तर आपण गिऱ्हाईकाला खेचून आणण्यासाठी मंदिरातच चाललो आहोत. काय हे...किती मर्यादा सोडली आपण. काही लाजच नाही आपल्याला. चक्क मंदिरात जाऊन त्या मोटारकारवाल्याला इशारा करायचे म्हणजे...आपली हद्दच झाली. नाही नाही...ते हातातून गेलं तरी चालंल. दुसरा कुणीतरी शोधू पण मंदीरात रंडीबाजी नाही. धंदा नाही करायचा. मंदिरातच जायचं नाही...तिनं ठरवलं...
तसं एक छोटंसं पोरगं रडत रडत तिच्यासमोरून पळत गेलं आणि मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या दाट झाडीत नाहीसं झालं. छायाच्या मनात कालवाकालव सुरू झाली. अरुणही याच पोराच्या वयाचा. आपण मागं लागून त्याला शाळेत पाठवतोय. फी भरली नाही म्हणून हाकलतील का त्याला. अन् संध्याकाळचं जेवण त्याचं. दोनशे रुपयांची सोय झालीच पाहिजे. हे गिऱ्हाईक गेलं हातातून तर काही खरं नाही. देव गेला उडत. एवढीच काळजी माझी देवाला तर कशाला धंद्याला लावलं त्यानं मला. कशाला शांतारामसारख्या गंजेटीला पदरात मारलं. मी काय देवाचं नुकसान केलं होतं. आणि आता आणखी काय वाईट करणारंय ते करून घ्यावं देवानं...देवाला जसा त्याचा संसार महत्त्वाचा तसा मलाही माझा संसार महत्वाचा. मी काही देवळाच्या गाभाऱ्यात शेज नाही सजवणार. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडीत घेऊन जाणारंय गिऱ्हाईकाला. नाहीतर त्याच्याच गाडीत बसून जाईन तो म्हणंल तिथं. पण मला आज देवाच्या साक्षीनं देहदान करायचंय. मनात विचारांची वावटळ उडवतच छाया मंदिराच्या पायऱ्यांवर पोहोचली. उंच टाचेच्या सँडल काढून ठेवताना साडी खूपशी वर येईल. सदानंदची त्यावर नजर पडेल याची काळजी तिनं घेतली. त्याच्या डोळ्यातली चमकही तिनं टिपली. त्यानं डोळ्यावरचा गॉगल कपाळावर ठेवला आणि तिला हलकासा डोळा घातला. तिच्या अंगातून एकदम वारा शिरशिरून गेला. कॉलेजमधला रवींद्र सातपुते तिच्या काळजावरून चालत गेला. त्याच्या सारखाच दिसतोय, असं पुटपुटत तिनं केसाची बट पुन्हा कानामागे अडकवण्याचं नाटक केलं. आणि ती झपकन गाभाऱ्यात शिरली. महादेवाच्या मूर्तीसमोर हात जोडले असले तरी मन बाहेरच होतं. ते कसंबसं ताब्यात आणत तिनं देवाला सांगूनच टाकलं. 
हे तुला पाप वाटत असलं तरी मला वाटत नाही. कारण हे मी माझ्या संसारासाठी करतेय. तूच या गिऱ्हाईकाला इथं तुझ्या देवळात आणलंय. म्हणून मी त्याच्या मागंमागं इथं आलीय. उगाच मला शिक्षा करण्याच्या भानगडीत पडू नको, असं बजावून ती झपकन बाहेर पडली.
झाडाच्या दाट गर्दीत पाच मिनिटांतच सदानंद आणि छायानं शरीरं मोकळी केली. कपडे साफसूफ करून केस विंचरून छाया त्याच्याकडं पाहू लागली. आता हा बाबा पैसे देणार की नाही, असा तिचा अाविर्भाव होता. तो ओळखत सदानंदनं तिच्या दिशेनं पैशाचं पाकीट भिरकावलं. प्रसंगावधान राखून पदराची झोळी करत तिनं ते पकडलं. तो म्हणाला,
खरं तर मी पाचशे रुपये देणार होतो. पण आता विचार बदललाय. दोन हजार रुपये आहेत पाकिटात तेवढे घेऊन टाक.
नाही नाही. जेवढे ठरले तेवढेच दे. मेहरबानी करायची गरज नाही. धंदेवाली असली तरी लुटारू नाही मी.
मेहरबानी नाही. तुझी चव आवडली मला. माझ्याकडं येण्याआधी देवाच्या पाया पडून आलीस ना तू. ते पाहूनच मला कळलं तू कोण आहेस ते.
आश्चर्यचकित झालेल्या छायाच्या तोंडून शब्दही फुटेनात.
तिनं कसंबसं विचारलं –
पण तू कोण आहेस.
मी ड्रायव्हर आहे. एका साहेबाच्या गाडीवर. नेहमी येत असतो इथं.
मग यापूर्वी कधी दिसला नाहीस. मी तर येत -जात असते मंदिरासमोरून.
मी पण नाही येत कधी या मंदिरात. कदाचित आज तुझ्या शरीराची चव घेण्याचं नशिबात होतं माझ्या. 
आणि माझ्या नशिबात...असा प्रश्न छायाच्याही मनात आला, पण गिऱ्हाईकाच्या बोलण्यात फारसं अडकायचं नाही, हे तिनं यापूर्वीच ठरवलेलं आणि अमलात आणलं होतं. आताही त्याच्याकडे चमत्कारिक आणि तुटलेल्या नजरेनं पाहत तिनं पुन्हा पायात सँडल चढवल्या. आता पायाचा थोडासाही भाग दिसू दिला नाही. पाठीवरून पूर्ण पदर घेत तिनं केसाचा अंबाडा बांधला आणि झोकदारपणे ती झाडीतून बाहेर पडली. मंदिराच्या बाहेरूनच महादेवाला हात जोडले. तेव्हा ती कमालीची शांत झाली होती. कोणताच विचार तिच्या मनात येत नव्हता. जणूकाय आपण आपला देह देवालाच दान केलाय, असा तिला भास होऊ लागला होता. त्या भासातच तिनं कधी मंदिराच्या पायऱ्या उतरल्या ते तिचं तिलाही कळलं नाही. हाताच्या मुठीत दोन हजाराच्या नोटा चिंब भिजत होत्या. 

000000
पूर्व प्रसिद्धी दिव्य मराठी दिवाळी अंक 2015

0000 
- श्रीकांत सराफ
९८८१३००८२१ 

2 comments: