Wednesday 30 March 2016

तरुणाईतील प्रतिभेचे धुमारे अन संतुलन


तरुणाईतील प्रतिभेचे

धुमारे अन संतुलन

अरे, चला...रानाकडं चला. शेतात बघा काय झालंय ते. बघा रे शेतात काय झालंय ते. अरे, कुणीतरी लवकर चला रे, अशी कातर आवाजात हाक देत तो छोटासा शाळकरी पोरगा गावात शिरतो. तेव्हा घराच्या अंगणात भाकरी खाण्यासाठी बसलेला मित्र आणि त्याची आई तटतटून उठतात. या पोराच्या बापानं आत्महत्या तर नाही केली ना, असा प्रश्न सर्वांपुढं पडतो. ही सारी मंडळी रानाकडं धावत सुटतात. पिकाचा पाचोळा झालेल्या रानात येऊन ते थबकतात. साऱ्यांच्या चेहऱ्यावर संतापाचे, दिग्मूढ झाल्याचे भाव उमटतात. कॅमेरा हळूहळू गोलाकार फिरतो आणि समोर दिसते एक हिरवेगार लिंबाचे झाड अन् त्या झाडाच्या बुंध्यावर घाव घालणारा मजूर. एका बाजूला झाडाचा मालक उकडिवा, डोक्याला उपरणं बांधून  बसलेला. पोरांची कावकाव पाहून तो गरम होतो. का ओरडू लागलायस रे, असं विचारतो. त्यावर पोरगा म्हणतो, झाड का तोडू लागलात? मालक पुन्हा संतापत विचारतो, का तुला काय करायचं? पोरगा उत्तरतो, तुम्ही झाड तोडलं तर माझा बाप आत्महत्या करंल. मालक, मजूर आणि तिथं आलेली पोराच्या मित्राची आई सारेच या बोलण्यानं आश्चर्यचकित होतात. मालकाला राहवत नाही, तो म्हणतो, अरं, मी झाड तोडलं तर तुझा बाप कसा आत्महत्या करंल? पाणावलेल्या डोळ्यानं पोरगा सांगतो, तुम्ही झाड तोडलं तर पाऊस पडणार नाही. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येणार नाही. शेतात पीक आलं नाही तर माझा बाप आत्महत्या करंल ना? झाडांशी असलेलं माणसाचं नातं एवढ्या सरळ सोप्या पण विलक्षण प्रभावी शब्दात एेकताना  मन थरथरून जातं. वाटतं की इथं कथानक संपलं आहे. पण ‘संतुलन’ लघुपटाचे लेखक, दिग्दर्शक योगीसिंह ठाकूर त्यापुढं जाऊन जी कमाल करतात ती प्रत्यक्ष पाहण्याजोगीच आहे. कॅमेऱ्याचे माध्यम वापरून काही मिनिटांतच एवढा प्रभावी, हृदयात खोलवर रुतणारा संदेश त्यांनी दिला आहे. पर्यावरण रक्षणाबद्दल जनजागृतीसाठी हा लघुपट राज्य सरकारने सर्व चित्रपटगृहांत दाखवावा, एवढा तो परिणामकारक आहे.

गाथा बहुउद्देशीय संस्थेने शनिवार, रविवारी (२६, २७ मार्च) आयोजित केलेल्या क्लैप शॉर्ट फिल्म फेस्टीव्हलमध्ये या लघुपटाचे सादरीकरण झाले. त्याला प्रथम पुरस्कारही मिळाला. मात्र, तो पुरस्काराच्या पलिकडे जाणारा आहे. महोत्सवात अनेक लघुपट ‘संतुलन’च्या जवळपास जाणारे होते. लॉस एंजलिस महोत्सवासाठी निवडला गेलेला ‘१५ ऑगस्ट’ थक्क करून गेला.  औरंगाबादमधील रंगकर्मी अनिल बडे यांनी दिग्दर्शित केलेला इन्स्पायरिंग रोझ हा लघुपटही गरिबांमधील आपुलकीचे नाते गहिरे करणारा होता. नवनाथ ढमे यांचा ‘तोलक’ पारधी समाजातील जात पंचायतीचे भीषण वास्तव दाखवणारा होता. कुप्रथा, रुढींच्या नावाखाली किती टोकाचे शोषण होते, हे त्यांनी खूपच टोकदारपणे मांडले होते. महेशकुमार मुंजाळे यांच्या ‘आणि बुद्ध हसला’ने  भारतीय समाज व्यवस्थेतील धार्मिक तेढ दाखवून दिली. या लघुपटाचा सुखांत खरंच सुखावून गेला.

य महोत्सवाच्या निमित्ताने तरुणाईच्या प्रतिभेला फुटलेले धुमारे पाहण्यास मिळाले. त्यांच्यातील विचारांची दिशा कोणती. ते समाजाबद्दल काय विचार करतात. नव्या सामाजिक बदलांविषयी त्यांना काय वाटते. जाती-धर्मामधील वाढता संघर्ष, मोबाईलचे वेड, अंतर्गत सुरक्षेचा धोका, जात पंचायतींमध्ये होणारे शोषण, समलैंगिकता, गरीब - श्रीमंतांमधील वाढलेली दरी असे अनेक मुद्दे त्यांना कशा पद्धतीने मांडावेसे वाटतात, हे देखील या महोत्सवात दिसून आले. तरुणाईला एवढे व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दलल गाथा संस्थेचे प्रमुख किशोर निकम, क्लैपचे अध्यक्ष विनय जोशी आणि त्यांचे सहकारी अक्षय वाळिंबे, शैलेश देशमुख, सावी निकम, प्राची जोशी, शिवानी नाईक, आकाश काळे, अक्षय शेलारकर, अदिती मोखाडकर आदींचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. त्यांनी काळाची पावले अचूक ओळखली आहेत. गेली पाच वर्षे ते या महोत्सवाचे आयोजन करत होतेच. मात्र, यंदा त्यांनी महोत्सवाला स्पर्धेचे स्वरूप दिले. भरघोस रकमेची बक्षिसे दिली. आणि लघुपटाचे तंत्र, अभिनय आणि इतर तांत्रिक बाबींचे ज्ञान असणारे सत्यजित खारकर, प्रा. डॉ. संजय पाटील देवळाणकर आणि अभिजित देशपांडे यांच्यासारखे संवेदनशील परीक्षकही नियुक्त केले. कैमऱ्यावर हुकूमत असलेले प्रा. डॉ. कमलेश महाजन यांच्या हस्ते महोत्सवाचे उद््घाटना आणि प्रख्यात चित्रपट लेखक, गीतकार अरविंद जगताप यांच्या हस्ते बक्षिस वितरणही महत्वाचे ठरले. जगताप यांनी तंत्राच्या चौकटीत अडकून आशय मांडणीचे सौंदर्य बिघडवू नका, असा मोलाचा सल्ला दिला. महोत्सवासाठी तब्बल ८१ लघुपट आले होते. त्यातील ५१ सादर झाले. त्यापैकी ४० दर्जेदार होते. यावरून महोत्सवाची उंची लक्षात येते.

या महोत्सवाच्या निमित्ताने एकांकिका या नाट्य प्रकाराविषयी चर्चा झाली. कारण काही संघांनी एकांकिकाच चित्रित करून आणली होती. रंगमंचावर थेट सादरीकरण करण्यात जिवंतपणा असतो. प्रेक्षकांचा थेट प्रतिसाद त्यात महत्वाची भूमिका बजावतो. मात्र, कैमऱ्याचा वापर करूनही असा प्रतिसाद मिळवता येतो. लेखकाला जे म्हणायचे आहे ते कमीत कमी शब्दांत आणि नजर खिळून राहिल अशा पद्धतीने मांडता येते, हे लघुपटाचे वैशिष्ट्य आहे आणि ते तरुणाईला भावले आहे. केवळ भावलेच आहे असे नव्हे तर त्यातील अनेकांची या माध्यमावर पकड असल्याचे लक्षात आले. यामुळे पुढील काळात एकांकिका स्पर्धांच्या जागी लघुपटांच्या स्पर्धा होऊ लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. याचा अर्थ एकांकिकांचे महत्व संपेल असे नाही. कारण रंगमंचावर सादरीकरणात जी ताकद असते त्याची मौज काही न्यारीच आहे. परंतु, तंत्रज्ञानाकडे तरुणांचा वाढता ओढा लक्षात घेता एकांकिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. ती ऐकून रंगमंचावर रमणाऱ्यांना काही बदल करावेच लागतील, अशी स्थिती आहे.



No comments:

Post a Comment