Thursday 30 April 2020

रंगीन फ्रेड्रिक्स थारोळ्यातॽ

वयाच्या पंचाहत्तरीत पोहोचलेले फ्रेड्रिक्स शहरातले बहुचर्चित व्यक्ती. त्यांच्या वर्तुळात उद्योजक, कलावंत, बडे अधिकारी, व्यापारी, मिडिआ सम्राटांची उठबस होती. दर महिन्याला फ्रेड्रिक्स काहीना काही निमित्त काढून जंगी पार्टी द्यायचे. त्या पार्टीच्या निमंत्रणासाठी ज्यांना थेट फ्रेड्रिक्स यांच्याशी संधान बांधता येत नसे. ते त्यांचे सावत्र भाऊ फ्रान्सिसशी संपर्क साधायचे. त्याला छोटी-मोठी गिफ्ट द्यायचे. कारण शहरालगतच्या मोठ्या लॉन्स, पंचतारांकित हॉटेल्समध्ये होणाऱ्या या पार्ट्यांत दारुची, चटकदार खाद्य पदार्थांची रेलचेल असायची. शिवाय तिथं गेल्यावर काहीतरी डील होणार. एखादं नवीन काम मिळणार किंवा जुनं अडकलेलं काम मार्गी लागणार, असा प्रचार-प्रसार झाला होता. काहीच झालं नाही तर अनेक सुंदर, आकर्षक, मादक महिला, तरुणी, ललनांचे दर्शन पार्ट्यांमध्ये हमखास होणार, हे तर नक्की होतं. एक आश्चर्याची गोष्ट अशी होती की, आजुबाजुला कायम लोकांचा राबता असलेले अविवाहित फ्रेड्रिक्स पार्टी पूर्ण संपेपर्यंत कधीच थांबायचे नाही. रात्रीच्या दहाच्या सुमारास ते पार्टीतून ड्रायव्हरसोबत बाहेर पडायचे. सुरुवातीच्या काळात काही लोकांनी, पत्रकारांनी ते कुठे जातात, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ते थेट बंगल्यावरच जातात, असे कळाल्यावर उलटसुलट चर्चा थांबली आणि त्यांचे गुणगान करणारे ‘विरक्तीचा गौरव’ असे लेखही छापून आले. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत देखणे, हजरजबाबी असलेल्या फ्रेड्रीक्स यांचे जगणे रंगीन होते. पन्नास-साठ वर्षांपूर्वी ते गोव्यातून आले. त्यांनी अनेक छोटे-मोठे उद्योग केले. पण डिस्कोबारनी त्यांना सर्वाधिक यश मिळवून दिले. ते अब्जा-अब्जाधीश झाले. डिस्कोबारमध्ये मद्याचा एक थेंबही मिळणार नाही. कोणताही गैरधंदा चालणार नाही. याकडे स्वतः फ्रेड्रिक्स लक्ष देत. त्यामुळे पोलिसी कारवाईचा कधी प्रश्नच आला नाही. उलट नियुक्ती मिळालेला प्रत्येक पोलिस कमिशनर त्यांचा मित्र होत असे. असं म्हटलं जात होतं की, तरुण वयात फ्रेड्रिक्स यांची दोन प्रेमप्रकरणे फिसकटली. तेव्हापासून त्यांनी ठरवलं की, जे सुख हवं ते थेट विकतच घेऊन टाकायचं. त्यासाठी त्यांची खास यंत्रणा होती. दुसऱ्या शहरातून विशिष्ट वेळी एखादी महिला, तरुणी, ललना त्यांच्या बंगल्यात दाखल व्हायची आणि पहाटे पहाटे घसघशीत रक्कम घेऊन रवाना व्हायची. निवृत्त पोलिस अधिकारी आणि फ्रेड्रिक्स यांचे खास मित्र निशिकांत, सावत्र भाऊ फ्रान्सिस आणि ड्रायव्हर चरणसिंग यांनाच हे सगळं माहिती होते. निशिकांत यांना ते पसंत नव्हते. विकत मिळणारं सुख गुन्हेगारीकडं जातं असं ते म्हणत. तर जगात खरं सुख मिळवायचंच नाही. दोन भेटीनंतर त्या स्त्रीमध्ये मला स्वारस्यच राहत नाही. तु माझ्या एवढ्या गुण-अवगुणाकडं दुर्लक्ष कर बाबा, अशी विनंती फ्रेड्रिक्स करत. तरीही उफाड्याची, मदमस्त अशीच प्रसिद्धी असलेली कलिना त्यांच्याकडं दोन महिन्यात चौथ्यांदा आल्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारणा केली. त्यावर फ्रेड्रिक्स यांनी ‘अरे, मला तिच्यात काही खास वाटत नसलं तरी तिला वाटतंय. म्हणून माझ्या एजंटच्या मागे लागून ती येतेय. सोबत दोन भाऊही आणतेय’ असं खळखळून हसत उत्तर दिलं. निशिकांत यांना ते फारसं पटलं नाही. आयुष्याच्या उताराला लागलेल्या फ्रेड्रिक्सच्या प्रचंड संपत्तीचं काय होणार, अशी चिंता त्यांना होतीच. शिवाय बंगल्यातील तिजोरीत ठेवलेली रक्कम फ्रेड्रिक्स कोणाला देऊन तर टाकणार नाही ना, असे निशिकांत, सावत्र भाऊ फ्रान्सिसला वाटत होतं. फ्रान्सिसचा मुलगा सॅम्युअल आणि ड्रायव्हर चरणसिंगही कायम अस्वस्थ असायचे. तुम्ही का तुमच्या मालकासारखं श्रीमंत होत नाहीत, असं चरणसिंगची बायको त्याला नेहमी हिणवायची. या साऱ्यांना एक दिवस सकाळी जबर धक्का बसला. जेव्हा हातपाय बांधलेले, तोंडात बोळा कोंबलेला, डोक्यात घाव घातलेला अशा अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात फ्रेड्रिक्स यांचा मृतदेह सापडला. इन्सपेक्टर कठाळेंनी चौकशी सुरू केली. बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज कोणीतरी करप्ट करून टाकलं होतं. कोणीतरी कट रचून ही हत्या केली होती. नेमका कोण होता कटाचा सूत्रधार. कोण असावं कटात सहभागीॽ असे प्रश्न कठाळेंना पडले होते.


No comments:

Post a Comment