Thursday 9 April 2020

तंबूतल्या सिनेमाचे दिवस

छान नदीचा किनारा. नदी तुडुंब भरून वाहतीय. दोन्ही बाजूंनी गर्द झाडी आहे. अलिकडच्या बाजूला वाळूच वाळू पसरली आहे. त्या वाळूच्या मध्यभागी एक तंबू लागलाय. तंबूत सिनेमाचा पडदा आहे. पडद्याच्या दोन्ही बाजूंनी वाळूत रिकामी पोती टाकलीत. एकमेकांपासून आठ-दहा फूट अंतरावर. आणि रात्री आठची वेळ आहे. आकाश निरभ्र. थंडगार वारा वाहतोय. लोक पोत्यावर निवांत बसून, पहूडून सिनेमा बघतायत. असं दृश्य होतं एकोणीसशे साठ-सत्तरच्या दशकात. मराठी मुलखातल्या अनेक गावांतील एक पिढी अशीच सिनेमारसिक झाली. अगदी अलिकडं म्हणजे पाच-सात वर्षांपूर्वी तंबूतल्या (तुरळक अपवाद सोडला) सिनेमानं जीव सोडला. तोपर्यंत काही दिग्गज, लोकप्रिय कलावंतही खेडेगावांतील जत्रा-यात्रांत तंबूतल्या सिनेमाचा प्रचार, प्रसार करत होते. अर्थात तेव्हा अशा सिनेमाला मोठी गर्दी होती. साठ-सत्तरच्या दशकातील एकमेकांपासून अंतर ठेवून, पोत्यांवर अंग टाकून सिनेमा पाहणं राहिलं नव्हतं. पण मूळ मुद्दा तंबूतल्या सिनेमाचा. असं म्हणतात ना की, जगात नवं  असं काही उत्पन्न होतंच नाही. जुनंच रूप बदलून येतं. कोरोनामुळं आपल्या सिनेमांचंही तसंच काही होईल की काय, असं वाटू लागलंय. अरे, मी तुला कोरोनापूर्वी असं म्हटलं होतं ना. अरे, लक्षात घे. कोरोनापूर्वीची घटना आहे रे ती. अशी वाक्यं काही दिवस, महिन्यांनंतर आपल्या कानावर पडणार आहेत. आपल्यापैकीच अनेकजण असं बोलणार आहेत. केवळ आपणच नाही तर अख्ख्या जगभर हे होणारच आहे. एवढा मोठा इफेक्ट कोरोनाने केला आहे. काही दिवसांसाठी का होईना पर्यावरण टिकवण्याच्या आणाभाका होतील. निसर्गाच्या शक्तीचं गुणगान केलं जाईल. त्यासोबत शाश्वत अर्थकारण, समाजकारणाचा शोध सुरू होईल. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ते म्हणालेत की, कोरोनाला अटकाव होत असतानाच पुढील काळात उद्योग, कृषी आदी क्षेत्रातील आर्थिक मंदी दूर करण्यासाठी उपाययोजना आताच आखाव्या लागतील. कोणत्याही देशासाठी हीच दोन क्षेत्रे महत्वाची आहेत. कारण ती सावरली तर इतरांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदा होतो. पण याचा अर्थ इतरांनी स्वतःहून काहीच करायचे नाही, असा थोडीच आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटातून सावरल्यानंतर आपण आपापल्या क्षेत्राला उर्जा कशी देऊ शकतो, याचा विचार आतापासूनच सर्वांना करावा लागणार आहे. त्यात कला प्रांताचाही समावेश आहे. कला प्रांतातील सिनेमा जगताला हे पाहावेच लागेल, अभ्यासावे लागेल. राज्यकर्त्यांसाठी कलावंत महत्वाचे असले तर कलाक्षेत्र त्यांच्या प्राधान्य यादीत वरच्या स्थानावर कधीच नसते. त्यामुळे आपल्याला जगायचे असेल तर आपल्यालाच काहीतरी मार्ग शोधावे लागतील, हे कलावंतांनी यापूर्वीच्या अनुभवावरून लक्षात घेतले पाहिजे. कोरोनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातील सिनेमा-नाटक जगाला भेडसावणारा सर्वात मोठा मुद्दा आहे प्रेक्षकांच्या. रसिक मायबापांच्या गर्दीचा. म्हणजे तुम्ही पहाल की गर्दीच नसेल तर नाटकाचा खेळ रंगत नाही. खऱ्या रसिकानं दिलेली टाळीची दाद कलावंताला प्रचंड शक्ती देऊन जात असते. हे झाले नाटकाचे. सिनेमाचं तर सारं गणितच गर्दीवर अवलंबून. दहा कोटी, पंधरा कोटी, पन्नास, शंभर, पाचशे कोटींचा धंदा केला तरच तो सिनेमा लोकप्रिय अशी म्हटलं जातं. आता कोरोनानंतरची काही वर्षे तरी लोक गर्दी टाळतील. एकमेकांपासून अंतर राखून आसन व्यवस्था हवी, अशी अपेक्षा व्यक्त करतील. आधीच मल्टीप्लेक्स जेमतेम २०० - ३०० खुर्च्यांचे. त्यात आणखी जागा करायची म्हटलं तर मल्टीप्लेक्सच्या मालकांना ते परवडणार आहे काॽ जरी परवडले तरी सध्या जो एक-दीड आठवडा सिनेमा चालतो. तो महिनाभर चालू ठेवणं शक्य होईल काॽ खरं तर शूटिंग करण्यापासून ते प्रोमोशनपर्यंतची इतरही अनेक आव्हाने आहेतच. पण लोकांची गर्दी कशी खेचायची, हा सर्वात मोठा प्रश्न तमाम सिनेमा-नाट्य कलावंत, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञांपुढे असणार. त्याचे एक उत्तर काळानुरूप काही बदल करून तंबूतला सिनेमा हे आहेच. तो आपल्यातून जाऊन शेकडो वर्षे तर उलटली नाहीतच. हाक मारली तर येऊ शकतो तो परत. त्यावर सोशल डिस्टिन्सिंग आणि गर्दीचं समीकरण जमवून, थोडासा मुलामा चढवत रसिकांसमोर उभा राहू शकतो. कारण या जगात नवीन काहीच निर्माण होत नाही. जे येतं ते जुन्याची मोडतोड करून. त्यात काही बदल करूनच. कारण बदलांना आपलंसं करत आव्हानाशी लढणं हा माणसाचा स्वभाव आहेच. कलावंत मंडळी त्यात आघाडीवर असणारच. होय नाॽ

No comments:

Post a Comment