Thursday 9 April 2020

मदत मागितली तर...

बऱ्याच वेळा असं असतं की, सगळे आपले म्हटले तरी संकटाच्या काळात कोण खरंच मदतीला येईल, हे संकट आल्यावरच कळतं. आरोग्य खात्यात काम करणारी उमा टोकाची मदत करणाऱ्याच्या शोधात होती. तिने खूप धुंडाळले. पण एकही जण भरवशाचा वाटत नव्हता. तिला राहून राहून याचं आश्चर्य वाटत होतं की, सगळं व्यवस्थितपणे चाललेलं तिचं आयुष्य एकदम घरंगळत कसं काय गेलंॽ तिचे वडील सहकारी बँकेत सहव्यवस्थापक पदावर. आई पतसंस्थेत कर्मचारी. घरी बऱ्यापैकी पैसा खुळखुळत होता. उमाची छोटी बहीण मोहिनी एकदम सुंदर, चुणचुणीत, हुशार. उमाला कष्टात सरस होती. तिनं आरोग्य खात्याची परीक्षा पास केली. वडिलांनी राजकीय वजन वापरून त्यांनी तिला आरोग्य खात्यात नोकरीला लावलं. कुटुंबाला सोडून दुसऱ्या शहरात नोकरीसाठी जाणं तिला थोडसं जडच गेलं. पण हळूहळू ती कामात रुळली. दिसायला बऱ्यापैकी आकर्षक असलेली उमा एक अपवाद वगळता कोणात फारशी अडकली नव्हती. सहा वर्षांपूर्वी बी.एस्सी. थर्ड इअरला असताना तिला नुकतेच जॉईन झालेले प्राध्यापक राहुल खूप आवडले होते. दोघांमधील गुरु-शिष्याचं नातं वेगळ्या वळणावर निघालं होतं. पण संस्थाचालकांनी राहुलची जोरदार कानउघाडणी केली. मग तो बोलण्यास टाळाटाळ करू लागला. कंटाळलेल्या उमानं त्याच्या आठवणी तशाच उराशी ठेवत परीक्षांकडे लक्ष वळवले. त्यात यश मिळवून नोकरी पटकावली. राहुलसोबतच्या प्रेमात अपयश आल्यानंतर आता आई-वडिल जे स्थळ आणतील तेच स्वीकारायचे, असं तिनं ठरवलं होतं. म्हणून आरोग्य मंत्रालयात मोठ्या पदावर काम करणाऱ्या गणेशच्या गळ्यात तिनं काहीही विचार न करता माळ घातली. महिना दोन महिन्यात गणेश उमाची मुंबईत बदली करून घेईल, असे ठरले होते. आई-वडिलांचा आदर करण्याच्या नादात आपण किती गंभीर चूक करून ठेवली हे तिला हनीमुनच्या आठवडाभरातच कळालं. एकुलता एक गणेश अय्याशी वृत्तीचा होता. पदाचा वापर करून पैसा खायचा आणि कॉलगर्ल्सवर उधळायचा, मनसोक्त दारू प्यायची. हा त्याचा आवडता उद्योग होता. त्यामुळं उमाच्या बदलीसाठी त्यानं दोन वर्षांत काडीचेही प्रयत्न केले नाही. उलट तो तिच्याकडून अधून-मधून पैसे घेऊन जाऊ लागला. उमाची एक वर्गमैत्रिण गणेशसोबत मंत्रालयात काम करत होती. एकदा तिनं सहज गमतीगमतीत राहुलबद्दल त्याला सांगितलं. तेव्हापासून त्यानं एकट्या राहत असलेल्या तिच्या चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले होते. दुसरीकडं तो उमाची लहान बहीण मोहिनी अश्लिल मेसेज, व्हिडिओ क्लीप्स पाठवू लागला होता. तिच्या भावी नवऱ्याला काहीबाही सांगू लागला होता. ताई तुझ्या नवऱ्याचा बंदोबस्त कर, असं मोहिनी म्हणू लागली होती. हे कमी होतं म्हणून की काय, ऑफिसमधील उमाचे वरिष्ठ केशवराव काहीतरी कारण काढून तिच्या अंगचटीला जात होते. तुझ्यासाठी काहीही करू शकतो, असं म्हणत होते. पण तिची मुळीच इच्छा नव्हती. गेल्या महिन्यात मॉलमध्ये अचानक भेटलेल्या राहुलभोवती तिचं मन घुटमळू लागलं होतं. त्यानं लग्न केलं नाही, हे कळाल्यावर तर तिच्या वेदना प्रचंड वाढल्या होत्या. पण नियती तेवढ्यावर थांबली नाही. लाचेच्या सापळ्यात अडकून निलंबित झालेला गणेश घरी येऊन बसला. आता यातून सुटका व्हायची असेल तर एकच मार्ग. तो म्हणजे गणेशचा काटा काढायचा. या विचारानं उमाला घेरलं होतं. आणि तिच्या डोळ्यासमोर चमकला सामाजिक कार्यकर्ता मनोजचा चेहरा. आरोग्य खात्यात ठेकेदारी करणारा मनोज तिला नेहमी म्हणायचा, ताई...काही मोठं काम सांगा. कोणाचीही वाट लावू शकतो आपण. त्याचे खास कार्यकर्ते फैय्याज आणि अखिलनं तर एकदा कमरेला लावलेलं पिस्तुलही दाखवलं होतं. कोणाला थेटपणं सांगावं, असा प्रश्न उमासमोर होता. पण तशी वेळ आलीच नाही. डोकं दुखू लागलं म्हणून ती दुपारी घरी आली तर गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचे  प्राण कधीच निघून गेले होते.

No comments:

Post a Comment