Thursday 30 April 2020

ब्लॅकमेल

कोणाचीही नजर सहज वेधून घेईल अशी सुवर्णा आणि तिच्या तुलनेत जेमतेम दिसणारा पती नरेश लग्नापूर्वी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. गरिबीमुळं दोघांचं शिक्षण जेमतेम. नोकऱ्याही बेतास बात. नरेश छोट्याशा कन्स्ट्रक्शन कंपनीत अकाऊंटंट म्हणून कामाला लागला तर सुवर्णाला लग्न झाल्यानंतर लगेच एका औषधी विक्री दुकानात काम मिळाले. दोघेहीजण अतिशय प्रामाणिक, कष्टाळू. त्यामुळे मालकांची त्यांच्यावर मर्जी जडली. दोघांचा पायगुण म्हणा की मालकांची मेहनत किंवा अजून काही असेल. नरेशची कंपनी राज्यातील आठ-दहा मोठ्या शहरात विस्तारली. सुवर्णा काम करत असलेल्या औषधी दुकानाचा ब्रँड राज्यभरात पसरला. तीन वर्षांतच एका दुकानाची तीस दुकाने झाली. या साऱ्याचा दोघांच्या वेतनावर परिणाम झाला. मग त्यांनी छानसे घर, दुचाकी खरेदी केली. मुलांना चांगल्या शाळेत टाकले. दिवसेंदिवस सुवर्णाच्या चेहऱ्यावरील तेज आणि नरेशचा आत्मविश्वास वाढत चालला होता. त्याने घर-दुकाने भाड्याने मिळवून देणारी एजन्सी भावाच्या म्हणजे मिलिंदच्या नावावर सुरू केली होती. त्याने मिलिंदला स्वतःच्या घरी आणले होते. नरेशपेक्षा तो अतिशय देखणा, चटपटीत, लाघवी. त्यामुळे त्याचाही चांगलाच जम बसू लागला. इकडं सुवर्णाचे चाहते वाढले होते. सामाजिक सेवेच्या मार्गानं राजकारणात पडावं अशी तिची कॉलेजच्या काळात तीव्र भावना होती. पण तेव्हा ते शक्य झालं नाही. पण आता तिनं नगरसेवकपदाची निवडणूक लढवावी, असे प्रस्ताव येऊ लागले होते. ते तिनं नम्रपणे फेटाळून लावले. कारण महिनाभरापूर्वी तिचं एक जुनं  दुखणं उफाळून आलं होतं. खरं तर कॉलेजमधले असिमसोबतचे प्रेम प्रकरण ती विसरली होती. त्या काळात स्वप्नाळू असिम तिच्यासाठी वेडावला होता. कविता, कथा, नाटक लिखाण करणाऱ्या असिममध्ये तिचं भावनिक मन गुंतत चाललं होतं. पण एका खोलीतील निवासी, केवळ लेखणीवरच आयुष्य कंठण्याची भाषा करणाऱ्या असिमची पुढे भरभराट होणं कठीण. आपल्या प्रगतीत तो फार कामाचा नाही, असं तिचं सावध, व्यवहारी मन तिला बजावत होतं. शिवाय तो आपल्यावर नजर ठेवतो. असंच राहा, तसेच कपडे घाल असं बजावत राहतो, हेही खटकत होतं. मग ती त्याचाच मित्र, व्यवहारनिपुण, हॉटेलमालकाचा मुलगा असलेल्या आशुतोषसोबत बिनधास्त फिरू लागली. ‘आता आपल्यात प्रेमाचे नाते संपले. पुढे कधी भेटलोच तर उत्तम मित्र, सहकारी म्हणून काम करू’, असं तिनं असीमला सांगून टाकलं. तिच्या शब्दांनी कोसळलेला तो शहर सोडून गेला. त्यामुळं सगळं सोपं झालंय, असं तिला वाटत असतानाच आशुतोष काहीही न सांगता परदेशात उच्च शिक्षणासाठी गेला. मग आई-वडिल म्हणतील ते स्थळ चांगलं असं म्हणत तिनं नरेशला स्वीकारलं. असीम, आशुतोषसोबत घालवलेल्या क्षणांची काही छायाचित्रे नाटकाचा ग्रुप लीडर मिथुनकडे असं कळाल्यावर ती काही वर्षे चिंतेत होती. पण संसार स्थिरावला. तशी चिंता चांगलीच कमी झाली होती. ती महिन्याभरापूर्वी वाढली. कारण एक महिला सारखे कॉल करत होती. आशुतोष, असीमसोबतची छायाचित्रे नरेशपर्यंत पोहोचू नयेत, असे वाटत असेल तर दोन लाख रुपये दे, असं म्हणत होती. कॉलनीत सतत पाठलाग करणारा, वाईट नजरेनं पाहणारा नरसिंग यामागे असावा, असं तिला वाटू लागलं होतं. दुसरं मन म्हणत होतं मिथुनचा दूरचा नातेवाईक, आपल्यासोबत नोकरी करणारा भगवानदासच असावा. कारण अंगचटीला येऊ लागल्यावर तिनं त्याला फटकारलं होतं. तिसरा विचार असाही येत होता की, असीम किंवा आशुतोषपैकी एकाचा हा उपद्व्याप असेल काॽ की घरचा भेदी. नरेशला काही कळण्यापूर्वीच प्रकरण निपटण्याचं तिनं ठरवलं आणि सायबर पोलिस विभागातील खास मैत्रिण इन्सपेक्टर चित्राशी संपर्क साधला. तपास सुरू झाला तर दोन लाख मागणारे सहाही मोबाईल क्रमांक बंद होते. मग इन्सपेक्टर चित्रांनी दुसऱ्या मार्गाने तपास सुरू केला आणि ब्लॅकमेलर शोधला.


No comments:

Post a Comment