Thursday 30 April 2020

तिनं बदललं होतं जीवन … तरीही

त्रिलोक म्हणजे कॉलेजातला दादाच. त्याचे वडिल तर मोठे उद्योजक. राजकारण्यांमध्ये उठबस होती. पोलिस खात्यातील बडे अधिकारी मित्र होते. त्यामुळे त्रिलोकची दादागिरी कॉलेजचे प्राचार्यही खपवून घेत होते. तो कधी एकदाचा पास होऊन कॉलेजातून बाहेर पडतो, असे प्राचार्यांना वाटत होते. याला कोणी वळणावर आणू शकत नाही, याबद्दलही ते ठाम होते. पण एक दिवस चमत्कारच घडला. प्राचार्यांसमोरच कॉरिडोरमध्ये एका मुलीने त्रिलोकच्या कानाखाली आवाज काढला. शिवाय त्याच्या दोन टग्या मित्रांचीही धुलाई केली. दुसऱ्या दिवशी तर ती तिच्या चार-पाच भाऊ आणि त्यांच्या मित्रांना घेऊन कॉलेजात आली. त्यांनी मैदानावर त्रिलोक आणि त्याच्या टोळक्याला घेरले आणि तुफान झोडपून काढले. हे सगळे पाहून प्राचार्य कमालीचे अचंबित झाले. त्यांनी माहिती घेतली तर ती मुलगी म्हणजे मोना बाजूच्या आर्किटेक्ट कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मोनाचे वडील देशाच्या राजकारणात दबदबा असलेले माजी मंत्री. दोन मावसभाऊ आमदार, एक बहीण केंद्रीय प्रशासकीय अधिकारी आहे, असे कळाले. ते सारे ऐकून त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाहता पाहता त्रिलोकचा माज, मस्ती उतरत गेली. पण त्यांना जबर धक्का बसला जेव्हा त्रिलोक आणि मोना लग्नाची पत्रिका घेऊन घरी आले. त्यानं सांगितलं की, मी सगळी गुंडगिरी सोडून दिली. आणि तिला माझी जीवनसाथी बनण्याची विनंती केली. तिच्या आई-वडिलांनी, भाऊ-बहिणींनी थोडासा विरोध करून आमच्यातील नात्याला मान्यता दिली. मोना म्हणाली की, एखाद्या गुंडाचं आयुष्य स्त्रीमुळे किती बदलते, हे पाहून मी चकित झालीय. लग्नाला नक्की या, असे म्हणत मोना-त्रिलोक दालनाबाहेर पडले. त्या पाठमोऱ्या जोडीकडे पाहत प्राचार्य मनाशीच बोलू लागले, याला अनेक प्रकारचे नाद, छंद. मोना  आता त्याच्या प्रेमात असली तरी ती उथळ, भडक. तरीही यांचा संसार सुखाचा व्हावा.
पाहता पाहता दहा वर्षे उलटून गेली. प्राचार्य निवृत्त झाले. योगायोगाने त्रिलोक-मोना ज्या आलिशान अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होते. त्या अपार्टमेंटच्या समोरील कॉलनीत राहण्यास आले होते. तिथं त्यांनी एक बंगला विकत घेतला होता. अधून-मधून कधीतरी त्रिलोक-मोना आणि त्यांच्या दोन मुली चारचाकीतून जाताना दिसत. पण प्राचार्यांनी त्यांच्याशी बोलणं, ओळख दाखवणं टाळलं. बरे झालं आपला अंदाज चुकला. यांचा संसार सुखाचा सुरू आहे, असं त्यांना वाटत होतं. पण रविवारी पहाटे भलतंच घडलं. प्राचार्य मॉर्निंग वॉकवरून परतत असताना अपार्टमेंटसमोर गर्दी होती. पोलिस व्हॅन आली होती. थोड्याच वेळात महिला पोलिसांच्या गराड्यात मोना खाली आली. व्हॅनमध्ये बसली. त्यापाठोपाठ त्रिलोकचा मृतदेह आला. अँब्युलन्स सरकारी रुग्णालयाकडे तर व्हॅन पोलिस ठाण्याकडे वळाली. अंदाज चुकला नाही, याचे प्राचार्यांना थोडेसे समाधान वाटले. पण संसार मोडल्याचे पाहून ते दु:खीही झाले. दुसरीकडे इन्सपेक्टर सुरासे तथ्य, पुरावे शोधत होते. त्रिलोकच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून मोनाने भली मोठी सुरी त्याच्या पोटात खुपसली होती. तर मोनाचे ड्रेस डिझायनर मनीष आणि कापड व्यापारी अवनीशसोबत खुलेआम फिरणे, रात्री उशिरापर्यँत पार्टी करणे त्रिलोकला मान्य नव्हते, असे सुरासेंना कळाले. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये असेही समोर आले की, सुरीचा घाव लागण्याच्या वीस ते तीस सेकंद आधी पोटात घाव झाला होता. मोना बेडरुममध्ये ठेवलेली सुरी आणण्यासाठी गेली असताना कोणीतरी घरात असावे, अशी शंका सुरासेंना आली. मोनावर वाईट नजर ठेवणारा सुरक्षा रक्षक दलीपसिंग, कॉलेज जीवनात तिचा आशिक असलेला आणि आता अपार्टमेंटमधील दोन गाळ्यांत आईस्क्रीम पार्लर चालवणारा मनमीत की तिचे खास मित्र मनीष, अवनीश. कोणी त्रिलोकवर आधी वार केला. की मोना खोटं बोलतीय, असा प्रश्न त्यांना पडला होता.
  

No comments:

Post a Comment