Friday 14 August 2020

पत्थरात विचारांचे प्राण...

‘स्वर, शिल्प आणि रंग या साऱ्यांमधून उत्कट परिणाम साधणं हाच कलेचा हेतू. शिल्पकारांत ऑग्युस्त रोदँ हे त्या अर्थाने इंप्रेशनिस्ट आहेत’ असे नोबेल विजेत्या आन्द्रे जीद यांनी म्हटलं होतं. ते ज्या रोदँबद्दल सांगत होते. त्याचा साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी युरोपीय खंडात प्रचंड बोलबाला होता. त्याच्या गेटस ऑफ हेल, द थिंकर, द किस, द थ्री शेडस्, एज ऑफ ब्रांझ या गाजलेल्या शिल्पाकृती आजही त्याची साक्ष देत आहेत. पत्थराला आपल्या मनासारखे वळवून त्यात भावना ओतण्याचे अजब कौशल्य रोदँमध्ये उपजतच होते. हेच कौशल्य तरुण मराठी शिल्पकार सुनिल काशिनाथ देवरे यांच्यामध्येही आले आहे, असे त्यांच्या कलाकृती पाहून वाटते. ते सध्या मीरा – भाईंदर महापालिकेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा अश्वारूढ पुतळा तयार करत आहेत. वीस फूट उंचीच्या चबुतऱ्यावर तीस फूट उंचीचा हा पुतळा निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानिमित्ताने देवरे यांच्या इतर शिल्पांचे दर्शन झाले. तेव्हा मन थक्क होऊन गेले. एवढ्या उंचीचा तरुण शिल्पकार मराठी मातीत रुजला, फुलला याचा मनस्वी अभिमान वाटला. 

मुळ धुळ्याचे असलेले सुनिल यांचे वडिल पुरातत्व विभागात संवर्धन अधिकारीपदावर होते. वडिलांचे बोट धरून त्यांनी लहानपणी शेकडो वेळा वेरुळ लेणी पाहिली. आपण मोठेपणी शिल्पकारच व्हायचे, असे त्यांनी ठरवले. 1992 मध्ये जेजे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर मागे वळून पाहण्याची गरजच पडली नाही. फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान, अमेरिकेत, तुर्कस्थानात त्यांच्या कलाकृती आहेत. त्यांची हंटर, बोटमॅन, लायन, लँडींग बर्ड आदी शिल्पे रोदँची आठवण करून देतात. त्यांच्या बोटातून घडलेली वेरुळ – अजिंठ्याची प्रतिकृती त्यांनी भारतीयत्वाची नाळ किती पक्की धरून ठेवली आहे हे लक्षात आणून देतात. 

तसं पाहिलं तर भारतात फार पूर्वीपासून या अतिशय कठीण कलेची पाळेमुळे रुजली आहेत. अजिंठा-वेरुळ आणि ठिकठिकाणच्या लेणी त्याची साक्ष देतात. पण दुर्दैवाने या लेण्यांमधील कला पुढे अपेक्षेप्रमाणे फुलली, रुजली नाही. मधली अनेक वर्षे शिल्पकलेला गांभीर्याने पाहिले गेले नाही. राजा-महाराजांचे पुतळे एवढ्यापुरतीच ती मर्यादित राहिली. ब्रिटीशांच्या अमदानीत दगडांमधून भावना व्यक्त करण्याला थोडी चालना मिळाली. आणि अलिकडील काळात या कलेकडे तरुणाईचा ओढा किंचित वाढल्याचे दिसते. तरीही चित्रकारांच्या तुलनेत शिल्पकारांची संख्या कमीच. देवरे याचे उत्तर देताना सांगतात की, ‘प्रदीर्घ साधना हे तर कोणत्याही कलेच्या यशाचे गमक आहे. पण चित्र, संगीत, गायन, वादनाच्या तुलनेत शिल्पकलेत यश खूप उशिरा मिळते. कारण कोणतेही शिल्प तयार होण्यासाठी कित्येक महिने लागतात. नेमके काय सांगायचे आहे, हे ठऱवून चित्र रेखाटावे लागते. मग मातीत तयार करावे लागते. मग त्याचा लाकडी साचा तयार करावा लागतो आणि शेवटी दगडाचे रुप बदलावे लागते. त्यात प्राण फुंकावे लागतात. तरच ते चहुबाजूंनी जिवंत होते. दुसरे म्हणजे शिल्पकाराला नाभिक, चित्रकार, फॅशन डिझायनर, प्रकाश योजनाकार, सुतार अशा सर्व कलांमध्ये पारंगत व्हावे लागते. एवढा वेळ देणारे बोटावर मोजता येतील एवढेच लोक आहेत. पण असेही आहे की, ग्रामीण भागामध्ये उत्तम शिल्पकार, मूर्तीकार आहेत. त्यांना किमान प्रशिक्षणाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी महाविद्यालयात शिल्पकलेचा विभाग सुरू केला तर जागतिक कीर्तीच्या कलाकृती पाहण्यास मिळतील.’ देवरे म्हणाले ते खरंच आहे. शेवटी समाजाची प्रगती केवळ कारखाने आणि मोठे रस्ते यावरच ठरत नाही. तर कलेच्या प्रांतात जगासाठी काय नवे निर्माण केले याचीही मोजदाद होत असते. होय नाॽ

No comments:

Post a Comment