Friday 21 August 2020

नातं... फिल्म फेस्टिव्हलचे

 प्रत्येक कलेची एक जागतिक भाषा असते. ती कोणत्याही अडथळ्याविना रसिकांपर्यंत पोहोचतेच. म्हणजे एखाद्या भारतीय चित्रकाराने रेखाटलेले एब्सर्ड चित्र किंवा शिल्प असेल, तर त्यात चित्रकार, शिल्पकाराला नेमके काय म्हणायचे आहे, हे अगदी रशियाच्या एखाद्या छोट्या शहरातील शिल्प, चित्रप्रेमीला कळते. सिनेमा तर सर्व कलांतील अत्यंत प्रभावी, तीक्ष्ण, टोकदार माध्यम. इजिप्शिअन दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे. कोणता संदेश द्यायचा आहे, हे नाशिक, सोलापूरच्या सिनेमाप्रेमीला लक्षात येते. अगदी हृदयापर्यंत भिडू शकते. त्यातील बारकाव्यांमध्ये तो गुंग होऊन जातो. सिनेमातील कलावंत, पटकथा लेखक, दिग्दर्शकाची रसिकांना जोडणारी भाषा, नाते तयार होते. पण, ही जोडणी केवळ तिथपर्यंत थांबत नाही, तर सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्यांमध्येही एक नाते तयार होते. त्याचा अनुभव औरंगाबादेत सात-आठ वर्षे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करणाऱ्या निलेश राऊत, सुबोध जाधव आणि प्रख्यात दिग्दर्शक शिव कदम यांना आला. झाले असे की, त्यांच्याकडे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, केरळचे  (एफएफएसआय) एक ऑनलाइन निमंत्रण आले. तेथे २० ते २६ ऑगस्ट या कालावधीत जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या सिनेमांचा ऑनलाइन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तो पाहण्याची संधी जगभरातील रसिकांना उपलब्ध होणार आहे. त्यात औरंगाबादकर रसिकांनीही सामील व्हावे, अशी निमंत्रणामागची भावना. 

हे कसे काय घडले? त्याबाबत कदम यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नाथ फाऊंडेशनच्या सहकार्याने औरंगाबादेत होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलची लोकप्रियता वर्षागणिक वाढत गेली. दर्जेदार सिनेमांच्या देखण्या आयोजनामुळे देशभरातील मान्यवर महोत्सवाला हजेरी लावू लागले. एफएफएसआयचे व्ही. के. जोसेफ त्यापैकी एक. 

औरंगाबाद फेस्टिव्हलचे आयोजन पाहून ते भारावून गेले. त्यांनी जेव्हा सत्यजित रे यांच्या सिनेमांचा फेस्टिव्हल आयोजित करण्याचे ठरवले, तेव्हा औरंगाबादकरांना आवर्जून निमंत्रण दिले. कदम यांनी आणखी जे सांगितले ते अधिक महत्त्वाचे. ते म्हणजे, दर्जेदार सिनेमे आणि देखणे आयोजन तर जोसेफ यांना भावलेच. पण त्यापेक्षाही त्यांना औरंगाबादच्या रसिकांचे विलक्षण कौतुक वाटले. ‘जगभरातील सिनेमांना तुमचे लोक गर्दी करतात, सिनेमात नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेण्यासाठी धडपडतात, हे मला खूपच वेगळे वाटले’, अशी नोंद करत जोसेफ यांनी निमंत्रण धाडले. कदम यांच्या मते हे केवळ औरंगाबादकरांचेच नव्हे, तर तमाम मराठी रसिकांचे कौतुक आहे. ‘एफएफएसआय’च्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर या महोत्सवाचा आनंद घेता येईल. पथेर पांचाली, गणशत्रू, जलसागर, चारुलता, तीन कन्या, आरण्येर दिन रात्री, आगुंतक हे सिनेमे पाहण्यास मिळणार आहेत. आधी मल्याळी सिनेजगतातील मान्यवर षण्मुखदास, के. रामचंद्रन, मीना टी. पिल्लई, डॉ. जी. आर. संतोषकुमार, व्ही. एस. बिंदू, अनु पाप्पाचन, टी. के. उमेर सिनेमाची सूत्रे उलगडून सांगतील आणि मग तो रसिकांना पाहण्यास मिळणार आहे. 

सिनेमानंतर अर्थातच ऑनलाइन संवादही होईल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘एफएफएसआय’ने रे यांच्या सर्व सिनेमांच्या निगेटिव्हजचे डिजिटाझेशन करून घेतले. त्यामुळे ते अधिक सुस्पष्टपणे पाहायला मिळतील. सिनेमा ही खरे तर सिनेगृहातच, गर्दीत पाहण्याची, अनुभवण्याची गोष्ट. कोरोना संकटाने ती हिरावून घेतली असली, तरी त्यावर मात करण्याचा एक मार्ग सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झुंजणाऱ्यांनी शोधून काढला आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच.

No comments:

Post a Comment