Friday 14 August 2020

भरधाव ट्रक कोणाचा...

एक तरुण आपल्या पत्नीसोबत शहराबाहेर फेरफटका मारण्यासाठी जातो. संध्याकाळची वेळ असली तरी थ्रिल अनुभवण्याच्या नादात थोड्या निर्जन रस्त्यावर चारचाकी नेतो. काही वेळाने त्यांच्या गाडीचे चाक पंक्चर होते. तो तरुण चाक बदलण्यासाठी गाडीबाहेर पडतो. चाक बदलू लागतो आणि अचानक मागून भरधाव आलेला ट्रक त्याला चेंडूसारखे उडवतो. तरुण जागीच ठार होतो. हे दृश्य पाहून त्याची पत्नी, घटनेची एकमेव साक्षीदार बेशुद्ध पडते. दोन तासानंतर शुद्धीवर येते. तिला ट्रकचा नंबर, वर्णन आठवत नाहीतसं पाहिलं तर हा अपघातच. पण नेहमी शहराजवळच्या तलावाकडे भटकण्यासाठी जाणारे हे जोडपे नेमके त्या दिवशी निर्जन रस्त्यावर का गेले असावे? नेमके चाक कसे पंक्चर झाले. फारशी वर्दळ नसलेल्या त्या रस्त्यावर त्याचवेळी वेगात ट्रक कसा आला, असे प्रश्न इन्सपेक्टर महावीर यांना पडले. त्यांनी पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केलीसुदीप आणि अनामिका हसतमुख जोडपे. सुदीप एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता तर अनामिका एका प्रयोगशाळेत संशोधक होती. दीड वर्षांपूर्वीच त्यांच्या घरच्यांनी रितसर पाहण्याचा कार्यक्रम करून त्यांना विवाह बंधनात बांधले होते. सुरुवातीच्या काही महिन्यात एकमेकांना समजून घेण्यात थोडी अडचण झाल्याने त्यांच्यात दोघांपैकी कोण हुशार या मुद्यावरून वादावादी झाली होती. अगदी एकदा अनामिका संतापून माहेरीही गेली होती. पण त्यानंतर सारे सुरळित झाले, असे त्यांच्या आईवडिलांनी सांगितले. मग पोलिसांनी इतर दुवे शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा असे लक्षात आले की, कोचिंग क्लासमध्ये सुदीप अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या मार्गदर्शनात चार विद्यार्थ्यांनी सलग चार वर्षे राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यामुळे क्लासेसचे संचालक तातेडसर त्याच्यावर प्रचंड खुश होते. त्यांनी त्याचे वेतन दहा हजारांनी वाढवले होते. पण त्यामुळे त्याचे सहकारी नितीन, देवीदास त्याच्यावर खार खाऊन होते. शिक्षकांच्या मिटिंगमध्ये ते त्याचा पाणउतारा करण्याची संधी सोडत नव्हते. त्याचे कायमचे ‘कल्याण’ झाले पाहिजे, असे ते एकमेकांशी बोलताना म्हणत. पण नितीन आणि देवीदास यांच्यापेक्षाही जास्त राग तातेडसरांच्या चुलत बहिणीची मुलगी मानसीचा होता. त्या मागे कारणही तसे होते. सुदीप नोकरीस लागला. तेव्हा मानसी आणि त्याची चांगली अगदी घट्ट मैत्री झाली होती. तातेड यांना मूलबाळ नव्हते. ते मानसीलाच मुलगी मानत. क्लासच्या पैशांचा सगळा व्यवहार तीच बघत होती. पुढे चालून क्लासवर आपलीच मालकी होईल. त्यावेळी आपण दोघे मिळून हा व्यवसाय करू. राज्यातील प्रत्येक शहरात तातेड क्लासेसची शाखा असेल, असे तिचे म्हणणे होते. सुदीपला त्यात फारसे स्वारस्य नव्हते. पण सरांची मानसकन्या म्हणून तो तिला फारसा विरोध दर्शवत नसे. त्याने अनामिकासोबत लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा मानसीचे भावविश्वच कोलमडून पडले. तिने भरपूर त्रागा केला. अनामिकाची भेट घेऊन तिला सुदीपसोबतचे तिचे काही फोटो दाखवावेत, असा विचारही तिने केला. पण फोटोमध्ये मैत्रीपलिकडचे काही दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर शांत राहण्याचे ठरवले. इन्सपेक्टर महावीर आणखी खोलात शिरले. तेव्हा त्यांना एक आणखी धक्का बसला. क्लासेसमधील शिक्षिका मौसमीसोबत सुदीपचे जवळिकीचे संबंध होते. अगदी पळून जाऊन लग्न करण्यापर्यंतची त्यांची तयारी होती. पण मौसमीचा नवरा प्रकाशला याची कुणकुण लागताच त्याने सुदीपच्या श्रीमुखात भडकावली होती. त्यानंतर त्याने एकतर्फी संबंध संपवून टाकले होते. पण मौसमींनी सुदीपचा पाठलाग सोडला नव्हता. लग्नानंतर सुदीप – अनामिकामध्ये हुशारीवरून झालेल्या वादाचे एक कारण अनामिकाच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या हितेंद्रही होता. त्या दोघांचे लग्नाआधीपासूनच प्रेम प्रकरण असल्याचा सुदीपला संशय होता. त्यातच प्रयोगशाळेचे मालक कनोजिया आणि अनामिकाचे मोबाईलवर चॅटिंग त्याला खटकत होते. त्याचा जाब विचारण्यासाठी तो प्रयोगशाळेवर गेला. तेव्हा कनोजियांनी त्याला अक्षरश: हाकलून दिले होते. या गुंतागुंतीच्या प्रकरणातील सर्वांचे महावीर यांनी जाबजबाब नोंदवले. मोबाईल कॉल रेकॉर्डिंग तपासले. घटनास्थळाची कसून पाहणी केली. खबऱ्यांना अलर्ट केले आणि खुनी शोधला.



No comments:

Post a Comment