Thursday 6 August 2020

पहिला प्रवेश : रंगभूमीवर

खरंतर कोणत्याही एका कलेची दुसरीशी तुलना होऊच शकत नाही. पण नृत्य, नाट्य, चित्र, संगीत, शिल्प अशा सर्व कलांचा संगम नाट्यकलेत होतो. म्हणून मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये नाटकवाल्यांचा विशेष दबदबा असतो. त्यामुळेच की काय अलिकडील काळात हजारो तरुणांना नाट्यक्षेत्रात काम करण्यासाठी धडपडत आहेत. पण एकीकडे अभियंता, डॉक्टर, संगणक तज्ज्ञ होण्याची इच्छा. दुसरीकडे नाटकाचे शास्त्रशुद्ध शिक्षण कसे घ्यावे, असा पेच त्यांच्यासमोर होता. नव्या शैक्षणिक धोरणाने तो सोडवला आहे. एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रमाला त्यांना प्रवेश मिळू शकेल, अशी व्यवस्था निर्माण होत आहे. म्हणजे आयआयटी होताना नाट्यकलेचा विद्यार्थी होता येईल.

दिल्लीच्या एनएसडी म्हणजे राष्ट्रीय नाट्य विद्यालयात १९७० नंतर प्रवेशासाठी मारामार होती. पण तेथे बोटावर मोजण्याइतक्याच जागा असायच्या. त्यामुळे तत्कालिन ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी १९७७-७८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका खोलीत नाट्यशास्त्र विभाग सुरू केला. एकापाठोपाठ एक नाट्य महोत्सव गाजू लागले. आणि काही वर्षांतच नाट्यशास्त्र विभाग एका खोलीतून स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित झाला.

प्रा. सोनटक्के यांच्यानंतर विभागप्रमुख झालेले वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण

देशपांडे यांनी विभागाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. पण केवळ प्रा. देशपांडेच विभागाचे शक्तीस्थान नव्हते. तर त्यांच्याबरोबरीने किंबहुना काकणभर सरस

प्रतिभावान मंडळी प्राध्यापकपदी होती. त्यातील एक होते प्रा. कुमार देशमुख. त्यांनी

दिग्दर्शित केलेल्या ‘स्मारक’ नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत इतिहास निर्माण केला होता. आवाजावर प्रचंड हुकुमत असलेले प्रा. देशमुख अतिशय कठोरपणे नाटकाच्या तालमी घेत. दुसरे होते प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब. लोककलांचे गाढे अभ्यासक, हजरजबाबी असलेल्या अचलखांबही मुलांना घडवण्यात वाकबगार होते. प्रा. डॉ. अलोक चौधरी म्हणजे उत्तम अभिनेते आणि प्रकाशयोजनेचे बादशाह. इंग्लंडमध्ये नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतलेले प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर अत्यंत कुशल दिग्दर्शक होते. एकेका प्रसंगाच्या सलग दहा-पंधरा तालमी घेऊन ते कलावंतांना भूमिकेत समरस होण्यास भाग पाडत. या चौघांसोबत होते प्रा. प्रताप कोचुरे. संगिताचे अत्यंत उत्तम ज्ञान असलेले प्रा. कोचुरे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियही होते. या सर्वांमुळे नाट्यशास्त्र विभागाच्या यशाची कमान चढत गेली. जिथे दोन

विद्यार्थी मिळवणे मुश्किल होते. तिथे एका जागेसाठी सहा अर्ज येऊ लागले. १९९० च्या दशकात विभागाचे एकांकिका, वार्षिक नाट्य महोत्सव म्हणजे धमाल होती. वर्षभर तालमींचा राबता होता. वर्षा उसगावकर, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, प्रतिक्षा लोणकर, नंदू काळे, नंदू भुरे, संजय भुरे आणि अनेकजण अशाच महोत्सवातून तयार झाले. आजही प्रा. डॉ. जयंत शेवतेकर, प्रा. अशोक बंडगर आणि त्यांचे सहकारी धूमधडाक्यात महोत्सवांचे आयोजन करतात. त्यात अनेक सरस संहितांचे सादरीकरण होत आहे. नव्या युगाची पावले ओळखून तांत्रिक बाबींचेही धडे गिरवून घेतले जात आहेत. कित्येक विद्यार्थ्यांचा टीव्ही, सिनेमा, रंगभूमीवरील प्रवेश तरुण प्राध्यापक मंडळी सुकर करत आहेत.

पण सध्या रंगभूमी, सिनेमा गाजवत असलेल्यांना नाट्यशास्त्र विभागात प्रवेश कसा मिळाला. तर त्यासाठी विभागात जून-जुलै महिन्यात एक परीक्षा असे. म्हणजे प्रा. देशपांडे किंवा अन्य प्राध्यापक मंडळी एका वर्गात बसत. एकेका मुला-मुलीला बोलावून दहा-पंधरा मिनिटांचा सलग संवाद, प्रसंग उभा करण्यास सांगत. नाटक ही जिवंत कला. त्यामुळे थेट प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्याची कलावंतांची क्षमता आहे की नाही, हे तपासले जात असे. नंतर नाट्यक्षेत्रातील तत्कालिन घटना-घडामोडींविषयी काही तिरकस, गुगली प्रश्नही विचारत. अशा दोन-तीन फेऱ्या

झाल्यावर गुणवंतांची यादी जाहीर होई. गेल्या वर्षापर्यंत हीच पद्धत होती. पण आता कोरोनामुळे सर्वच अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑनलाईन होत आहेत. त्याचनुसार कलावंतांच्या सादरीकरणाचे व्हिडीओ मागवून त्यांची निवड करावी लागू शकते. आजकालच्या युगात कॅमेरा हेच महत्वाचे माध्यम झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापरातही काही गैर नाही. पण ज्यांच्याकडून आपल्याला काही शिकायचे आहे. त्यांच्या नजरेला नजर भिडवत किंवा त्यांच्या नजरेसमोर कठोर परीक्षेची मौज काही न्यारीच. कलावंत म्हणून घडण्याची ती पहिली पायरी. त्यावर यंदा नाही तर पुढील वर्षी तरी नवख्या कलावंतांना उभे राहण्यास मिळाले तर त्यांचाच जास्त फायदा.

 


No comments:

Post a Comment