Friday 21 August 2020

सगळेच अनैतिक ...

तीन दिवसांपासून दुकान बंद. गेल्या दहा वर्षांत तर असे कधीच झाले नाही. रितेशने मोबाईलवर कॉल केला. तर स्वीच ऑफ. त्याचा धीर सुटला. त्याने पलिकडच्या हरदीपला दुकानावर बोलावून घेतलं. दोघांनी बराच विचार केला. आणि घाबरत घाबरतच इन्सपेक्टर बुधवंतांसमोर जाऊन बसले. आम्ही दोघे वंडर आर्केडमधील दुकानदार आहोत. दोघांची मोबाईल, स्पेअर पार्ट विक्री आणि दुरुस्तीची छोटी दुकाने आहेत. दोघांच्या मध्ये कापडाचं दुकान आहे. त्याचा मालक सदानंद आमचा मित्र. दहा वर्षांपासून आमची दुकाने बाजूबाजूला. गेल्या तीन दिवसांपासून त्याचं दुकान बंद, मोबाईल स्वीच ऑफ आहे. एका दमात रितेशनं सांगून टाकलं. इन्सपेक्टर बुधवंतांनी तक्रार नोंदवून घेतली. मग हवालदार मसलेंना ‘वंडर आर्केडकडे चक्कर मारा. तिथं सीसीटीव्ही आहेत का पहा. सदानंदचं घर शोधा. खबऱ्यांना कळवा.’ अशा सूचना केल्या. रात्री नऊच्या सुमारास ते ठाण्यात परतले. तेव्हा महत्वाचा पण दुर्देवी क्ल्यू हाती लागला होता. पश्चिमेकडील डोंगराच्या पायथ्याशी एक प्रेत सापडलं होतं. ते बहुधा सदानंदचं असावं, असा हवालदार मसलेंचा अंदाज होता. त्यांनी दिवसभरात बरीच माहिती गोळा करून आणली होती.

त्या भागातील सर्वोत्तम कापड दुकानदार अशी कधी स्पर्धा झाली असती तर सदानंद शंभरजणांमध्ये पहिल्या पाचात नक्की आला असता. निवृत्त शिक्षक-शिक्षिकेचा तो एकुलता एक मुलगा होता. पदवीचं शिक्षण घेत असतानाच त्याने नोकरी करायची नाही. काका म्हणजे लक्ष्मणसारखा कापडाचा व्यवसाय करायचा असं ठरवलं होतं. म्हणून मोठी धडपड करून एका टपरीत दुकान सुरू केलं. देशाच्या कानाकोपऱ्यात जिथं महिलांसाठी खास कापड तयार होत होते. ते सदानंद आणायचा. गरज पडली तर घरपोच कपडे पोहोचवायचा. बोलण्यात अत्यंत मिठ्ठास आणि न कंटाळता पाठपुरावा, ही त्याला मिळालेली देणगी होती. कितीही तापदायक ग्राहक असेल तरी तो कापड खरेदी करायला लावायचाच. तेही चढ्या भावाने. त्यामुळे तो झपाट्याने लोकप्रिय तर झालाच शिवाय पैसाही कमावू लागला. मग टपरीत माल ठेवणं त्याला शक्य होईना. म्हणून त्याने वंडर आर्केडमध्ये चांगला मोठा गाळा घेतला. बचतीचे वीस लाख रुपये टाकले. फर्निचर तयार केले. आपण कधी माल खरेदीसाठी बाहेरगावी गेलो तर दुकान चालवण्यासाठी कोणीतरी हवे म्हणून चुणचुणीत दीपाची नियुक्ती केली. एकीकडे कॉलेजमध्ये तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या दीपाचे कापड विक्री व्यवसायात स्वारस्य वाढले होते. त्यामुळे सदानंद तिच्यावर जास्त विसंबून राहू लागला होता. त्याला घरची फार जबाबदारी नव्हती. आई-वडिलांसाठी दरमहा वीस हजार रुपये पाठवलं की तो मोकळा होत होता. त्यांचीही त्याच्याकडून फारशी अपेक्षा नव्हती. दर महिन्याला पैसे पाठवण्यापेक्षा सुनबाईचं मुख पाहू दे, असा धोशा त्यांनी लावला होता. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोराचा संसार लवकरात लवकर मार्गी लागावा, असा ते निकराचा प्रयत्न करत होते. नातेवाईकांमध्ये चांगली मुलगी शोधत होते. पण बहुतेक मुली विवाह होऊन सुखानं नांदत होत्या. चाळिशीच्या सदानंदसाठी पस्तिशीची पोरगी कुठून मिळेल, या नातेवाईकांच्या प्रश्नावर निरुत्तर होत होते. पण सदानंदला त्याची चिंता नसावी. तो फक्त पैसा कमावण्याच्या मागे लागला होता. शहरातील प्रख्यात कपडा व्यापारी प्रतिभाराणीसोबतचे संबंध सध्या पुरेसे आहेत, असे त्याला वाटत होते. पाच-सात वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त त्याची प्रतिभासोबत भेट झाली. पतीचे अपघाती निधन झाल्याने त्यांनी दुकान सांभाळणे सुरू केले होते. पन्नाशीच्या जवळपास असलेल्या प्रतिभा दिसायला अत्यंत मादक, आकर्षक. काम करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळे अल्पावधीतच त्या लखपती झाल्या. एकाची तीन दुकाने झाली. त्यातले एक त्यांनी पहिला सावत्र मुलगा प्रवीण आणि दुसरे प्रीतेशच्या नावावर करून दिले. तर तिसरे स्वत:कडे ठेवले. सदानंद एवढेच वय असलेल्या प्रवीण, प्रीतेशला सावत्र आईचे म्हणजे प्रतिभाचे सदानंदसोबतचे संबंध खटकत होते. पण प्रतिभा केवळ सदानंदवर अवलंबून नव्हती. दोन वर्षांपूर्वी तिचा नाट्यगृह मालक तनसुखसोबत याराना वाढला होता. आणि हा तनसुख सदानंद नसताना दुकानावर येऊन दीपाला बाहेर फिरायला घेऊन जायचा. प्रवीण, प्रीतेशही दीपाच्या मागे हात धुऊन लागले होते. एकूणात सगळेच नातेसंबंध अनैतिकतेच्या चक्रात फिरत होते. इन्सपेक्टर बुधवंतांनी सारे कसब पणाला लावले. खुनी कोण, खुनाचा कट कोणी रचला असावा, हे शोधले.  

No comments:

Post a Comment