Thursday 30 July 2020

फुलपाखरांचे संमेलन

एकीकडे शास्त्रज्ञ, संशोधक कोरोनाची लस काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे काही लोक लस येऊच शकत नाही. लसीच्या तारखेच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असं म्हणत आहेत. एका बाजूला कोरोना रुग्णांना जगवण्यासाठी काही क्षेत्रातील मंडळी झुंजत आहे. दुसरीकडे या लढाईतून स्वत:ची झोळी भरून घेणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. झुंजीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करून लक्ष वेधण्याचा डाव साधला जात आहे. अगदी शाळकरी मुलांनाही त्यातून सोडलेले नाही. आधी शाळा बंद कशा. त्या ऑनलाईन सुरू करा, असा धोशा लावण्यात आला. सुरु झाल्यावर सर्वांना कनेक्टिव्हिटी नाही, असा ओरडा झाला. मग सतत ऑनलाईनमुळे मुलांचे डोळे दुखतात. ते चिडचिडे होतात, असा गवगवा होऊ लागला. त्यामुळे अभ्यासाचा वेळ घटवण्यात आला. 
हे असे होत असताना काही लोक मुलांच्या विकासासाठी, त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी धडपडत आहेत. वाद-विवादापासून दूर राहत मुलांसाठी चांगले काम करत राहणे हेच त्यांचे ध्येय असते. मुलगा पडला. वाहून चालला, असा नदीच्या काठावर उभे राहून आरडाओरडा करण्यापेक्षा पाण्यात उडी मारून मुलाला वाचवणे त्यांना आवडते. अशा दुर्मिळ व्यक्तिमत्वांमध्ये बालकवी गणेश प्रल्हाद घुले यांचा समावेश करावा लागेल. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांसाठी जे काही केले. त्याचे मोजमाप करणे अवघड आहे. काय केले त्यांनीॽ तर त्यांनी तब्बल ७५ दिवस सातत्याने फेसबुक पेजवर साहित्य क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी बालकांना, रसिकांना मिळवून दिली. चाहत्यांशी मनसोक्त गप्पा मारण्याचा आनंद अनेक लेखक, कवी, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, साहित्यिकांना प्राप्त करून दिला. जणू काही एक स्वतंत्र, मुक्त शाळाच घुले यांनी त्यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या फेसबुक पेजवर भरवली होती. वक्त्यांसाठीचे विषय ‘मुलं आणि स्क्रीन’, ‘मुलांचे भावविश्व आणि सिनेमा’, ‘लहान मुलांची जडणघडण करताना’, ‘बालक-पालक, योगाभ्यास’ असे वैविध्यपूर्ण अन् उपयुक्त असतील, याची काळजी त्यांनी घेतली. मुलांचे व्यक्तिमत्व घडावे. त्यांना जगाची ओळख व्हावी. आणि मुलांचे जग मोठ्यांना समजावे, असा विषय निवडीमागील प्रमुख उद्देश होता. त्यासाठी घुलेंना अभ्युदय फाऊंडेशन, श्रीराम पोतदार, निरंजन भालेराव, संतोष लोमटे, मंगेश निरंतर, ईश्वर उमाळे, महेश अचिंतलवार यांची कल्पक मदत मिळाली. ऑनलाईन उपक्रमात अवघड असलेले सातत्य त्यांनी प्राप्त केले. 
इथपर्यंत तर ठीक आहे. पण रविवारी म्हणजे १९ जुलैला त्यापुढची मजल त्यांनी गाठली. राज्याच्या सोळा शहरांतील बालकवींचे पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन भरवले. फुलांनी बहरलेल्या झाडावर रंगीबेरंगी फुलपाखरे गोळा व्हावीत. मध चाखत चाखत त्यांनी साऱ्यांवरच गोडव्याचा शिडकावा करावा, असे दृश्य त्या ऑनलाईन संमेलनात दिसले. बुलडाण्यातून मैत्री लांजेवार, अवंती शिंगाडे, लातूरमधून ऋषिकेश गुजलवार, तृप्ती आंबुलगे, औरंगाबादेतून अन्वयी वैद्य, ऋचा सिनकर, सांगलीतून गौतम पाटील, सारिका पाटील, श्रावणी पाटील, तेजश्री पाटील, जळगावमधून समृद्धी चोखट, अमरावतीची उर्वी ख, जालन्याची सृष्टी लोमटे, उस्मानाबादची राधा जाधव, सोलापूरची सिद्धी कोकीळ, बीडची  ऋतुजा शिंदे यांनी बहारदार रचना सादर करत सव्वा तास धमाल उडवून दिली. लहान मुले काय विचार करतात. एखाद्या प्रश्नाकडे कशी पाहतात. त्यांचा पुढील काळातील प्रवास कसा असू शकतो, याचा अंदाज या संमेलनातून आला. त्यामुळेच या उपक्रमाचे मोजमाप लगेच करणे चुकीचे ठरेल. जालना जिल्ह्यातील पाडळी या खेडेगावात लहानपण गेलेल्या घुले यांना हे सारे करण्याची शक्ती त्यांच्या बालपणातून मिळाली. चिमुकली मुले हेच विश्व मानत ते त्यात रमले. आणि जो लहानांसोबत लहानांसारखा होतो. तो सर्वांना आपलासा वाटतो. कृतीतून जग घडवण्याची ताकद त्याच्यात असते. कवीसंमेलनातून ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 

No comments:

Post a Comment