Thursday 30 July 2020

डोंगरावर सापळा

त्या उजाड माळरानावरून जाणारा छोटा रस्ता. दिवसातून एखादा ट्रक, एखादी मोटार आणि पाच-दहा दुचाकी त्यावरून जात होत्या. पण हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट झाला आणि पाहता पाहता सगळे चित्रच बदलून गेले. भली मोठी यंत्रे आली. जेसीबीने खोदकाम होऊ लागले. शंभर कामगारांची छोटी वस्ती तयार झाली. संगारामाचे एक छोटेसे हॉटेल आले. धनिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोक्याच्या जागांवर ढाबे, मोठी हॉटेल बांधणे सुरू केले. त्यामुळे एकच गजबजाट झाला. मजुरांच्या त्या वस्तीतील काळीसावळी, उंचीपुरी, कोणाच्याही मदतीला धावून जाणारी आशा लक्षवेधी होती. ती दोन मुलांची आई आहे, हे तिला पाहून कोणालाही खरे वाटले नसते. अवखळ, मनमोकळ्या स्वभावाच्या आशाला चांगला जोडीदार मिळाला होता. कमालीचा शांत, सुस्वभावी सुधाकर ठेकेदार पुरुषोत्तम रावचा अत्यंत लाडका होता. कारण कामाशी काम असा त्याचा स्वभाव होता. कामगारांच्या चहाटळ गप्पांमध्ये त्याला अजिबात स्वारस्य नसायचे. संगारामच्या हॉटेलमध्ये काही जण दुपारच्या वेळी खुशाल दारू ढोसत. त्या दारुड्यांत सुधाकरचा भाऊ चंद्रकांतही होता. ते त्याला मुळीच पसंत नव्हते. आपल्याला ठेकेदाराकडून मान-सन्मान मिळतो, महिन्याच्या एक तारखेला पूर्ण मोबदला हातात पडतो, मग आपण दारू पिऊन काम करणे चांगले आहे का, असा त्याचा प्रश्न होता. अर्थातच चंद्रकांत आणि इतर कामगार त्याला उडवून लावत. तुला आयुष्यच कळालेले नाही, मनुष्य जन्म एकदाच मिळतो, त्याची मजा लुटली पाहिजे, ठेकेदाराकडं करोडो रुपये आहेत, असं ते सांगत. सुधाकरची पाठ वळली, की आशाबद्दलही उलटसुलट बोलत. ती अनेकांच्या चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय होती. ती खडी फोडताना, टोपली उचलताना, रस्त्याच्या आजुबाजूला खड्डे खोदताना तिच्या हालचालीवर बारीक नजर ठेवायचे. त्यांच्या विखारी नजरा तिच्या लक्षात येत, पण ती दुर्लक्ष करायची. काही जणांना मुद्दाम भैय्या, भाऊ, भाऊसाहेब, दादा अशा हाका मारायची. अपवाद
प्रीतमकुमार, बालाप्रताप, समशेरचा. या तिघांशी तिची चांगली मैत्री जुळली होती. तिघेही तिच्यापेक्षा तीन-पाच वर्षांनी लहान होते. लहान वयातच त्यांची शाळा सुटली होती. आता सरकारी योजनेत बाराखडी तरी लिहिता आली पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. इयत्ता सातवीपर्यंत शिकलेल्या आशाला हे कळताच तिनं तिघांची शाळा सुरू केली. सुधाकर घरी नसला तरी ते तिघे बिनधास्तपणे येत. हळूहळू तिचा जीव अभ्यासात गती असलेल्या आणि आक्रमक स्वभावाच्या समशेरमध्ये गुंतू लागला, पण त्याला तिच्यात तसं स्वारस्य नव्हतं. त्यापेक्षा आशाची मावसबहीण रूपा त्याला आवडत होती. पत्नी पद्माला काडीमोड देऊन रूपाला पळवून नेण्याची स्वप्नं तो बघायचा. इकडं सुधाकर कामात मग्न होता. आशा अवखळ, मनमोकळी, सर्वांशी गप्पा मारणारी आहे, पण ती कधीच धोका देणार नाही, असं तो वारंवार इशारे देणाऱ्या चंद्रकांतला सांगायचा. आणि एक दिवस दोन्ही मुलांना घरी सोडून आशा गायब झाली. सुधाकर हादरून गेला. प्रीतमकुमार, बालाप्रताप, समशेरही गडबडून गेले. मात्र, तीन वर्षांच्या पोलिस तपासात काहीच हाती लागलं नाही. इन्स्पेक्टर उदयनी जवळपास नाद सोडून दिला. तोपर्यंत रस्ता तयार झाला. मुला-बाळांना घेऊन सगळे कामगार दुसऱ्या कामावर रुजू झाले.. आणि एक दिवस खबऱ्यानं सांगितलं की, जवळच्या डोंगरावर एक सापळा पडला आहे. तिथून चक्रं फिरली. इन्स्पेक्टर उदय यांनी आशाचा खुनी शोधला. 

No comments:

Post a Comment