Thursday 9 July 2020

गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट

नदी, ओढ्यालगत एक छोटेसे गाव. आजूबाजूला शेती पसरलेली. 
गावात काही चौसोपी वाडे. कौलारुंनी शाकारलेली छोटेखानी घरे. 
त्यासमोर भलेमोठे अंगण. शेणाने सावरलेले. अंगणात झाडे. 
दिवसभर माळरानात चरलेल्या गाई-म्हशी गावात शिरतात. 
मग गडी मंडळी दूधाने भरलेल्या चरव्या माजघरात पोहोचवतात.
ताटात चुरलेली चुलीवरील गरमागरम भाकरी, दूधावर ताव मारुन 
सात-आठ लहान मुलं, मुली मस्ती करत अंगणात येतात.
हलकाहलका गार वारा फिरु लागलाय. पोरं थोडी मस्ती करतात. 
मग एकजण म्होरक्या होतो. सर्वांकडून अंगणभर अंथरुणे टाकून घेतो. 
आणि ती सारीजण गारवा अंगावर घेत लोळू लागतात. 
कोणाची तरी वाट पाहत असतात. त्यांचं लक्ष माजघराकडं. तेवढ्यात 
चाहूल लागते. सारे एकमेकांना इशारे करत खुरमांडी घालून, हाताचे कोपरे 
हनुवटीवर टेकवून बसतात. दिवसभर कष्ट करून, माजघरात राबून थकलेली,
तरीही नातवंडांच्या चिवचिवाटाने आनंदात भिजलेली आजी येते. 
डोईवर नऊवारी लुगड्याचा पदर, कपाळाला ठसठशीत कुंकू. हातभर बांगड्या.
कुरकुरणाऱ्या गुडघ्यांकडे दुर्लक्ष करत मुलांमध्ये जाऊन बसते. ती तिच्याभोवती 
जणूकाही घेराबंदी करतात. ‘गोष्ट, गोष्ट…’ असा धोशा लावतात.
मग ती एखाद्या जादूगारानं पोतडीतून अलगद मोरपीस काढावं, तशी गोष्ट 
काढू लागते. कधी गोष्ट असते राज्यकन्या - राजपुत्र - राक्षसाची. तर
 कधी छत्रपती शिवाजी महाराज, राम-कृष्णांची, भगवान गौतम बुद्धांची, 
भगवान महावीरांची, गुरु नानकांची किंवा मोहंमद पैगंबरांची. 
साऱ्या कथांचा समारोप आजी बोधवचनातून करते. म्हणजे खोटं बोलणं, 
चोरी करणं पाप आहे. गरीबांवर अन्याय, दगाबाजी, मोठ्यांना उलटून बोलणं 
मोठा गुन्हा आहे. जिद्द, कष्टाशिवाय यश मिळत नाही, असे अनेक 
आयुष्यभराचे संस्कार आजी गोष्टीमधूनच करते. तो मनात भिनवत
 मुलं पेंगतात. गाढ झोपी जातात. 
आता चाळीस-पन्नाशीत पोहोचलेल्या अनेकांनी आजीच्या गोष्टींचा 
आनंद घेतला असेल. पण विशी-पंचविशीत असणाऱ्यांना तो मिळालेला नाही. 
कारण गोष्ट सांगणारी आजी वीस वर्षांपूर्वीच धूसर होणे सुरू झाले. 
त्यामुळे त्यांना हा वारसा पुढील पिढीला देता येणार नाही. 
अर्थात असे, एवढे सगळे असले तरी गोष्ट नावाच्या गोष्टीची गोष्ट 
अजिबात संपलेली नाही. एक गोष्ट सांगू का, असं म्हणतच कोट्यवधी लोक
बोलण्याची सुरुवात करतात. माणूस हा गोष्टीवेल्हाळ प्राणी आहे. तो कशावरही 
गोष्टी रचतो आणि कोणाला तरी सांगत राहतो. म्हणून नद्या, ओढे आटले. 
गावे, वाडे ओसाड झाले. अंगणातील झाडे करपली. तरी गोष्टीचे महत्व आहेच. 
हे लक्षात घेऊन काही कल्पक तरुणांनी कोरोना संकटात, काळानुरूप तिचे 
रुप बदलले. आणि गोष्ट सांगणे हा प्रकार एकदम जागतिक पातळीवर नेला.
गेल्या महिन्यात मुंबईच्या आगाझ प्रॉडक्शन्स या करमणूक कंपनीने 
सोशल मिडिआवर कथा लेखनाची स्पर्धा जाहीर केली. देशाच्या 
कानाकोपऱ्यातून ५०० तरुण लेखकांनी चकित करुन टाकणाऱ्या विषयांवर 
कथा पाठवल्या. आयोजकांनी त्यातील दहा सर्वोत्तम निवडल्या. आणि
त्या सांगण्यासाठी नव्या रुपातील आजी-आजोबा आणले. या कथा 
त्यांनी रंगमंच, सिनेमासृष्टी गाजवत असलेल्या, आवाजाची नैसर्गिक
देणगी लाभलेल्या आणि शब्दांचा अर्थ प्रकट करण्याची शक्ती प्राप्त 
कलावंतांकडून वाचून घेतल्या. अमृता सुभाष, सतीश आळेकर, उमेश कुलकर्णी, 
मकरंद देशपांडे, प्रसाद ओक, ऋता दुर्गुले, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी, 
राजेश मापुसकर या दिग्गजांनी दहाही कथा श्रवणीय केल्या. त्या ऑडिओ-व्हिज्युअल
रुपात उपलब्ध झाल्या आहेत. तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहेत. 
कंपनीने खर्चाचा ताळमेळ आणि काहीतरी थ्रील म्हणून या कथांमध्ये व्होटिंगची 
एक स्पर्धाही सुरू केली आहे. 
आजी, वाडा, अंगण नसले तरी प्रत्येक कथेत ‘संस्कार’ नावाचा आत्मा आहेच.
या कथांचे लेखक नेमके कोण, याचा शोध घेण्यासाठी तुम्हालाही सोशल मिडिआ 
धुंडाळावा लागेल. गोष्टी ऐकाव्या लागतील. समोरचा सांगतोय ते मनापासून ऐकणं,
समजून घेणं हे देखील तुम्ही समंजस, सुसंस्कृत माणूस असल्याचं एक लक्षण आहे. नाही का?

No comments:

Post a Comment