Thursday 30 July 2020

ही वेळ का आली?

एका शेतकऱ्याने शेतात ऊस लावला. सुदैवाने त्याच्या विहिरीला तुडुंब पाणी होते. तो रोज पाटातून उसाला पाणी देई. महिना उलटून गेला तरी पीक वाढलेले दिसेना. त्यामुळं तो चिंतातुर झाला. नेमकं काय झालं म्हणून त्यानं तपासलं तर त्याच्या लक्षात आलं की, पाटामध्येच खूप सारी बिळं झालीत. सगळं पाणी त्या बिळातच चाललं होतं. हे पाहून शेतकरी कळवळला. आपल्याला उसाचं मन कळायला खूपच उशीर झाला असं त्याला वाटलं. असंच काहीसं मराठी नाट्यसृष्टी आणि त्यात काम करणाऱ्या बड्या दिग्गजांचे झालं आहे की काय अशी शंका येत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील, छोट्या शहरातील रसिकांना नेमकं काय हवं आहे याबद्दल दिग्गजांना काही देणे-घेणे आहे की नाही? मुंबई, पुण्यामध्ये जे वाटते तेच खरे. बाकीच्या लोकांना विचारण्याची गरज नाही. माध्यमांमध्ये प्रपोगंडा करून आपण गल्ला भरू शकतो असा त्यांचा समज झाला आहे का, असा प्रश्न पडतो. विशेषत: कोरोना संकटाच्या काळात ते प्रकर्षानं जाणवलं.
हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी सुरू केलेले कलचाचणी अभियान. यात ते रसिकांशी एका फॉर्मद्वारे संवाद साधत आहेत. कोरोनानंतर रसिकांना कोणत्या प्रकारचे नाटक पाहण्यास आवडेल. म्हणजे विनोदी की सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक? शिवाय लोक नाट्यगृहात येण्यास उत्सुक आहेत का? आले तर दोनअंकी नाटक पाहू इच्छितात की दीर्घांक? अशा अनेक अंगांनी दामले चाचपणी करत आहेत. त्याचा पहिला टप्पा अर्थातच त्यांनी मुंबई, पुणे, नाशिक असा ठेवला. नंतर ते दुसऱ्या टप्प्यात कोकण, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडं वळाले आहेत. अखेरचा टप्पा मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा आहे. त्यातून रसिकांचे खरे मत कळावे अशी अपेक्षा आहे. एकदा ते कळाले की मग ते त्यांच्या पसंतीच्या म्हणजे मुंबई-पुण्यातील काही लेखकांना सांगणार. लेखक त्यानुसार लिखाण करणार. मग प्रशांत दामले आणि त्यांचे सहकारी ते नाटक बसवणार आणि आधी अर्थातच मुंबई-पुणे येथे त्याचे प्रयोग होतील. तेथील लोकांना ते आवडले तर राज्यात इतर ठिकाणी सादरीकरण होणार आहे. अशी एकुणात दामले यांची योजना आहे. ती त्यांनी चौदा वर्षांपूर्वी म्हणजे महामंदीची चाहूल लागली तेव्हा राबवली होती. रसिकांना त्या वेळी आवडनिवड कळवली होती. त्यानुसार नाटकांची यशस्वी निर्मिती झाली. आताही तसेच व्हावे. फक्त चौदा वर्षांमध्ये बरेच पाणी वाहून गेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाने थेट रसिक संख्येवरच आघात केला आहे. डिसेंबरमध्ये नाटकाचा प्रयोग होईल. तेव्हा पाचशे जणांच्या नाट्यगृहात अडीचशे लोक असतील अशी शक्यता आहे. म्हणजे एकुणात नाट्यसृष्टीचे अर्थकारण अडचणीत असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी एकट्या दामलेंनी धडपड करण्यापेक्षा सर्वांचा हातभार लागायला हवा होता. तसे काही होत नसावे. एरवी नाटकवाली मंडळी नेहमी नवनवीन आयडिया शोधून काढतात. विषयांना तोंड फोडतात. काहीतरी वक्तव्ये करून जगाचे लक्ष वेधून घेतात. मग कोरोनानंतर नाटकाचे जग या विषयावर एकटे दामले का? असा प्रश्न पडतो. रसिकांच्या मनाचा वेध घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रयोग करणे, त्यांची मते जाणून घेणे हा प्रयोग चांगला आहे. पण, असे करण्याची वेळ का आली? मुंबई-पुण्याबाहेर, छोट्या शहरात, ग्रामीण भागातही आपले रसिक आहेत, त्यांच्याशी कायम संवाद हवाच याची जाणीव दिग्गज लेखक, दिग्दर्शक, कलावंतांनी ठेवली नाही. म्हणून हा प्रयोग करावा लागत आहे असं म्हटलं जातं. आता कलचाचणी अभियानाने पाटाला पडलेली बिळं बुजली आणि रसिक-नाट्यकर्मींचे नाते नव्या वळणावर गेले तर मराठी रंगभूमीचा अधिक फायदा होईल.

No comments:

Post a Comment