Thursday 9 July 2020

... की त्यांनी स्वत:ला संपवले?

सहाव्या मजल्यावरून त्यांना खाली कोसळताना अनेकांनी पाहिले. काहीजणांनी प्रसंगावधान राखत तत्काळ अँब्युलन्स बोलावली. लोळागोळा झालेला तो देह रुग्णालयात पाठवताना त्यात प्राण शिल्लक नाही, असे त्यांच्या लक्षात आले होते. तरीही त्यांना आशा होती. रुग्णालयात पोहोचल्यावर ती मावळली. इथे येण्यापूर्वीच सर्व संपले होते, असे म्हणत रुग्णालयाने शहरातील प्रथितयश डॉक्टर अस्थाना यांचा मृतदेह त्यांच्या शेजाऱ्यांच्या हवाली केला. कारण साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या डॉ. अस्थाना यांच्या दोन्ही मुली सुप्रिया आणि रश्मी परगावी फिरण्यासाठी गेल्या होत्या. वडिल गेल्याचे कळताच त्या पती आणि मुलांसोबत पहाटे शहरात परतल्या. घटना पाहणाऱ्या सर्वांनी एकसूरात सांगितले की, तुमचे वडिल खाली कोसळताना आम्ही पाहिले. त्यावेळी टेरेसवर कोणीही दिसले नाही. पण मुली ठाम होत्या. आमचे वडिल अतिशय खंबीर मनाचे होते. वीस वर्षांपूर्वी आमची आई अपघातात मरण पावली. तेव्हापासून त्यांनीच आमचा सांभाळ केला. ते स्वत:चे जीवन संपवूच शकत नाही. हा घातपाताचा प्रकार आहे, असे त्यांनी ठामपणे बजावले आणि पोलिसांत तक्रार केली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात ‘प्रख्यात डॉक्टर अस्थाना यांची सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, मुलींना घातपाताचा संशय’ अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. एकच खळबळ उडालीइन्सपेक्टर मकासरे यांनी तपास सुरू केला. डॉ. अस्थाना मूळचे पंजाबातील जालंदरचे रहिवासी. प्रेमविवाहानंतर घरात वाद सुरू झाल्याने तरुण वयातच जालंदरमधून या शहरात आले होते. त्यांच्या हाताला उत्तम गुण होता. शहरात डॉक्टरांची संख्याही फारशी नव्हती. त्यामुळे त्यांचा पटकन जम बसला. अत्यल्प दरात रुग्णसेवेचे व्रत त्यांनी स्वीकारले होते. त्यामुळे नावलौकिक पसरत गेला. भरभराट झाली. आणि तो दुर्दैवी दिवस उजाडला. पत्नीसोबत शहराबाहेर फिरण्यासाठी गेले असताना एक ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. त्यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य काही काळ खच्ची झाले होते. पण मुलींची जबाबदारी असल्याने ते पुन्हा ताकदीने उभे ठाकले. अनेक नातेवाईकांनी दुसऱ्या विवाहासाठी आग्रह धरला. पण त्यांनी तो निग्रहाने परतवून लावला. एक छोटेखानी हॉस्पिटल उभे केले. शहराबाहेरच्या तलावाजवळ एक कोटी रुपये खर्चून टुमदार बंगलाही खरेदी केला. दोन्ही मुलींनी डॉक्टरच व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण रश्मी प्राध्यापक तर सुप्रियाला बँकेत लेखापाल झाली. दोघींचे विवाह झाल्यावर अस्थाना वर्षभर एकटेच बंगल्यात राहिले. त्यांच्या एकटेपणाची मुलींना काळजी होती. म्हणून त्यांनी त्यांच्या मागे लागून त्यांना शहरातील त्या भव्य सहा मजली अपार्टमेंटमध्ये एक भलामोठा फ्लॅट खरेदी करायला लावला होता. आम्ही इथून जवळच राहतो. त्यामुळे येता-जाता तुम्हाला भेटू शकतो, असे त्यांचे म्हणणे होते. पण प्रत्यक्षात त्या संसार आणि नोकरीच्या व्यापात इतक्या अडकून पडल्या होत्या की महिन्यातून एकदा कधीतरी वडिलांकडे फिरकत. वाढत्या वयामुळे डॉ. अस्थानांमध्ये एकाकीपणाची भावना वाढू लागली होती. इन्सपेक्टर मकासरेंनी अधिक माहिती घेतली. फ्लॅटची तपासणी केली. तेव्हा कुठेही चिठ्ठी ठेवलेली नव्हती. मात्र, उंची मद्याच्या पाच-सहा बाटल्या आढळल्या. अस्थाना रात्री हमखास मद्यपान करत. अपार्टमेंट सोसायटीचे अध्यक्ष माळेगावकर, सचिव हंबर्डे यांनी सांगितले की, डॉक्टरांकडे त्यांचे सहकारी डॉ. मलिक, डॉ. लांबा वगळता कोणाची ये-जा नव्हती. तर सोसायटीचे सुरक्षा रक्षक रामभाऊंनी सांगितले की, महिनाभरापूर्वी या दोन्ही डॉक्टरांची अस्थानांनी पार्किंगमध्ये हॉस्पिटल नावावर करण्यावरून बाचाबाची झाली होती. चौकशीत असेही समोर आले की, सुप्रियाचा नवरा कंवलजीत अलिकडे व्यवसायात कंगाल झाला होता. तलावाजवळचा एक कोटींचा बंगला विकून सासऱ्याने पैसे द्यावेत, असा त्याचा प्रयत्न होता. त्यासाठी तो अधूनमधून येऊन अस्थानांना धमकावत होता. हॉस्पिटलमधील महिला सहकारी डॉ. अलकांसोबत तुझ्या वडिलांचे नाते तयार होत आहे, असे तो सुप्रियाला सांगत होता. डॉ. अलकांचे पती प्रशांतना त्याने डॉ. अलका आणि डॉ. अस्थानांची एक व्हिडिओ क्लीपही पाठवली होती. त्यावरून अलका अस्वस्थ होत्या. त्यांची अस्थानांशी प्रचंड वादावादी झाली होती. अस्थानांच्या कथित आत्महत्येदिवशी डॉ. मलिक, डॉ. लांबा, डॉ. अलका दुपारच्या सत्रात फ्लॅटवर येऊन गेले होते. इन्सपेक्टर मकासरेंनी पोस्टमार्टेम रिपोर्ट तपासला. त्यात मद्याचे प्रमाण अधिक असल्याचे म्हटले होते. अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही नव्हते. त्यामुळे आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही तपासले आणि अस्थानांना सहाव्या मजल्यावरून कोणी ढकलले, याचा शोध काढला.


No comments:

Post a Comment