Wednesday 15 July 2020

हात सापडला, पण मारेकरी?

ज्युलिया रेडिडेन्सी म्हणजे शहरातील उच्च मध्यमवर्गीयांची वसाहत. सुरक्षा रक्षकांच्या तपासणीशिवाय प्रवेश नाही. दोन कोटी किंमत असलेल्या टुमदार बंगल्यांची रांग. प्रत्येक बंगल्यासमोर छोटीशी बाग. किमान तीन कारसाठीचे पार्किंग. वरच्या मजल्यावर दहा जणांची पार्टी करता येईल एवढा टेरेस. एकेक खोली तीनशे चौरस फुटांची होती. उंची संगमरवर. प्रख्यात बिल्डर जगलानी यांचे आवडते आर्किटेक्ट नाडकर्णी यांनी या सोसायटीचा आराखडा तयार केला होता. तरुण नवरा-बायको, त्यांची दोन मुले आणि आणखी एखादा नोकर राहू शकेल, अशी त्यांनी प्रत्येक बंगल्याची रचना केली होती. त्यामुळे मेट्रो मशिनरीज कंपनीचे मालक रत्नदीप यांनी पाच वर्षांपूर्वी पाहता क्षणी बंगला खरेदी केला. तेव्हा तीन वर्षाची मुलगी क्षमा त्यांच्यासोबत होती. कारण त्यांची पत्नी रिया मैत्रिणीच्या विवाहासाठी परदेश दौऱ्यावर गेली होती. परत आल्यावर बंगला पाहून ती हरखून गेली होती. वर्षभरापासून तिने आलिशान बंगल्यासाठी रत्नदीप यांच्यामागे लकडा लावला होता. नवऱ्याने हट्ट पूर्ण केल्यामुळे ती मनोमन खुश झाली. पण तिने तसे मुळीच दाखवले नाही. उलट सोसायटीत शेवटच्या टोकाचाच बंगला का घेतला. इथे पलिकडे नाला आहे. त्याच्या दुर्गंधीचे काय? नाल्यावरून उडी मारून कोणी बंगल्यात शिरले तर काय करणार? असे प्रश्न तिने विचारले. त्यामुळे रत्नदीप थोडासा खट्टू झाला. पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. कारण तिचा स्वभाव आता बदलणार नाही, हे त्याला माहिती होते. अत्यंत आकर्षक, सुंदर असलेली रिया लग्नापूर्वी मॉडेलिंग करत होती. आणि रत्नदीप छोटा उद्योजक होता. एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली. तो पाहता क्षणी तिच्यावर लट्टू झाला. तिच्या वडिलांची मुळीच इच्छा नव्हती. पण आईने आग्रह धरला. मुलगा सध्या उद्योगात पाय जमवत आहे. मेहनती, कल्पक आहे. लवकरच त्याची  भरभराट होईल, असे दिसते. तुम्ही माझ्याशी विवाह केला. तेव्हा तुमच्याकडे तरी काय होते, असा सवाल तिने केला. आणि रिया-रत्नदीप विवाह बंधनात बांधले गेले. अधूनमधून किरकोळ कुरबुरी वगळता दोघांचा संसार तसा ठीकठाक सुरू होता. म्हणजे बायकोचे उधळपट्टी करणे त्याला मुळीच पसंत नव्हते. कष्टाचा पैसा आहे. तो जपूनच वापरला पाहिजे, असं तो वारंवार तिला बजावत होता. तर तिचं म्हणणं होतं की, आयुष्य एकदाच मिळालं आहे. तारुण्य पुन्हा परतून येणार नाही. त्यामुळे जे काही करायचं ते आताच केलं पाहिजे. पैसा मनसोक्त खर्च करण्यासाठीच असतो. रत्नदीप फारच तगादा लावू लागला. म्हणून मग मुलीला सांभाळण्यासाठी एक आया ठेवून तिने चक्कपैकी एका फॅशन मार्केटिंग फर्ममध्ये नोकरी सुरू केली. तिथे तिची फर्मचा मालक निमिषसोबत गट्टी जमली होती. आणि वर्षभरात फर्मची अर्धी पार्टनरही झाली. खर्चासाठी पैसे मिळवण्यासाठी तिने सुरू केलेल्या नोकरीचा व्याप वाढू लागला. तिच मॉडेलिंग शो आयोजित करू लागली. इकडे रत्नदीपचा उद्योगही झपाट्याने प्रगती करत होता. चार मोठ्या शहरात प्रकल्प सुरू झाले होते. आणखी मोठी झेप घेण्याची त्याची तयारी सुरू होती. त्याच कामानिमित्त बाहेरगावी गेला. परतला तर रिया, क्षमा दोघीही गायब. आयाला विचारले तर ती म्हणाला, मालकीणबाईने मला दोन दिवसांच्या सुटीवर पाठवले होते. रत्नदीपने रियाच्या आई-वडिल, मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. पण पत्ता लागेना. मग त्याने पोलिसांत तक्रार दिली. मोठ्या घरचे प्रकरण असल्याने थेट एसीपी घाटगे यांनीच सूत्रे हाती घेतली. रिया, क्षमाच्या शोधासाठी जोरदार मोहीम चालवली. आठ दिवसानंतर जनावरे चारण्यासाठी टेकडीवर गेलेल्याने खबर दिली की नदीच्या काठावर एक तुटलेला मानवी हात पडला आहे. पोलिस घटनास्थळी धावले. तेव्हा दाट झाडीत रिया, चिमुकल्या क्षमाचे मृतदेह सापडले. घाटगेंनी सखोल चौकशी सुरू केली. तेव्हा निमिषच्या जबाबातून असे समोर आले की, कॉलेजच्या काळात रियाचे विश्वनाथ नामक तरुणाशी प्रेमप्रकरण होते. महिनाभरापूर्वी ती त्याला एका हॉटेलमध्ये भेटली. तर निमिष आणि मालकिणीमध्ये काहीतरी आरडाओरड झाली. भाऊबीजेच्या दिवशी मालकिणबाईँचे वडिल आणि दोन भाऊ मालकिणबाईला धमकावून गेले, असं आया म्हणाली. बिल्डर जगलानीचा मुलगा रौनकशीही रियाची जास्त मैत्री होती, असं सुरक्षा रक्षकांनी सांगितलं. सगळ्यांच्या जाब-जबाबातून धागे पकडत घाटगेंनी खुनी शोधला.   

No comments:

Post a Comment