Tuesday 7 July 2015

समथिंग इज व्हेरी डिफ्रंट

एखाद्या वैभवशाली कुटुंबातील मुले पैसे कमावण्यासाठी परदेशी जाऊ लागतात. गावातील कुटुंबाचा वाडा ओस पडू लागतो. शेती-भातीकडे कुणी पाहण्यास तयार होत नाही. सारं गाव हताश होऊ लागतं. नव्या पिढीतील मुलं असंच वागणार. गावाच्या वैभवाची वैरी होणार. असं वाटत असतानाच काहीतरी चमत्कार होतो.  परदेशात गेलेली, जाण्यास निघालेली मुलं गावाच्या वेशीजवळच थबकतात. कुठल्यातरी अनामिक ओढीनं घराकडे परततात. नको परदेशाची वाट. त्यापेक्षा आपल्या गावातील मातीचा गंधच लाखमोलाचा असं म्हणत नवं आयुष्य सुरू करतात. पाहता पाहता गावालाच संजीवनी देतात. असं काहीसं औरंगाबादच्या नाट्यक्षेत्रात घडू लागलंय. त्याचं प्रमाण अत्यल्प असलं तरी ते अमूल्य आहे. ते अमूल्य केलंय अस्सल लोककलावंत प्रा. राजू सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची. दीड महिन्यापूर्वी त्यांनी सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाने  प्रायोगिक रंगभूमीचा एका नवा ट्रेंड तयार झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे मराठी नाटकासाठी काही रसिक तयार करण्याचं कामही यातून होणार आहे.

आता सध्या रंगभूमी, चित्रपट विशेषत: मालिकांमध्ये एक नजर टाकली तर तिथं औरंगाबाद, मराठवाड्यातील कलावंत तुफान नाव कमावत असल्याचे दिसतं. त्याचा प्रत्येक नाट्य रसिकाला आनंद होतोच. मात्र, औरंगाबादमधल्या नाट्य चळवळीचं काय. इथल्या रसिकांना प्रायोगिक, नव्या आशयाच्या संहिता कसदार रुपात कधी पाहण्यास मिळणार असंही वाटत होतं. त्याचं उत्तर मिळण्याची सोय प्रा. सोनवणेंनी केलीच आहे. ती देखील आगळ्यावेगळ्या रुपात. अगदी तुमच्या घरात बसून तुम्हाला नाटक पाहण्याचा आनंद ही मंडळी देतात. ‘समथिंग इज मिसिंग’ हे ५० मिनिटांचे नाटक कोणत्याही नेपथ्याशिवाय घरातील दिवाणखान्यात सादर होते. त्याचे मूल्य फक्त प्रेक्षकांचा प्रतिसाद एवढेच असते. एकूणात ‘समथिंग इज मिसिंग’चा प्रकारच ‘समथिंग इज व्हेरी डिफ्रंट’ असा आहे. आधी औरंगाबादच्या नाट्य चळवळीत लक्षणीय कामगिरी केल्यावर सोनवणेंनी १९९५ मध्ये मुंबई गाठली. मात्र, त्यांच्यातील लोककलावंताला मायानगरीची माया मानवली नाही. त्यामुळे औरंगाबादला परतल्यावर त्यांनी एमजीएममध्ये दीर्घकाळ नाट्यशास्त्राचे अध्यापन केले. नवे कलावंत तयार केले. नाट्य स्पर्धा गाजवल्या. बक्षिसे पटकावली. हे सारे करत असताना इथं नाटकाचे रसिक तुलनेने कमी होत चालले आहेत. प्रायोगिक नाटकांची चळवळ मर्यादित वर्तुळात फिरत असल्याचं त्यांना प्रकर्षानं जाणवू लागलं. हे वर्तुळ बदललं पाहिजे किमान विस्तारलं पाहिजे या भावनेतून त्यांनी घरोघरी जाऊन नाट्य प्रयोगाच्या सादरीकरणाची कल्पना सहकाऱ्यांपुढे मांडली.  नव्या वाटांवर चालण्याची ओढ असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कल्पना एका क्षणात मान्य केली. आजमितीला समथिंगचे १६ प्रयोग झाले आहेत. त्यातील संहिता मूल्य, अभिनयाची क्षमता, संवादशैली, समकालीन मूल्य आदी बाबींवर वेगळ्या संदर्भात चर्चा होऊ शकते. मात्र, या रंगकर्मींचे हे धाडस दाद देण्यासारखेच आहे. मराठी नाटकावर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वांनीच हा प्रयोग पाहून धाडसाला यशस्वी करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. १९८० च्या दशकात ‌वऱ्हाडकार लक्ष्मण देशपांडेंनी वऱ्हाड निघालंय लंडनला या एकपात्री नाटकाचे प्रयोग सुरू केले. प्रारंभीच्या काळात प्रेक्षक कुठून मिळवायचे असा प्रश्न वऱ्हाडकारांपुढेही होता. तो त्यांनी त्यांच्या शैलीत सोडवला. घराच्या गच्चीवर, अंगणात अगदी एक खोली असलेल्या घरात सादरीकरण त्यांनी धमाल उडवून दिली. इतिहास रचला. प्रा. यशवंत देशमुख, प्रा. डॉ. दिलीप घारे यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलेल्या गाजराची पुंगी या द्विपात्री नाटकाची वाटचालही अशीच झाली. प्रा. सोनवणे आणि त्यांच्यासोबतच्या कलावंतांनी तोच कित्ता गिरवला. अनेक पथनाट्यांमध्ये काम केल्यामुळे रंगमंचाशिवाय अभिनय करण्याचा त्यांचा पाया पक्का झाला होता. म्हणून घरात प्रयोग करताना कुठलीच अडचण आली नाही आणि एक नवा अध्याय औरंगाबादच्या नाट्य चळवळीत सुरू झाला आहे. महत्वाचे म्हणजे केवळ नाटकाचा प्रयोग करून स्वत:ची हौस भागवून घेणे किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हा या मंडळींचा उद्देश नाही. तर मराठी नाटकांपासून दुरावलेला रसिक नाट्यगृहाकडे खेचला जावा. त्याला मराठी नाटकांची परंपरा, त्यातील सामाजिक मूल्य कळावं असा मूळ हेतू आहे. चार दोन नाट्य स्पर्धांमध्ये झळकताच मुंबई गाठून मालिकांमध्ये काम करणाऱ्या तरुण कलावंतांना समथिंगने दाखवलेली नवी दिशा महत्वाची वाटते. त्यावर सोनवणे व त्यांचे सहकारी चालतीलच. पण त्यांना चालण्याचे बळ देण्याची जबाबदारी प्रायोगिक नाट्य प्रयोगांच्या स्वागताची भाषा बोलणारे औरंगाबादचे रसिक स्वीकारतील का? त्यांनी स्वीकारले तर इथलं सांस्कृतिक वैभव घरच्या अंगणात नक्कीच झळाळून निघेल.





No comments:

Post a Comment