Sunday 26 July 2015

बाहुबली : अफाट, अचाट अन्‌ अद्‌भुत


आपल्यापैकी अनेकजण दाक्षिणात्यांना कितीही नावे ठेवत असले. लुंगीवाले, मद्रासी, कारकुंडे असे म्हणत त्यांना नावे ठेवण्याचा अभिमान बाळगत असले तरी ती मंडळी आपल्यापेक्षा अफाट, अचाट विचार करतात. तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाची बाजी लावतात, हे तुम्ही आम्ही मान्य केले नाही तरी सत्य आहे. कितीही झाकून ठेवले तरी ते जगाला कळतेच. या अशा अफाट, अचाटपणामुळे त्यांच्यात अतिशयोक्तीची परंपरा निर्माण झाली असे म्हटले तरी अतिशयोक्ती किती अद्‌भुत, कलात्मकतेने, ताकदीने करता येऊ शकते, हे देखील त्यांच्याकडे पाहूनच शिकावे लागेल. अनेक प्रांतात दाक्षिणात्य मंडळी आपल्यापुढे गेलेली आहेत. त्यातील एक म्हणजे सिनेमा. मराठी माणसाचे बोट धरून त्यांनी सिनेमाची निर्मिती सुरू केली. आणि पाहता पाहता ते आशय, विषय, कथानक, मांडणी, चित्रीकरण, पटकथा, भडकपणा, मसाला या साऱ्यामध्ये आपल्या पुढे निघून गेले आहेत. केवळ मराठीच नव्हे तर सर्व भाषिकांवर त्यांची मोहिनी चालत आहे.

सध्या रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालत असलेला बाहुबली चित्रपट पाहून दक्षिणेतील मंडळी किती टोकाची भव्य दिव्य निर्मिती करू शकतात. साध्या कहाणीला भावना, तत्वांची जोड देत, एक ठोस संदेश सांगत खिळवून ठेवू शकतात. तंत्रज्ञानाचा वापर करून तोंडात बोटेच नव्हे तर पूर्ण हात घालायला लावू शकतात, याची प्रचिती येते.

हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याचा बजरंगी भाईजानही बाहुबलीसारखी तुफान गर्दी खेचतोय. पण थिएटरमधून बाहेर पडणारी रसिक मंडळी ज्या कॉमेंट नोंदवत आहेत. शेवट अर्धवट ठेवलेल्या बाहुबलीचा दुसरा भाग 2016मध्ये पाहण्याची आतापासून तयार करत आहेत. त्यातील प्रत्येक प्रसंग, व्यक्तिरेखा, पात्रे, तंत्रज्ञान, सेटस्‌बद्दल चर्चा करत आहेत. ते पाहता अखेरच्या टप्प्यात बाहुबली बजरंगीवर वरचढ चढणार हे स्पष्ट दिसते. आजकाल एखादा सिनेमा दुसऱ्यांदा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचे दिवस दुर्मिळच. बाहुबलीने ते परत आणले आहेत. कुटुंबेच्या कुटुंबे तिकीटासाठी रांगा लावत असल्याचे पाहण्यास मिळाले.

तसं पाहिलं तर बाहुबलीची कहाणी घिसीपिटी. शेकडो हिंदी मसाला सिनेमात येऊन गेलेली. म्हणजे एक चांगला माणूस असतो. त्याचे एक छान कुटुंब असते. एक दिवस एका दुष्ट माणसाची त्याच्यावर छाया पडते. तो कुटिल कारस्थान करून चांगल्या माणसाचा संसार उध्व्सत करतो. पण देवाची कृपा म्हणून त्या चांगल्या माणसाचा छोटा मुलगा वाचतो. पुढे चालून हा छोटा मुलगा मोठा होऊन दुष्ट माणसाचा खात्मा करतो. बाहुबलीत हेच कथानक मांडण्यासाठी एक दीड हजार वर्षापूर्वीचा काळ निवडला आहे. एक संपन्न राज्य. त्याचा एक प्रचंड सामर्थ्यशाली राजा. तेवढेच सामर्थ्य अन्‌ कुटिल बुद्धीचा भाऊ. डोळे दिपवून टाकणारे महाकाय राजवाडे. तुफानी लढाई. नजरेला खिळवून ठेवणारेच नव्हे तर भुरळ पाडणारे निसर्ग सौंदर्य. एखाद्या व्यक्तीरेखेप्रमाणे जागा मिळवणारा धबधबा. दीड हजार वर्षापूर्वीचा काळ जिवंत करणारी रंगभूषा, वेशभूषा. प्रकाशाचे त्रिमितीकरण अशा एकना अनेक बाबींवर तुफान मेहनत झाली आहे. त्यामुळे एका गाण्याचा अपवाद वगळता बाहुबली त्यातील धबधब्यासारखा रसिकांच्या अंगावर तुफान वेगात कोसळत राहतो. हालचाल करण्यास जागाच ठेवत नाही. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाचा शेवट पूर्ण नाही. तो पाहण्यासाठी बाहुबली पार्ट 2 ची वाट 2016 पर्यंत पाहा, असे सांगण्याचा जुगार निर्माता, दिग्दर्शकाने खेळला आहे. खरेतर शेवट मनासारखा नसेल किंवा अर्धवट ठेवला असेल तर रसिक नाराज होतात. पण बाहुबलीत पुढील भागामध्ये नेमके काय असेल, अशीच चर्चा थिएटरबाहेर होते. तेव्हा जुगार यशस्वी झाल्याचे लक्षात येते.

छायाचित्रण, तंत्रज्ञान, निसर्ग आणि भव्य सेटस्‌ याच बाहुबलीच्या शक्तीस्थानी आहेत. दिग्दर्शक राजामौलीचे प्रभुत्व प्रत्येक फ्रेममध्ये दिसते. त्यांनी घेतलेली मेहनत दर क्षणाला जाणवते. नजीर, रमय्या, राणा दग्गूबाती, तमन्ना आणि अनुष्का शेट्टीने भूमिकेत जीव ओतला आहे. अनुष्का तर दक्षिणेतील ऐश्वर्या रॉय मानली जाते. तरीही तिने जख्ख म्हातारीचे काम स्वीकारले. बहुधा पुढल्या भागात ती तिच्या मूळ रुपात, वयात दिसणार आहे. बाहुबलीच्या मुख्य भूमिकेत प्रभास खूपच शोभून दिसला आहे. जणूकाही तोच दीड हजार वर्षापूर्वीचा खरा बाहुबली असावा असे वाटत राहते. हे त्याच्या व्यक्तिमत्वाला मिळालेली पावतीच आहे. बाहुबलीला त्याचा सर्वात विश्वासू सरदार कटप्पाच मारतो. त्यामागे नेमके कोण असते हे पुढल्या भागातच कळणार आहे. हा भाग प्रदर्शित होऊपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अशी वाट रसिकांना पाहण्याचे भाग्य एक दिवस मराठी चित्रपटालाही लाभो. त्या दिवशी खरेच मराठी रसिकाच्या बाहुत अभिमानाचे बळ येईल.


एक असाही संदेश : राजामौलीचा बाहुबली केवळ मनोरंजन करत नाही तर राजसत्ता कशी असावी, याचाही संदेश देतो. त्यात रामय्याच्या तोंडी एक वाक्य आहे.  ती म्हणते – केवळ शत्रूपासून गोरगरिब प्रजेचे रक्षण करणे हेच राजाचे कर्तव्य नाही. तर शत्रूशी लढताना गरिबांचे प्राण जाणार नाही, याचीही काळजी घेतो तोच खरा राजा.



चांगुलपणाची ताकद : बऱ्याच वेळा समान ताकदीचे, एकसारखी क्षमता असलेले दोन लोक प्रगतीच्या वाटेवर दीर्घ काळ सोबत चालतात. एक दिवस अचानक त्यातील एकजण पुढे निघून जातो. लोकप्रिय होतो. लोकांच्या हृदयावर राज्य करू लागतो. असे का होते...कारण केवळ ताकद, शक्ती, बलशाली असून जनतेच्या मनावर ताबा मिळवता येत नाही. त्यासाठी चांगुलपणा अत्यावश्यक असतो. त्यापुढे सगळी शक्ती, बळ फिकी पडतेच. सुरुवातीच्या काळात बळ, शक्ती, डावपेच पुढे जाताना दिसले तरी अखेरच्या टप्पयात चांगुलपणाच त्यावर मात करत लोकांची मने कायमसाठी जिंकतो. म्हणूनच तर चांगुलपणाचे बीज फार कमी लोकांना सापडते. बोटावर मोजण्या इतक्यांना ते फुलवता येते आणि एखाद्यालाच ते जगवता, वाढवता, पेरता येते. असा एखादाच मग बाहुबली होतो. 

No comments:

Post a Comment