Tuesday 7 July 2015

लक्ष्मणांच्या रेषा

पूर्वी असे म्हणायचे की, माणूस आणि पशु-पक्षांमध्ये दोन महत्वाचे फरक आहेत. एक म्हणजे पशु-पक्ष्यांना बोलता येत नाही. दुसरे म्हणजे त्यांना हसता येत नाही. अलिकडील काळातील संशोधन असे सांगते की, पशु-पक्ष्यांना माणसासारखे बोलता येत नसले  तरी त्यांची विशिष्ट अशी एक भाषा आहे. ते एकमेकांशी त्या भाषेत बोलतात. मात्र, त्यांना हसता येते की नाही, हे अजूनही ठामपणे सिद्ध झालेले नाही. म्हणजे एक प्रकारे किमान हसण्याच्या बाबतीत माणूस पशुंपेक्षा निश्चितच वेगळा आहे. त्यांच्या मनात ताण-तणावाचे प्रसंग येतच असणार. त्यावर ते कसे मात करतात, याचाही उलगडा झालेला नाही. माणूस त्या तुलनेत काहीसा सुखी म्हणावा लागेल. हसण्यासाठी माणसाने अनेक उपाय शोधून काढले आहेत. हसणारी, आनंदाने जगणारी माणसे सर्वांनाच आवडतात. पण तसे जगणे प्रत्येकाला जमत नाही. अनेकजण दुसऱ्यांच्या उण्या-दुण्यावर बोट ठेवून, द्वेष करत, खालच्या पातळीवर जाऊन टिका टिप्पणी करण्यात हास्य शोधत असतात. बोटावर मोजण्याइतकीच मंडळी स्वत:वर, स्वत:च्या चुकांवर बोट ठेवून मनमोकळेपणे हसतात. आणि समाजातील व्यंग टिपत, त्यातून नेमकेपणाने भाष्य करत सर्वांना खळखळून हसवण्याचे आणि हसवता हसवता अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य फारच थोड्या प्रतिभावंतांकडे आहे. त्यातही कुंचल्याच्या फटकाऱ्यांतून दीर्घकाळ निखळ हास्य निर्माण करणारे व्यंगचित्रकार अत्यल्प आहेत. त्यामध्ये अर्थातच रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजे अर्थातच जगद्विख्यात आर. के. लक्ष्मण यांचा समावेश आहे. कसं बोललात या मथळ्याखाली तब्बल पाच दशके भारतीय मनावर राज्य करणाऱ्या या अनोख्या सम्राटाची व्यंगचित्रे आजही ताजी आहेत. त्यातील समकालीन मूल्य आजही टिकून आहे, हे महत्वाचे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रावर अप्रतिम भाष्य करणारी त्यांची व्यंगचित्रे म्हणजे तणावात जगताना हसण्याचे सामर्थ्य देणारा खजिनाच आहे. तो मेहता पब्लिकेशन हाऊसने सात छोटेखानी पुस्तकांच्या रुपात खास मराठी रसिकांसाठी प्रसिद्ध केला आहे. त्यात सुमारे १४०० व्यंगचित्रे मराठी भाषेत उपलब्ध आहेत.

जीवनातील धावपळीला, कटकटींना वैतागलेल्या, त्रासलेल्या अन्् सतत कुठल्यातरी तणावाखाली वावरणाऱ्या सर्व तणावग्रस्तांना हसण्यासाठी हा खजिना खुला करण्यात आल्याचे मराठी रुपांतरकार अविनाश भोमे यांनी म्हटले आहे. ते अगदी रास्तच आहे. मनोगतात ते म्हणतात वेगवेगळ्या शहरांमध्ये सकाळी जोरात चालणारे हास्यक्लब विनोदाचे व हास्याचे जीवनातील महत्व सांगतात. पण अशा क्लबमध्ये अनुभवास येणारे हास्य बरेचसे कृत्रिम, बळेच ओढून-ताणून आणलेले असते. या उलट एखादे व्यंगचित्र पाहिल्यावर येणारे हास्य पूर्णत: नैसर्गिक असते. मनाला आतून गुदगुल्या करणारे, दिलखुलास, मनमोकळे असते. खरेतर निसर्गाने माणसाला दिलेली हास्याची देणगी आपण किती विसरत चाललो आहोत, हेच हास्यक्लब पाहून वाटते. त्यावरही विनोद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे की काय, अशी आजूबाजूची स्थिती आहे. म्हणूनच आर. के. लक्ष्मण यांचा हा खजिना बहुमोल, अमूल्य आहे. लक्ष्मण यांच्याच म्हणण्यानुसार सर्वसामान्य माणूस त्याच्या रोजच्या जीवनात फारतर सहा तास त्याच्या नित्य कामाला गंभीरपणे देत असतो.  उरलेला सारा वेळ तो इतरांची खिल्ली उडवण्यात व इतरांनी केलेल्या विनोदाला हसून दाद देण्यात घालवत असतो. या सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून लक्ष्मण यांनी कुंचल्याचे फटकारे चालवले आहेत. विलक्षण प्रतिभा असलेल्या भारतीय व्यंगचित्रकारांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव अग्रक्रमावर घ्यावे लागेल. त्यांनीही प्रारंभीच्या काळात सामान्य माणसाच्या नजरेतूनच समाजव्यवस्था पाहिली. त्यावर टीकेचे प्रहार केले. मात्र, नंतर ते राजकारणात गेल्याने त्यांची व्यंगचित्रे राजकीय अंगानेच राहिली. लक्ष्मण यांनी राजकारणापासून स्व त:ला दूर ठेवले. तरीही राजकीय व्यक्ती, राजकारणी त्यांच्या प्रहारांतून सुटले नाहीत. उलट ते अधिकाधिक सखोल आणि तिखट होत गेले. अर्थात लक्ष्मण यांनी केवळ राजकारणी एवढेच लक्ष्य ठेवले नाही. तर हवामान खाते, चित्रपट कलावंत, वैज्ञानिक, संशोधक, महापालिकेचे अधिकारी, सत्ताकेंद्रातील बडे अधिकारी, उजव्या डाव्या चळवळीतील कार्यकर्ते अशा साऱ्यांच्या बोलण्यातील आणि वागण्यातील दुटप्पीपणाही त्यांनी मनोरंजकपणे रेखाटला. तो पाहून आजही हसू येते. त्या साऱ्यांचा तपशील सांगणे शक्य नाही. तो अनुभवण्यासाठी ही पुस्तकेच उपयुक्त ठरतील.

युवक महोत्सवांमध्ये स्कीट म्हणजे प्रहसन या सादरीकरणाचा प्रकार नाट्य वर्गात समाविष्ट केला आहे. त्यातही समाजातील घटना-घडामोडींवर तिखट भाष्य केले असते. केवळ दहा मिनिटांत सहा ते सात पात्रांच्या मदतीने स्कीटची मांडणी होते. आता या घटना घडामोडी निवडायच्या कशा असा अनेकवेळा लेखक, कलावंतांसमोरील प्रश्न असतो. त्याचेही उत्तर या पुस्तकांतून मिळू शकते. दहा-बारा व्यंगचित्रांना एका कथासूत्रात बांधले तर उत्तम स्कीट तयार होऊ शकते. आणि केवळ स्कीटच नव्हे तर एक सामाजिक भाष्य करणारा, तिरकस बाणांचा वर्षाव असलेला दीर्घांकही रंगमंचावर अवतरित होऊ शकतो. मराठवाड्यातील रंगकर्मींनी ही पुस्तके नजरेखालून घातली तर ते सहज शक्य आहे. अशी त्यांची तयारी आहे का?





No comments:

Post a Comment