Tuesday 7 July 2015

हं कसा असेल

विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात सारेच नवशिके कलावंत. फार झाले तर एखाद दुसऱ्या एकांकिका स्पर्धेत चमकलेले. विभागातील मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या खुल्या जागेत गोलाकार उभे. आवाजावर हुकुमत आणि रंगमंचावरील कॉम्पोझिशन्सची अचूक जाण असलेले प्रतिभावान रंगकर्मी प्रा. कुमार देशमुख कलावंतांच्या मध्यभागी येत आणि आज आपल्याला एक खेळ खेळायचा आहे, असे सांगत. नाट्यशास्त्रात कुठला खेळ, असा प्रश्न कलावंतांच्या चेहऱ्यावर.  मग प्रा. देशमुख एखाद्यावर नजर रोखून सांगत आता तु ‘हं’ म्हणायचे. त्याने ‘हं’ म्हटल्यावर दुसऱ्यालापण ‘हं’ म्हणण्यास सांगायचे. अट फक्त एकच होती. आधीच्या कलावंतांने ज्या सूरात ‘हं’ चा हुंकार दिला. त्याच्यापेक्षा दुसऱ्याचा ‘हं’ वेगळा असलाच पाहिजे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या आधीच्याने ‘हं’ कसा म्हटला आहे, यावर बारकाईने लक्ष ठेवायचा. आपला ‘हं’ वेगळा कसा असेल याचा विचार करायचा. सर्वात महत्वाचे म्हणजे या साऱ्या व्यक्त करण्यासाठी काही सेकंदांचाच अवधी मिळायचा. काही मिनिटांतच कलावंतांचे वेगवेगळ्या आवाज, सूरातील ‘हं’ चे वर्तुळ पूर्ण व्हायचे. मग प्रा. देशमुख प्रत्येकाला ‘हं’ कोणत्या अर्थाने म्हटले. त्या मागे काय विचार केला आणि कोणते वाक्य मनात योजून ‘हं’ म्हटले, असे विचारायचे. काहींचे स्पष्टीकरण अचूक तर काहींचे अचूकतेजवळ जाणारे असायचे. सुमारे तास-दीड तास चालणाऱ्या या खेळातून नाटकाच्या सादरीकरणात प्रत्येक शब्दाला आणि त्याच्या उच्चारणाला किती महत्व आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव कलावंतांना येत होता. ‘हं’ २७ प्रकारे म्हणता येते आणि त्यातील प्रत्येक ‘हं’ चा एक स्वतंत्र अर्थ आहे. त्यातून भावना व्यक्त होतात, हेही लक्षात येत होते. प्रा. देशमुख यांची कलावंतांचा अावाज घडविण्याची, शब्दांचे महत्वही अधोरेखित करून घेण्याची ती शैली  होती. अजूनही विभागात बऱ्याचवेळा अशाच पद्धतीने काम केले जाते. विशेषत: प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर  संवादशैलीवर प्रचंड मेहनत करून घेतात. प्रत्येक शब्दाची फोड करून त्यातील अर्थ ध्वनित झाल्याशिवाय कलावंताला पुढे सरकू देत नाहीत.

हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे औरंगाबादेत काही रंगकर्मी नाट्य अभिवाचनाचे करत असलेले प्रयोग. आणि या प्रयोगांना रसिकांकडून मिळत असलेला प्रतिसाद. काळाच्या ओघात पल्लेदार, संगीत नाटकांचे रुप बदलले. आधी तीन नंतर दोन अंकांची नाटके रंगमंचावर अवतरित होऊ लागली. त्याही पुढे जाऊन दीर्घांक आले. कारण रसिकांना दीर्घकाळ रंगमंदिरात खिळवून ठेवणे अवघड होत चालले होते. त्याच काळात नाट्य अभिवाचनाचेही प्रयोग मुंबई, पुण्यात मर्यादित स्वरूपात का होईना होत होते. त्याला बऱ्यापैकी यशही मिळत होते. नाट्यानंद देणारा हा वेगळा प्रवाह औरंगाबादेत तरुण पिढीतील सृजनशील दिग्दर्शक  पद्््मनाभ पाठक यांनी सुरू केला आहे. त्यामागची त्यांची संकल्पना अत्यंत सुस्पष्ट आहे. ती म्हणजे नाट्यकलेशी रसिकांना बांधून ठेवणे आणि त्यांना नाटकांचा  आनंद वेगळ्या रुपात मिळवून देणे. खरे तर कोणतेही नाटक मग ती एकांकिका असो किंवा दीर्घांक, दोन अंकी. त्यासाठी पहिल्या टप्प्यात संवाद वाचनाच्याच तालमी होतात. प्रत्येक कलावंताच्या हातात संहितेची एक प्रत असते आणि तो मग स्वत:च्या वाट्याला आलेल्या व्यक्तीरेखेचे संवाद म्हणू लागतो. लेखक, दिग्दर्शकासोबत संवादशैलीवर, त्यातील अर्थ अनर्थ, अारोह-अवरोहावर, गतीवर, पॉझवर प्रदीर्घ चर्चा होणे अपेक्षित असते. यातून अनेक कलावंतांना त्यांच्या व्यक्तिरेखेचा लेखकाला अपेक्षित असलेला सूर सापडतो.

एकूणात नाट्य वाचन हा नाटक उभारणीचा सर्वात महत्वाचा पाया आहे. तो अलिकडच्या काळात दुर्लक्षित होत असल्याचे पद्मनाभ पाठक यांना जा‌णवले. एकांकिका स्पर्धांसाठीची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे संहिता हाती देऊन थेट तालमी सुरू करण्याचा प्रघात सुरू झाला असावा. परिणामी प्रतिभा असूनही कलावंत सादरीकरणात कमी पडतात. शब्दांचा अर्थ रसिकांना उलगडून सांगण्यात दिग्दर्शकाला अपेक्षित यश येत नाही, असे अनेक स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम पाहताना पाठक यांना जाणवले. मग याविषयी इतरांना काही सांगण्यापेक्षा आपणच याबद्दल आणखी सखोल काम का करू नये, असे त्यांना वाटू लागले. नव्या संकल्पनांसाठी ओळखले जाणारे प्रख्यात नाटककार प्रा. अजित दळवी त्यांच्या पाठिशी उभे पाहिले. त्यातूनच दोन वर्षापूर्वी नाट्य अभिवाचनाच्या उपक्रमाचा प्रारंभ झाला. चं. प्र. देशपांडे यांचा दुरुस्ती आणि देखभाल हा दीर्घांक, प्रा. अजित दळवी यांचे प्रचंड गाजलेल्या डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक, डॉ. भवान महाजन यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी त्या पुस्तकातील काही उतारे, असगर वसाहत यांचे गोडसे  ऍट
 द रेड गांधी डॉट कॉम असे अभिवाचनाचे प्रयोग प्रा. अनुया दळवी, लक्ष्मीकांत धोंड, वसंत दातार, सुजाता पाठक, पद्मनाभ पाठक, सीमा मोघे, सुधीर मोघे, नीना निकाळजे, श्रीकांत उमरीकर यांनी केले. सर्वच कलावंत मंडळी रंगभूमीर दीर्घकाळ काम केलेली आणि शब्दांची ताकद जाणणारी होती. सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ वाचनातूनच नाट्यानुभव द्यायचा असेल तर त्यासाठी संगीत, प्रकाश योजनेवरही काम करावे लागेल, याची काळजी  पद्मनाभ यांनी घेतली. यामुळे जाणकार रसिकांना संहिता आस्वादता आली. 

सध्या मुंबई, पुण्यात नाट्य रसिकांना नाटकांशी बांधून ठेवण्यासाठी अभिवाचनाची चळवळ जोरदारपणे सुरू आहे. पुल अकादमीमध्ये दर आठवड्याला अभिवाचनातून कलावंत आणि रसिक घडवण्याचे कार्य सुरू आहे. ते औरंगाबादेतही होऊ घातले आहे. तरुण पिढीतील कलावंतांनी त्यात सहभाग घेतला आणि मराठवाड्यातील इतर शहरांतही अभिवाचनाचा प्रवाह सुरू केला तर टीव्ही मालिकांत अडकलेले नाट्य अधिक जिवंत आणि रसरशीत होईल. नाही का?



No comments:

Post a Comment