Friday 24 July 2015

मस्सान : मनात घर करत नाही

बऱ्याच वेळ पडदा अंधूकच असतो. मग हळूहळू आवाज येऊ लागतात. चित्र दिसते पण तेही धूसरच असते. कोण काय बोलते, हे अगदी लक्षपूर्वक ऐकावे लागते. काही काळाने पात्रांच्या रुपातील व्यक्तीरेखा उलगडत जातात. पण त्यातही अाखीव रेखीवपणा नसतोच. प्रसंग बदलतात. कहाणी  किंचित वेग घेत असली आणि प्रेक्षकांची भाषा बोलत असली तरी त्यात अति वास्तववाद असल्याने मन त्यात खूप काळ गुंतत नाही. अखेरीस मन सुन्न झाल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात चित्रपटगृहाच्या पायऱ्या उतरेपर्यंत सुन्नपणा टिकत नाही. ही सारी आहेत समांतर चित्रपटाची वैशिष्ट्ये. १९८० च्या दशकात आलेले बहुतांश चित्रपट (शाम बेनेगल आदी प्रतिभावान मंडळींच्या प्रतिभेबद्दल अजिबात शंका नाही तरीही) याच प्रकारातील होते. त्यामुळे ते महोत्सवात गाजले. परदेशी मंडळींनी त्याचे तोंड भरून कौतुक केले. भारतीय समीक्षकांना भारतीय प्रेक्षक चांगलेच ठाऊक असल्याने तेही हे चित्रपट क्लाससाठी आहेत. माससाठी नाहीत, असे समीक्षेत आधीच सांगून टाकत स्वत:ला क्लासमधील असल्याचे जाहीर करत होते. गेल्या काही वर्षात जागतिकीकरणाचा आणि मसाला, मनोरंजनाचा झपाटा सुरू झाला. शाम बेनेगल आदी मंडळी मसाला मिक्स समांतर अशा मार्गाने जाऊ लागल्याने समीक्षकांना क्लास, मास अशा वर्गीकरणाची संधी मिळाली नाही.

ती ‘मसान’ या नीरज घेवान या तरुण दिग्दर्शकाच्या चित्रपटाने नुकतीच ही संधी मिळवून दिली आहे. गँग्ज ऑफ वासेपूर या अनुराग कश्यपच्या तुफान गाजलेल्या चित्रपटात नवाजोद्दीन सिद्दीकीच्या आईची भूमिका करणाऱ्या रिचा चढ्ढाची मसान मध्ये प्रमुख भूमिका असल्यानेही मसान चर्चेत आला. कान्स महोत्सवात मसानचे कौतुक झाले.  एनडीटीव्ही, मटामधील परीक्षणात मसान अप्रतिम आहे. असे म्हटले होते. त्यामुळे अपेक्षा वाढल्या होत्या. किमान क्लासचा हा चित्रपट असणारच. शिवाय त्यात थोडी व्यावसायिक गणिते मांडली असतील. प्रेक्षकांना कुठलाही चित्रपट पाहताना जो वेग अपेक्षित असतो, तो असेल असेही वाटले होते. कहाणी, पटकथा, चित्रीकरणावर मेहनत घेतली असेलच, याचीही खात्री होती.

प्रत्यक्षात मसानमध्ये यातील काहीही नाही. जीवन म्हणजे फक्त मसान (स्मशान) नाही. स्मशानात जाईपर्यंतही एक जग आहेच. म्हणून, जे होऊन गेले ते विसरून जा. दु:ख बाजूला ठेवा आणि नव्या क्षणांना आनंदीपणे सामोरे  जा, असा संदेश या चित्रपटात आहे. तो देण्यासाठी रचलेली कहाणी खूपच तुकड्या तुकड्यात आहेत. 

शारीरिक, मानसिक सुखाचा आनंद घेण्यासाठी  मित्रासोबत एका हॉटेलात गेलेली रिचा चढ्ढा पोलिस छाप्यात अडकते. मित्र आत्महत्या करतो. मग पोलिस इन्सपेक्टर या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी रिचाच्या वडिलांकडे (ते बनारसच्या घाटावर दशक्रिया विधीचे सामान विकत असतात.) तीन लाख रुपये मागतात. या संकटातून सुटण्यासाठी ती  अलाहाबादला जाते. 

दुसरीकडे बनारसच्या घाटावरील डोंब कुटुंबातील दीपक (विकी कौशल) एका उच्चवर्णीय मुलीच्या प्रेमात पडतो. दोघे जातीपातीची बंधने झुगारत लग्न करण्याचे ठरवतात. पण एका अपघातात ती मुलगी मरण पावते. तिचे प्रेत जाळण्याचे काम दीपकला करावे लागते. या जबर धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी तोही अलाहाबादला जातो. तिथे गंगा-जमुनेच्या संगमावर त्याची रिचा चढ्ढाशी भेट होते. दोघे एकाच नावेत बसतात.

खरेतर हा सारा प्रवास एखाद्या कादंबरीसारखा आहे. त्यातील सगळ्याच व्यक्तिरेखा मनाला घर पाडत जातात. पण मनात घर करत नाही. कारण दिग्दर्शकाने पू्र्ण मांडणी, सादरीकरण अतिशय संथ लयीत, कादंबरीची पाने उलटल्यासारखे केले आहे. त्यामुळे अनेक प्रसंगांतील पंच टोचत नाही. तो अंगावर येत नाही. खरेतर प्रायोगिक, समांतर चित्रपट म्हणजे त्यातील बोचणी दीर्घकाळ टिकणारीच हवी. तशी ती होतच नाही. रिचा चढ्ढासह साऱ्यांचाच अभिनय वास्तववादी असला तरी त्यात जिवंतपणाची एक पोकळी शिल्लक राहतेच. संवाद सहज बोलीतील अाहेत. त्यामुळे पहिले पाच मिनिटे ते छान वाटतात. नंतर त्यात एक मोनोटोनसपणा येतो. सर्वात महत्वाचे म्हणजे पुढे काय घडू शकते, याचा अंदाज येत राहतो. या साऱ्यामुळे मसान अपेक्षित उंचीवर जातच नाही.

दोन  संदेश : त्यातील पहिला म्हणजे काळ्या मार्गाने पैसा कमावण्यासाठी पोलिस कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांची नितीमत्ता पूर्णपणे लयास गेली आहे.  सामान्य माणसाला संरक्षण, न्याय देण्याचे काम पोलिस कधीच करू शकत नाहीत.

दुसरा म्हणजे तुम्हाला सुखी व्हायचे असेल. मनासारखा जोडीदार हवा असेल तर जाती-पातीच्या पलिकडे जा. कदाचित तुमचा जीवन प्रवास आनंदी होऊ शकतो. काल गेलेला दु:खी क्षण आज बाजूला ठेवायला शिका.

1 comment:

  1. उत्तम परीक्षण. अार्ट फिल्म म्हणून जे चित्रपट पूर्वी मी पाहिले आहेत तेही संथ, कथानक विखूरलेले आणि काहीशा अंधारातच चित्रीत झालेले होते. मसानने तीच लय पकडली असली तरी आशयाची पातळी दिग्दर्शकाला फार खोल करता आलेली नाही, असे माझे मत झाले. स्मशातले वास्तव दाखवताना ती जागा कशी जातीपातीचा भेद करत नाही, हे दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न पात्रांची नावे, आडनावे आणि त्यांचा पेशा यातून दिसतो. पोलिसांच्या भ्रष्ट असण्यावर टाकलेला प्रकाश ही काही नवी गोष्ट नाही. फेसबूकमुळे काय काय शक्य होतं आणि त्यातून पुढे काय घडू शकतं ही बाब तरूण मुलींना सावध करणारी आहे. थिएटरमध्ये प्रेक्षक खिळून राहात नाही आणि बाहेर पडतानाही सोबत काहीच घेऊन जात नाही हे खरंय.

    ReplyDelete